उस पीक सल्ला

खोड किडीच्या प्रादर्भावामुळे विरळ झालेले उसाचे बेट.
खोड किडीच्या प्रादर्भावामुळे विरळ झालेले उसाचे बेट.

उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन व विद्राव्य खतांचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे. खोडकीडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिकोनातून नियोजन करावे.

पूर्वहंगामी ऊस

  • पीक १६ आठवड्याचे झाल्यास हेक्टरी एकूण शिफारशीत खतमात्रेच्या १० टक्के नत्राची (३४ किलो) मात्रा ७४ किलो युरिया याप्रमाणात द्यावी. युरिया ६ भागास निंबोळी पेंड १ भाग याप्रमाणे चोळून ही मात्रा द्यावी.  
  • पक्क्या भरणीयोग्य २० आठवडे वयाच्या उसात आंतरपिके घेतली असल्यास त्यांची काढणी करावी. काढणीनंतर पहारीच्या साह्याने सरीचे वरंबे फोडून उर्वरित रासायनिक खतांची मात्रा प्रतिहेक्टरी १४० किलो नत्र (३१० किलो युरिया) ८५ किलो स्फुरद (५३० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१५५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणात द्यावी. खतमात्रा एकत्र चांगली मिसळून सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी. खते दिल्यानंतर रिजरने भरणी करावी व रानबांधणी करून लगेच पाणी द्यावे.
  • ठिबकसिंचनाची सोय असल्यास ५ ते ९ आठवड्यांपर्यंत उसाला एकरी १६.५ किलो युरिया, ६.२० किलो माेनो-अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७ दिवसांच्या अंतराने द्यावे. तसेच १० ते २० आठवड्यापर्यंतच्या पिकास प्रतिएकरी ११ किलो युरिया, ४.५ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७ दिवसांच्या अंतराने द्यावे.    
  • खोड किडीमुळे शेंडे वाळत असतील तर क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्के दाणेदार) १८.७५ किलो किंवा फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार) २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी वापरावे.
  • सुरू ऊस

  • उगवण विरळ झाली असल्यास त्याठिकाणी प्लॅस्टीक पिशवीत किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली समवयस्क रोपे वापरून नांग्या भरून घ्याव्यात. त्यानंतर त्वरित हलके पाणी द्यावे.
  • खोड कीड नियंत्रणासाठी लावणीच्या ४५ दिवसांनी बाळबांधणी करावी.
  • उसात मका, ज्वारी ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.
  • खोडकीडग्रस्त ऊस देठ मुळासह उपटून अळीसह नष्ट करावा. हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्ड १० दिवसांच्या अंतराने ३ वेळा लावावीत. खोडकिडीमुळे शेंडे वाळत असल्यास गरजेनुसार ‍ क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्के दाणेदार) १८.७५ किलो किंवा फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार)  प्रतिहेक्टरी २५ ते ३० किलो याप्रमाणात वापरावे.
  • सहा ते आठ आठवडे वयाच्या उसाला नत्र खताचा दुसरा हफ्ता एकूण शिफारशीच्या ४० टक्के नत्र (१०० किलो नत्र) द्यावे. त्यासाठी हेक्टरी ५५ किलो युरिया ६:१ याप्रमाणात निंबोळी पेंडीबरोबर मिसळून द्यावा. खत दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हलकेसे पाणी द्यावे. आवश्‍यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • ठिबकसिंचनाची सोय असल्यास फेब्रुवारीमध्ये लावण केलेल्या १ ते ४ आठवड्यापर्यंतच्या ऊसाला प्रतिएकरी ६.५ किलो युरिया, २ किलो माेनो-अमोनियम फॉस्फेट व १.५ किलो म्युरेट आॅफ पोटॅश ही खते ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत. जानेवारीत लावण केलेल्या उसाला वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिएकरी १२ किलाे युरिया, ४ किलो मोनो-अमोनियम फॉस्फेट व २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ७ दिवसांच्या अंतराने द्यावीत.
  • संपर्क : डॉ. प्रमोद चौधरी, ८२७५५६३५८० (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com