ऊस खोडवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको...

पाचटाचे आच्छादन
पाचटाचे आच्छादन

राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. मात्र खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. कमी उत्पादन खर्चामुळे उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी खोडव्याच्या योग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे

  • सेंद्रिय खतांचा वापर होत नाही. तसेच उसाचे पाचट जाळून टाकले जाते. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत जाते.
  • ऊस लागवड पिकाच्या तुलनेत खोडवा पिकाकडे दुर्लक्ष केले जाते. लागवडीच्या ऊस पिकात उगवण क्षमता कमी असल्यास खोडव्यामध्ये नांगे पडतात. या नांग्या वेळेवर भरल्या न गेल्याने हेक्‍टरी उसाची संख्या कमी राहते.  
  • लागवडीमध्ये योग्य पद्धतीने भरणी न केल्यास खोडवा पिकास चांगला फुटवा येत नाही.
  • लागवडीच्या पिकापेक्षा खोडवा पिकात रोग व किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो.
  • खोडवा पिकासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असंतुलित व अपुरा पुरवठा केला जातो.
  • खोडवा ऊस १ ते २ महिने लवकर काढणीस तयार होतो. त्याची काढणी झाल्यास उत्पादनात व साखर उताऱ्यात घट येते.
  • लागवडीपेक्षा खोडवा पिकाचे उत्पादन कमीच असते, अशी मानसिकता असणे.
  • उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे

  • पूर्वमशागतीची गरज नसल्याने श्रम, वेळ व पैशांची बचत होते.
  • बेणे, बेणे प्रक्रिया यावरील खर्चात बचत होते. (२५ ते ३० टक्के).
  • मुळांची वाढ अगोदरच झालेली असल्याने फुटवा लवकर, एकसमान व भरपूर होतो.
  • खोडव्यात उगवणीला लागणारा १ ते २ महिन्यांचा कालावधीही वाचतो. ऊस लवकर पक्व होतो. साखरेचा उतारा चांगला येतो.
  • कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार उसाचे ३ ते ४ खोडवे यशस्वीरीत्या घेता येतात. त्याचे हेक्‍टरी १०० मे. टन उत्पादन घेता येते.
  • खोडव्यातील पाचट जाळू नका...

  • बहुतांश शेतकरी पाचट जाळतात. परिणामी ते अनेक फायद्यापासून वंचित राहतात.
  • खोडवा पिकात पडलेल्या पाचटामुळे जमिनीवर आच्छादन होऊन ओलावा टिकून राहते. पाण्यामध्ये बचत होते. दुष्काळी परिस्थितीतही पीक तग धरण्यास मदत होते.
  • आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पाचटाचे शेतामध्येच कंपोस्टमध्ये रुपांतर करता येते. परिणामी सेंद्रिय खतांवरील खर्च कमी होतो. उसाच्या पाचटात अंदाजे ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद, ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२-४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो.
  • खोडव्याच्या अधिक उत्पादनासाठी व्यवस्थापन जाती : अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी. उदा. को-८६०३२, को-एम-२६५, को-८०४०, को-७२१९, को-८०१४, को-युएआय ९८०५ इ. जाती खोडव्यासाठी उत्तम. पाचटाचे आच्छादन : ऊस तुटून गेल्यावर पाचट न जाळता त्याचे आच्छादन करावे. एकरी अंदाजे ४ ते ५ मे. टन पाचटापासून शेतातच उत्तम कंपोस्ट तयार करता येते. त्यासाठी ऊस तोडणीनंतर शेतातील पाचटाचे ढीग पसरून घ्यावेत. ऊस बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटून बुडखे मोकळे करावेत किंवा एक आड एक सरीमध्ये पाचट दाबून बसवावे. ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली असल्यास पाचटाचे तुकडे होऊन जमिनीलगत हलकासा पाचटाचा थर तयार होतो. त्यावर हेक्‍टरी १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक शेणखतात मिसळून समप्रमाणात पसरावे. त्याचबरोबर हेक्‍टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे. बुडखे छाटणे : तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास उसाचे बुडखे मोठे राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. यामुळे जमिनीखालील कोंब जोमाने फुटतात. एकूण फुटव्यांची संख्या वाढते. कीड व रोगग्रस्त उसाचे बुडखे नष्ट करून सर्व नांग्या भरून घ्याव्यात. बगला फोडणे : ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते. त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात. नवीन मुळ्याची वाढ होते. खत व्यवस्थापन :

  • खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते.
  • त्यासाठी ऊस तुटल्यावर १५ दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी ७५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६, ५० किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी. खते माती आड करून पाणी द्यावे.
  • पहिल्या मात्रेनंतर ६ आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी ७५ किलो द्यावी.
  • उर्वरित मात्रा एकरी १०० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो पोटॅश किंवा १०० किलो १०ः२६ः२६ व ७५ किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी. ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी ६० टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा. उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फर्टिगेशन तंत्राने द्यावी. (तक्ता पहा.) ठिबकमधून खोडवा ऊस पिक खत व्यवस्थापन
  • क्र.   वाढीची अवस्था  ऊस तुटल्यावर आठवडे खते किलो प्रति एकर प्रति आठवडा खते किलो प्रति एकर प्रति आठवडा खते किलो प्रति एकर प्रति आठवडा
    - - -  युरिया    १२ः६१ः०    पोटॅश
    १.        ऊस तुटल्यानंतर उगवणीपर्यंत १.५ महिने     २ ते ६ २.५२  ०.७५     ०.३८
    २.     फुटवा (१.५ ते ४ महिने)     ७ ते १२ २.९७ २.५ ०.५१
    २.   फुटवा (१.५ ते ४ महिने)     १३ ते १६ १०.०९     ३   १.१५
    ३.  

    वेगाने वाढीची अवस्था-१ (५ ते ६ महिने)  

    १७ ते २०  ९.६९  ४.५  १.५३
    ३.   वेगाने वाढीची अवस्था-१ (५ ते ६ महिने)   २१ ते २४ १३.००  २.२५  २.३०
    ४.  

    जोमाने वाढीची अवस्था-२

    (७ ते १० महिने) 

     २५ ते ३०   ४.२२  ०.५  ३.०७
    ४. 

    जोमाने वाढीची अवस्था-२

    (७ ते १० महिने) 

    ३१ ते ३४    ४.३५ --- ३.८३
    ४.

    जोमाने वाढीची अवस्था-२

    (७ ते १० महिने) 

    ३५ ते ४० 

     

    ०  

    --- ३.०७

    टीप :

  • दर १५ दिवसांनी एकरी ८ किलो मॅग्नेशियम सल्फेट व २५० ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.
  • वरील तक्ता हा मार्गदर्शक असून, माती परीक्षण व बदलत्या परिस्थितीनुसार आवश्‍यक ते बदल करावेत.
  • म्युरेट ऑफ पोटॅश वापरल्यास फक्त पांढऱ्या रंगाचे वापरावे. खत विरघळवण्यासाठी पुरेसे पाणी वापरावे. रासायनिक खतांव्यतिरिक्त सेंद्रिय खते शेणखत/कंपोस्ट खत तसेच जैविक खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे.
  • पाणी व्यवस्थापन :

  • मुख्य ऊस पीक तुटून गेल्यावर ३५ दिवसांत वरील सर्व कामे पूर्ण झाल्यावर आणि खतांची मात्रा जमिनीतून दिल्यावर पहिले पाणी लगेच देणे गरजेचे आहे. सुरवातीपासून पिकाच्या गरजेनुसार हवामान व जमिनीची प्रत लक्षात घेऊन उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांनी आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे.
  • पाचटाचे आच्छादन असल्यास पाण्याची पाळीचे अंतर वाढण्यास मदत होते व जमिनीतील पाणी जास्त दिवस टिकून राहते.
  • ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. जास्तीचे क्षेत्र ओलिताखाली आणता येते.
  • ठिबकमधून पाणी व्यवस्थापन करताना पाणी कार्यक्षम मुळांच्या कक्षेत ४५ ते ५० सें.मी. खोलीपर्यंत जाईल अशाच पद्धतीने द्यावे. ४५ ते ५० सें.मी. खोल पाणी जाण्यासाठी किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून त्यानुसार ठिबक संच किती वेळ चालवायचा हे ठरवावे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • आंतरमशागत : ऊस तुटून गेल्यावर २ ते २.५ महिन्यांनी ४ इंच माती खोडव्याच्या बुडख्याशी लावून घ्यावी. ३.५ ते ४ महिन्यांनी मोठी भरणी करावी. त्यामुळे अपेक्षित फुटव्यांची संख्या नियंत्रित करणे शक्‍य होते. तसेच जमिनीत हवा खेळती राहून पाणी धारण करण्याची क्षमता वाढते, तणांचा बंदोबस्तही करता येतो. पीक संरक्षण :  कीड व रोगाचा खोडवा पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाची पिकावर फवारणी करावी. पीक पिवळे पडू नये म्हणून १ टक्के फेरस सल्फेट  (१० ग्रॅम प्रतिलिटर) अधिक १ टक्के मॅग्नीज सल्फेट अधिक २.५ टक्के युरियाची (२५ ग्रॅम प्रतिलिटर) १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी. ऊस तुटल्यावर आणि बुडखे छाटल्यावर बुडख्यांवर अर्धा टक्का (५ ग्रॅम प्रतिलिटर) चुन्याची निवळी तयार करून फवारावे. त्यामुळे रसातील फ्रुक्टोजचे ग्लुकोजमध्ये रुपांतरण होऊन त्याचा ऊस लवकर फुटण्यासाठी फायदा होतो. ऊस पक्वता व तोडणी : खोडवा पीक १२ महिन्यात पक्व होते. पक्वता चाचणी घेऊन उसतोडणी केल्यास उत्पादन व उतारा जास्त मिळण्यास मदत होते.

    खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी-

  • सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर खोडवा उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
  • लागवडीच्या उसाचे एकरी किमान ४० मे. टन उत्पादन आणि उसाची संख्या एकरी ४० हजारांपेक्षा जास्त असलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा.
  • ज्या शेतात खोडवा ठेवायचा आहे ती जमीन सुपीक व निचऱ्याची असावी.
  • खोडवा ठेवताना शिफारस केलेल्या जातींचाच खोडवा ठेवावा.
  • काणी व गवताळ वाढ या रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त खोडवा समूळ नष्ट करावा. नांग्या भरून घ्याव्यात.
  • जमिनीतून खते देताना खते पहारीच्या साहाय्याने द्यावीत.
  • ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते.
  • संपर्क : रमाकांत बळवंत गोळे, ९५४५५५२९८८ (प्रमुख, कृषी विद्या विभाग, कोठारी ॲग्रिटेक प्रा. लि., सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com