सुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादन

उन्हाळी बाजरी लागवडीसाठी संकरित व सुधारित जातींचा वापर करावा.
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी संकरित व सुधारित जातींचा वापर करावा.

उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, पिकाच्या वाढीस योग्य हवामान असल्याने वेळेवर पेरणी आणि व्यवस्थापन केल्यास खरिपापेक्षा दीडपट अधिक धान्य आणि चाऱ्याचे उत्पादन मिळते. उन्हाळी बाजरी ही धान्यासोबतच उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी महत्त्वाची ठरते. उन्हाळ्यातील तापमान आणि हवामान पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. या काळात कीड रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो. पिकासाठी पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीची निवड : जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. पूर्वमशागत : जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेतातील पिकाची धसकटे व इतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कुळवणीपुर्वी हेक्‍टरी १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरावे व नंतर कुळवणी करावी. पेरणीची वेळ : पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. पेरणी १५ फेब्रुवारीनंतर झाल्यास  परागीभवनावर पुढील काळातील अतिउष्ण हवामानाचा अनिष्ट परिणाम होतो. दाणे कमी प्रमाणात भरुन उत्पादन घटते. तसेच खरिपातील पेरणीसाठीही विलंब होतो. बियाणे : ३ ते ४ किलो बियाणे प्रतिहेक्‍टरी बीजप्रक्रिया : २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) :   बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा. तळाला राहिलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करावेत. ते स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन, त्यानंतर सावलीत वाळवावे. गोसावी रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया : वरील सावलीत वाळविलेल्या बियाण्यास मेटॅलॅक्‍झील (३५ एसडी) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे वरील दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर ॲझोस्पिरीलम २५ ग्रॅम किंवा ॲझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम याप्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणी करावी. या बीजप्रक्रियेमुळे २०-२५ टक्के नत्र खतात बचत होते. तसेच बियाण्यांची उगवणशक्ती वाढून रोपांची वाढ चांगली होते, फुटवे जास्त फुटतात व पिकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, पर्यायाने उत्पादनात सुमारे १० टक्के वाढ होते. पेरणीचे अंतर : दोन ओळीतील ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. पेरणीची पद्धत : जमीन ओलवून वाफसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे करावेत. पेरणी दोन चाडीच्या पाभरीने केल्यास रासायनिक खते आणि बियाणे एकाच वेळी पेरता येतात. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये. रासायनिक खते :  हेक्‍टरी ९० किलो नत्र, ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश द्यावे. पेरणीवेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश आणि २५ ते ३० दिवसांनी उर्वरित अर्धे नत्र द्यावे. विरळणी : पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. आंतरमशागत : दोन वेळा कोळपणी व गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवणे गरजेचे असते. याच कालावधीत तण व पिकामध्ये हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते. मजुरटंचाई असल्यास ॲट्राझिन १ किलो प्रतिहेक्‍टरी प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून - पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी जमिनीवर फवारणी करावी. उन्हाळी हंगामासाठी जातींची निवड संकरित जात - श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती. सुधारित जात - आयसीटीपी ८२०३ व धनशक्ती. पाणी व्यवस्थापन :

  • पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे.
  • त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास
  • पहिले पाणी ः फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी),
  • दुसरे पाणी ः पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी)
  • तिसरे पाणी ः दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
  • संपर्क : रामभाऊ हंकारे, ९८५०७१८०४१ (कृषि महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com