शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...

शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...

गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने खरिपासोबतच उन्हाळी मूगही फायद्याचा ठरू शकतो. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील पिकांनंतर (उदा. गहू, हरभरा, करडई इ.) उन्हाळी मूग घेता येतो. त्यासाठी उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत जातींची लागवड करावी.

मूग पीक ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देणे आवश्‍यक आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामानामुळे पीक चांगले पोसून, चांगले उत्पादन मिळते.

जमीन : मध्यम ते भारी, उत्तम निच­ऱ्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त, पानथळ तसेच उतारावरील हलक्या निकस जमिनीत लागवड करू नये. अशा जमिनीत मुळावर रायझोबीयम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. परिणामी रोपे पिवळी पडतात.

योग्य वाणाची निवड : उन्हाळी मुगाकरिता पूसा वैशाखी, वैभव या जातींची शिफारस आहे. प्रकाशाला असंवेदनशील (उदा. एकेएम ८८०२, पीकेव्ही ग्रीनगोल्ड) या जातींची निवड उन्हाळी हंगामात लागवडीसाठी करता येईल.

पूर्वमशागत : मशागतीची फारशी आवश्यकता नसते. रब्बी हंगामातील पीक निघाल्यानंतर हलकी नांगरट करून, वखराच्या उभ्या आडव्या पाळ्या द्याव्यात. जमीन भुसभुसीत करावी.

पेरणीची वेळ : उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी. त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास थंडीचा पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.

पेरणीची पद्धत व अंतर : उन्हाळी मुगाची पेरणी साधारणतः तिफणीने किंवा पाभरीने करावी. पेरतांना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील १० सें.मी. ठेवावे.

बियाण्याचे प्रमाण : हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात राहण्यासाठी शिफारसीप्रमाणे एकरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर तीन वर्षांनी बदलावे. घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी.

बीजप्रक्रिया :      

  • पेरणीपूर्वी कार्बेन्डान्झीम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेतील बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.
  • बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर तीन तासांनी मुगाच्या
  • मुळावरील गाठींचे प्रमाण वाढण्यासाठी रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रत्येकी प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
  • खत व्यवस्थापन : लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत एकरी ८ ते १० टन मिसळावे. पेरणीवेळी एकरी ५० किलो डीएपी द्यावे.

    पाणी नियोजन :

  • मुगास पेरणीपूर्वी एक पाणी यावे व वापश्यावर आल्यानंतर पेरणी करावी.
  • पेरणीनंतर पहिल्यांदा ३ ते ४ दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. विशेषत: पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होण्यताना या नाजूक अवस्थांमध्ये मुगास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • आंतरमशागत : पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकीशी डवरणी करावी. त्यानंतर गरजभासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादे निंदण करावे. शक्यतो पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

    विद्राव्य खतांची फवारणी :

  • फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारावा.
  • मुगाच्या शेंगा भरत असताना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारावे. त्यासाठी एकरी  १०० लिटर पाणी फवारण्यासाठी २ किलो डीएपी १० लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून, सकाळी ते द्रावण ढवळून गाळून घ्यावे. हे द्रावण ९० लिटर पाण्यात मिसळल्यास २ टक्क्यांचे डीएपीचे द्रावण तयार होते.
  •                            उन्हाळी लागवडीकरिता मुगाच्या शिफारशीत जाती

    जाती    कालावधी (दिवस)       उत्पादन (क्विंटल/हेक्टर)       प्रमुख वैशिष्ट्ये
     पुसा वैशाखी       ६० - ६५       ६ - ७     उन्हाळी हंगामासाठी योग्य जात.
    एकेम ८८०२      ६१ - ६३      १० - ११    लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा, भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम
    पीकेव्ही ग्रीनगोल्ड (एकेम ९९११)      ६४ - ७२       १० - १२       मध्यम जाड दाणे, भुरी रोगास साधारण प्रतिकारक्षम.
     कोपरगाव      ६० - ६५       ८ - १०       टपोरे हिरवे चमकदार दाणे
     एस. ८      ६० - ६५      ९ - १०       हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
    फुले एम. २      ६० - ६५       ११ - १२      मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य
     बी.एम. ४       ६० - ६५      १० - १२   मध्यम हिरवे चमकदार दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य.

    संपर्क :  डॉ. जीवन कतोरे, ८२७५४१२०१२ (विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com