उन्हाळी तीळ लागवडीमुळे योग्य पीक फेरपालट

उन्हाळी तीळ लागवड
उन्हाळी तीळ लागवड

उन्हाळी तीळ लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेरणी संपवावी. धान या पिकाच्या तुलनेत कमी पाण्यात येणारे व फेरपालटीचे पीक म्हणून उन्हाळी तीळ लागवड फायदेशीर ठरते. विदर्भात उन्हाळी धान लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यामुळे खरीप हंगामातील धान पिकावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. अशा वेळी उन्हाळी तीळ लागवडीमुळे चांगली पीक फेरपालट होते. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो.  

लागवड तंत्रज्ञान हवामान : तीळ पिकास २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी पोषक असते. अवकाळी पाऊस झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो. जमीन : चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. पूर्वमशागत : तिळाचे बी बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. ढेकळे फोडून घ्यावीत अन्यथा ढेकळे बियांवर पडून बी दाबले जाते. त्यासाठी जमीन उभी-आडवी नांगरून कोळपणी करुन भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी ३ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. पटाल फिरवून पेरणी करावी. सुधारित जाती : एकेटी - १०१, पीकेव्ही एनटी - ११    बियाणे प्रमाण : प्रतिहेक्टरी ३ -४ किलो बियाणे प्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे थायरम - ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम - ३ ग्रॅम अधिक जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी - ४ ग्रॅम टीप : प्रथम रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून नंतर जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीची वेळ : जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा पेरणी पद्धत : बी बारीक असल्याने त्यात समप्रमाणात वाळू /गाळलेले शेणखत / राख/ माती मिसळून पेरणी करावी. सलग लागवडीसाठी पेरणी पाभरीने किंवा तिफणीने ३० सें.मी. अंतरावर करावी. आंतरपिके : तीळ अधिक मूग (३:३) आंतरपीक पद्धत फायदेशीर ठरते. खत व्यवस्थापन :

  • प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद अशी खतमात्रा द्यावी. पेरणीवेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.  
  • जमिनीत झिंक व सल्फर या सूक्ष्म व दुय्यम अन्नघटकांची कमतरता असल्यास पेरणीवेळी प्रतिहेक्टरी झिंकसल्फेट २० किलो द्यावे.
  • विरळणी व खाडे भरणे : पेरणीनंतर ७-८ दिवसांनी खाडे भरावेत. दाट पीकसंख्या झाली असल्यास पेरणीनंतर १५ दिवसांनी पहिली व त्यानंतर ८ दिवसांनी दुसरी विरळणी करावी. दोन रोपांत अंतर १० ते १५ सें.मी. ठेवून हेक्टरी २.२५ ते २.५० लाख पीकसंख्या ठेवावी.   आंतरमशागत व तण व्यवस्थापन: पेरणीपासून पहिल्या महिन्यापर्यंत  पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार २-३ कोळपण्या व खुरपण्या कराव्यात. ओलित व्यवस्थापन : पेरणीनंतर त्वरित हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बाेंड्या भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाणी जमिनीत साचणार नाही याची काळजी घ्यावी.     कापणी व मळणी : पाने पिवळी पडून बाेंड्या पिवळ्या पडण्यास सुरवात होताच कापणी करावी. कापणीनंतर ताबडतोब पेंड्या बांधून उभ्या रचून ठेवाव्यात. बोंड्या ३ ते ४ दिवसांनंतर वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावेत.

    तीळ पिकावरील कीड, रोग व त्यांचे व्यवस्थापन

    अ) कीड     वर्णन व नुकसानीचा प्रकार    व्यवस्थापन / उपाय
    तुडतुडे     तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस राहून रसशोषण करतात व पणगुच्छ रोगाचा प्रसार करतात   क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
    पाने - गुंडाळणारी / खाणारी / बोंड्या पोखरणारी अळी   अळी हिरवट फिक्कट रंगाची असून पाठीवर ठिपके व राठ केस असतात. अळी पानाची गुंडाळी करून त्यात राहते. कोवळी पाने व फुले खाते व बोंडात शिरून बी खाते.     पेरणी वेळेवर करावी. क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. या किटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
    ब) रोग     वर्णन व नुकसानीचा प्रकार     नियंत्रण / उपाय
    मर     रोगाचा प्रसार जमिनीमुळे व दूषित बियाण्यांमुळे होतो. जमिनीतून उद्भवतो.   बीज प्रक्रिया ः थायरम ३ ग्रॅम  प्रतिकिलो बियाणे
    खोड / मूळ कुजव्या      खोडावर जमिनीलगत काळे ठिपके पडून ते शेंड्याकडे वाढतात व झाड वाळते.     ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बियाण्यास चोळून बीज प्रक्रिया करावी.
    अणुजीवी ठिपके व कडा करपा     पानावर लहान - मोठे पांढरे चट्टे दिसतात. नंतर खोडावर पसरतात व झाड वाळते.    मॅंकोझेब २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसीन ०.६ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    भुरी रोग    पानांवर व खोडावर पांढऱ्या पावडर सारख्या पदार्थाचे आवरण आढळते. पान गळून पडतात.     विद्राव्य गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

    संपर्क : डॉ. उषा डोंगरवार,९४०३६१७११३ (कृषि विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com