उन्हाळी सूर्यफुलासाठी संकरित जातींचा वापर फायद्याचा

उन्हाळी सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान
उन्हाळी सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान

उन्हाळी हंगामातील सूर्यफूल पिकावर कीड व रोगांचा विशेष प्रादुर्भाव होत नाही. तसेच कमी कालावधीत येणारे व पाण्याचा ताण बऱ्याच प्रमाणात सहन करू शकणारे हे पीक असल्याने उन्हाळी लागवड फायद्याची राहते. लागवड करताना संकरित जातींचा वापर केल्यास फायद्याचे ठरते. उन्हाळी सूर्यफूल हे फेरपालटीचे पीक म्हणूनही उपयोगी पडते. त्याशिवाय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. सुधारित तंत्रज्ञान :

  • लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी (सामू - ६.५ ते ८ ) जमीन निवडावी.
  • रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर शेताची उभी-आडवी वखरणी करावी. दुसऱ्या वखरणीपूर्वी प्रतिहेक्‍टरी ५ टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. राहील अशा पद्धतीने सरी वरंबे तयार करावेत.
  • जानेवारीचा पहिला आठवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडा या काळातच पेरणी करावी.
  • पेरणीसाठी टीएएस -८२, पीडीकेव्हीएसएच -९५२, एलएसएफएच -१७१, डीआरएसएच -१, केबीएसएच-१, केबीएसएच-४४ या संकरित जातींची निवड करावी.
  • नेक्रॉसीस या रोगापासून संरक्षणासाठी इमिडाक्लोप्रीड (७० टक्के डब्ल्यु.एस.) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात  बीजप्रक्रिया करावी.
  • दोन झाडांतील अंतर ३० सें.मी. ठेवून टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रतिहेक्‍टरी ५५,५५५ झाडे राहतील याची काळजी घ्यावी.
  • प्रतिहेक्‍टरी ८० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश या प्रमाणात खतमात्रा द्यावी. एकूण रासायनिक खतमात्रेपैकी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीवेळी द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा (४० किलो) पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावी.
  • एका जागेवर एकापेक्षा जास्त रोपे असतील, तर एकच सशक्त रोप ठेवून विरळणी करावी. अन्यथा सूर्यफुलाचा आकार लहान होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते.
  • चांगल्या उगवणीसाठी पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर लगेच ओलित करावे. कळी, फुलोरा, दाणे भरणे व परिपक्व होण्याच्या अवस्थेत सिंचनाची अत्यंत आवश्‍यकता आहे. त्यामुळे उत्पादनात हमखास वाढ होते. ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचतही होते.
  • सूर्यफूल पिकात परागीकरण कमी प्रमाणात झाल्यास स्तबकातील बिया पोचट राहतात. त्यामुळे परागीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • उन्हाळी हंगामात सूर्यफुलावर विशेष कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तरीही फुलकीडे, उंट अळी व केसाळ अळी या किडींचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्‍यता असते. कीड नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
  • परागीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना :

  • पीक फुलोऱ्यात असताना तळहातांना पातळ सुती कापड बांधून प्रत्येक फुलावरून हात फिरवावा. सकाळी ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान एक दिवसआड ही क्रिया करावी.
  • फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्‍स २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी फक्त फुलांवरच करावी.
  • मधमाश्यांच्या पाच पेट्या प्रतिहेक्‍टर या प्रमाणात ठेवाव्यात. मधमाश्यांमुळे परागीकरणामध्ये हमखास वाढ होते.
  • संपर्क : डॉ. प्रकाश घाटुळे, ९९२१३३४७८१ (सूर्यफूल कृषिविद्यावेत्ता, तेलबिया संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com