अवर्षण परिस्थितीतील मोसंबी बाग व्यवस्थापन

माेसंबी बागेत अवर्षणकाळात ठिबक किंवा मटका सिंचन पद्धतीचा वापर व आच्छादन करावे.
माेसंबी बागेत अवर्षणकाळात ठिबक किंवा मटका सिंचन पद्धतीचा वापर व आच्छादन करावे.

स द्यःस्थितीत तापमानात मोठी वाढ होत आहे. उष्ण वारे, पाणीटंचाई आदी समस्यांचा मोसंबी पिकास सामना करावा लागत आहे. अशा वेळी पुढीलप्रमाणे व्यवस्थाापन करावे.

  • बागेत हलकीशी मशागत करावी, म्हणजे तणांमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन टाळता येईल.
  • पोटॅशियम नायट्रेट १.५ ते २ टक्के (१५ ते २० ग्रॅम प्रतिलिटर) किंवा केओलीनच्या ८ टक्के (८० ग्रॅम प्रतिलिटर) द्रावणाची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पानांवर करावी. परिणामी बाष्पीभवनास अडथळा निर्माण होऊन बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पाण्याची गरज कमी लागते.
  • बाष्पीभवनाने सुमारे ७० टक्के पाणी हवेत निघून जाते. हे टाळण्यासाठी शेतातील काडी कचरा, भुसकट, गवत, तुरकाड्या, भुसा इत्यादीचा ७ ते ८ सें.मी. जाडीच्या थराचे आच्छादन करावे. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो .
  • झाडाच्या आळ्यात ४ ते ५ मडकी बसवावीत. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची वात बसवून झाडाच्या मुळांना पाणी द्यावे. सर्व साधारण एका मडक्यात ३ ते ४ लिटर पाणी ओतावे. मडक्यातील पाणी झिरपत राहून झाडांच्या तंतुमय मुळांना उपलब्ध होते व झाडे जिवंत राहतात.
  • पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचन करावे. आच्छादनाचा वापर करावा. झाडांच्या खोडाभोवती मातीचा थर दिल्यास बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान टाळता येते. मातीचा थर आच्छादनाप्रमाणे कार्य करतो.
  • पाण्याची टंचाई असल्यास कोणताही बहर धरू नये.
  • झाडाची छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. परिणामी पर्णभार कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो.
  • झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट (१ किलो मोरचुद अधिक १ किलो चुना अधिक १० लिटर पाणी) लावल्यामुळे सुर्य किरणे परावर्तित होतात. परिणामी झाडाला उष्णतेचा त्रास कमी होतो व पाण्याचीही गरज कमी पडते. बुरशीजन्य रोगासही प्रतिबंध होतो.
  • इंजेक्टर हे फार सोपे उपकरण आहे. हा नुसता अणुकुचीदार पाइप असून, पुढच्या अणुकुचीदार तोंडास दोन छिद्रे ठेवतात. इंजेक्टरमध्ये ३० सें.मी. लांब व १२.५ मि.मी. व्यासाचा जीआय पाइप फूटस्प्रेअरला जोडला जातो आणि त्यातून एका वेळी पाच लिटर पाणी दिले जाते. याप्रमाणे जमिनीत सुमारे २० सें.मी. खोलीवर प्रत्येक झाडाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने चार वेळा पाणी द्यावे.
  • प्लॅस्टिकच्या आच्छादनाने मातीतील ओलावा वाफेच्या रूपाने बाहेर पडू शकत नाही. परिणामी कमी पाण्यात फळबाग जगवता येतात.
  • झाडाच्या बुंध्यापासून अंदाजे एक फूट अंतरावर एक फूट लांब, रुंद आणि एक ते दीड फूट खोल खड्डा करून पाणी भरावे आणि खड्याचा वरील भाग आच्छादनाने झाकून टाकावा. पाण्याचा संथगतीने निचरा होण्यासाठी थोडे शेण टाकावे, त्यामुळे झाडांच्या कार्यक्षम मुळांना पाण्याची उपलब्धता होते व झाडे वाचतात.
  • झाड लहान असल्यास किंवा नवीन लागवड केली असल्यास झाडावर शेडनेटने किंवा गवताने सावली करावी.
  • जुन्या पाइपचे तुकडे  करून ३० सें.मी. जमिनीत रोवावेत. पाइपवर १५ सें.मी. अंतरावर लहान छिद्रे पाडावीत. त्यामध्ये पाणी सोडावे. त्यामुळे जमिनीच्या खालच्या थरास मुळांभोवती पाणी पोचते व बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास कमी होतो.
  • सलाइनच्या बाटल्या धुऊन त्यामध्ये पाणी भरावे. झाडाच्या आळ्यामध्ये काठीच्या आधाराने बाटली टांगावी, त्याची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या एकदम जवळ ठेवावी. त्यातून ठिबक सिंचनाप्रमाणे थोडे थोडे पाणी पडत राहते. यामध्ये पाण्याचा वेग कमी जास्त करता येतो, व पाण्याचा कार्यक्षम उपयोग होतो.
  • प्रवाही पाणी देण्याच्या पध्दतीमध्ये पहिल्या वेळेस फक्त अर्ध्या आळ्यास पाणी द्यावे. दुसऱ्या पाण्याच्या पाळी वेळेस राहिलेल्या अर्ध्या अळ्यास पाणी द्यावे.
  • शक्यतो बागांना सायंकाळच्या वेळी पाणी द्यावे.
  • संपर्क : डॉ. एस. पी. चव्हाण, ९१५८३३३३९९ (विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, लिंबूवर्गीय फळपिके तंत्रज्ञान अभियान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com