शेतकरी वाणाची नोंदणी करताना...

नवीन वाणाची नोंदणी
नवीन वाणाची नोंदणी

शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व हक्क मिळू शकतात. त्यासाठीच्या वाण नोंदणी व शेतकरी हक्क कायद्यानुसार, नव्या वाणाची नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्या वाणाबाबतचे सर्व अधिकार उपलब्ध होतात. ही नोंदणी पूर्णपणे निःशुल्क आहे. शासनाने ‘वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा’ २००१ मध्ये तयार केला. या द्वारे कोणत्याही शेतकऱ्याला बियाणे निर्मिती करणे, बियाणांची देवाण-घेवाण करणे, शेतामध्ये तयार झालेले धान्य बाजारात विकणे याविषयीचे सर्व अधिकार दिले आहेत. बाजारात बियाणे विकताना कोणत्याही ब्रॅण्डचा वापर करता येत नाही. शेतकरी हक्काची काही वैशिष्ट्ये

  • स्वतःचे वाण नोंदणी करण्याचा हक्क : कोणत्याही शेतकऱ्याला स्वतः तयार केलेला वाण मोफत नोंदणी करण्याचा हक्क आहे.
  • नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा हक्क : एखाद्या शेतकऱ्याने बाजारातील उपलब्ध असलेल्या वाणाची पेरणी शिफारसीनुसार करून बियाणे न उगवल्यास, त्याची तक्रार शेतकऱ्यांना कृषी विभागामध्ये करता येते. छाननी झाल्यानंतर अशा शेतकऱ्याला भरपाई मिळते.
  • सुधारित जातीचे बियाणे मिळण्याचा अधिकार : एखाद्या शेतकऱ्याला नोंदणीकृत झालेल्या सुधारित जातीचे बियाणे मिळवण्याचा अधिकार आहे. तसे होत नसल्यास त्याची तक्रार कृषी विभागात देता येते.
  • एखाद्या शेतकऱ्याने बीज पैदासकाराने तयार केलेल्या वाणाचे नकळत बीजोत्पादन केले अगर विकले किंवा वापर केला तर शेतकऱ्यावर कारवाई करता येत नाही.
  • शेतकरी पिकांच्या अनुवंशिक साधनांच्या संवर्धन करण्यात देशी प्रजाती व विविध पिकांच्या जंगली प्रजातींच्या संवर्धनाच्या योगदानासाठी बक्षीसपात्र म्हणून प्रशस्तीपत्र व १० लाख रूपये मिळू शकतात. याची जाहिरात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येते.
  • शेतकऱ्यांना सदर कायद्यान्वये प्राधिकरणाच्या कार्यप्रणाली दरम्यान, न्यायिक मंडळासमोर अथवा न्यायालयीन बाबीसाठी कोणतेही शुल्क भरणे बंधनकारक नाही.
  • शेतकरी वाण म्हणजे काय? शेतकरी वाण म्हणजे शेतकऱ्याने आपल्या शेतात वर्षानुवर्षे घेतलेल्या पिकांतून एक नवीन तयार झालेल्या वनस्पतीचा समूह किंवा जे नावीण्य, एकसारखेपणा व उत्पादनात स्थिर असलेले वाण होय. या वाणाचे बियाणे बाजारात १ वर्षापेक्षा जास्त काळ उपलब्ध नसावे. (४ वर्षे भारताबाहेर, व ६ वर्षे फळ झाडांसाठी.) शेतकरी वाण संरक्षणाचे फायदे एखाद्या शेतकऱ्याने स्वतः तयार केलेल्या वाण नोंदणीकृत झाल्यास, त्या वाणासंबंधीचे सर्व हक्क शेतकऱ्याला प्राप्त होतात. त्यामध्ये बिजोत्पादन घेणे, बाजारात एखाद्या ब्रॅण्डसाठी विकणे, आयात-निर्यात करता येते. त्याच प्रमाणे अन्य एखाद्या व्यक्तीने त्यांचा बेकायदेशीर वापर केल्यास कारवाई करण्याचा हक्क प्राप्त होतो. नवीन वाणाची नोंदणी कशी करावी?

  • शेतकरी वाणाची नोंदणी ही निःशुल्क आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याने किंवा शेतकरी गटाने तांत्रिक प्रश्‍नावली तयार करून द्यावी. त्यामध्ये वाणाचे वैशिष्ट्य, वाणांचे नाव, त्या पिकाची NDUS मार्गदर्शिका तयार करून घ्यावी.
  • वाण नोंदणीचा अर्ज इंग्रजीमध्ये असून, त्यामध्ये सविस्तर माहिती भरावी. सदर अर्ज पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधीकरण, एस-२, ए, ब्लॉक, एन.ए.एस.सी. संकुल, देव प्रकाश शास्त्री मार्ग, नवी दिल्ली - ११० ०१२ किंवा www/plantauthority.gov.in येथे सविनय सादर करावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोच पावती शेतकऱ्याला दिली जाते.
  • सादर केलेल्या अर्जाची PPV & FR Authority (मंडळ) यांच्याकडून पूर्वछाननी केली जाते. त्यात काही दुरुस्ती असल्यास, त्यानुसार दुरुस्ती करून पुन्हा सादर करावा लागतो. सादर केलेल्या अर्जाची स्विकृती पोहच दिली जाते. संबंधित वाणांच्या माहितीची छाननी करून ह्या वाणाची जाहिरात किंवा माहिती PPV & FR संशोधन पुस्तिकेत आणि PPV & FR संकेत स्थळांवर प्रसिद्ध केली जाते.
  • संबंधित वाणांसंदर्भात एखाद्याचा आक्षेप असल्यास (आक्षेप त्या व्यक्तीचा वाण चोरल्याचा किंवा त्याच वाणांचा वारंवार वापर करून नवीन वाण तयार केल्यास) अशी तक्रार ९० दिवसांच्या आत करणे अनिवार्य असते. तशी तक्रार न आल्यास संबंधित वाणाचे नवीन बियाणे, भौतिक व अनुवंशिक शुद्धता असलेले, कोणतेही रासायनिक बीजप्रक्रिया न केलेले बियाणे, जास्त उगवण क्षमता असलेले बियाणे एकाचवेळी सादर करावे लागतात. PPV & FR Authority कार्यालयात जमा केलेल्या बियाणांचे प्रमाण २ ते ३ हंगामास पुरेसे इतके असावे.
  • जमा केलेल्या बियाणांची DUS चाचणी घेतली जाते. त्यासाठी कृषी हवामान विभाग व बियांच्या आवश्यक हवामानानुसार DUS  चाचणी त्या भागातील शाखेत घेतली जाते.
  • संबंधित शेतकरी वाणात जर नाविण्यपूर्ण गुण (Novlity), एकसारखेपणा (Uniformity) व उत्पादन स्थिरता असल्यास, त्याला नवीन वाण म्हणून नोंदणी करून दिली जाते. नवीन वाणास १४ वर्षेपर्यंत संरक्षण मिळते.
  • DUS चाचणी घेताना नोंदणीसाठी आलेल्या वाणाचे व नोंदणी झालेल्या संदर्भीत वाणांमध्ये फरक तपासले जाते. असे नवीन फरक दाखवणाऱ्या वाणाचे नोंदणी करून त्या प्रमाणपत्र दिले जाते.
  • एकदा वाण नोंदवल्यानंतर नंतर पुनर्नोंदणीसाठी त्याला प्रचलित वाण म्हणून ओळखले जाते.\
  • टीप :

  • शेतकरी वाणाचे नोंदणी निःशुल्क केली जाते.
  • पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१ अंतर्गत शेतकरी वाणाच्या नोंदणीचा अर्ज शेतकरी किंवा शेतकरी समूहाकडून करत असताना त्या अर्जासोबत तेथील पंचायत जैवविविधता व्यवस्थापन समिती किंवा जिल्हा कृषी अधिकारी किंवा राज्य कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक किंवा आदिवासी विकास अधिकारी यांचे अनुमती पत्र जोडावे.
  • संपर्क : संभाजी यमगर, ९९६०१११६६० (वनस्पतिशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com