योग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संच

 ऊस पिकासाठी योग्य पद्धतीने ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी.
ऊस पिकासाठी योग्य पद्धतीने ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी.

ठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार करताना उसासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच इतर पिकांसाठी वापर करता आला पाहिजे. फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचामधील सॅंड फिल्टर, स्क्रीन फिल्टर संच सुरू करताना रोज स्वच्छ करावा. त्यामुळे संचामध्ये योग्य दाब मिळून सगळीकडे सारखे पाणी मिळेल. ठिबक सिंचन संचाचा उपयोग करताना सर्वप्रथम आपल्या शेतीचे व्यवस्थित सर्वेक्षण करून घ्यावे. विहीर, कूपनलिका यांना उन्हाळ्यामध्ये पाणी किती उपलब्ध होऊ शकेल, हे लक्षात घेऊन तेवढ्याच क्षेत्रावर ऊस लागवड करावी. सर्व्हेनुसार केलेल्या आराखड्यानुसार शेतामध्ये ठिबक सिंचन संचाची उभारणी करावी. उत्तम गुणवत्तेच्याच ठिबक सिंचन साहित्याची निवड करावी. ठिबकमधून खते देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅंक बसवावा.

  • ऊस पिकामध्ये ठिबक सिंचन संच दीर्घकाळ कार्यान्वित राहण्यासाठी पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाण्याचा स्रोत नदी किंवा खूप खोल कूपनलिका असेल आणि पाण्यासोबत वाळूचे कण येत असल्यास पाण्यातील वाळू वेगळी करण्यासाठी सॅंड सेपरेटर या फिल्टरचा उपयोग करावा. जर साचलेले पाणी वापरावयाचे असेल किंवा शेततळ्यातील पाण्याचा वापर करावयाचा असेल व पाणी गढूळ असल्यास, पाण्यासोबत माती, शेवाळ येत असल्यास सॅंड फिल्टरचा वापर करावा. पाण्यासोबत वाळू, मातीचे कण, शेवाळ येत नसल्यास फक्त स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरची निवड करावी.
  • उसाकरिता जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली (सबसरफेस ड्रिप इरिगेशन) दोन्ही प्रकारच्या ठिबक सिंचन संचाचा वापर करता येतो. ऊस हे जवळच्या अंतराचे पीक असल्यामुळे इनलाइन ठिबकची निवड करावी. ठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार करताना उसासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच इतर पिकांसाठी वापर करता आला पाहिजे. इनलाइन ड्रिप नळीमध्ये गोल आणि पट्टीच्या आकाराचे ड्रिपर नळी कारखान्यात तयार होताना बसविलेले असतात. जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली ठिबक सिंचन संचाचा वापर करताना दोन्हींचा उपयोग करता येऊ शकतो. जमिनीच्या अंतर्गत ठिबक सिंचन संचाचा वापर करताना इनलाइन नळीमध्ये पट्टी ड्रिपर असल्यास नळीची जमिनीत उभारणी करताना ड्रिपर वर राहतील याची काळजी घ्यावी.
  • भूपृष्ठावर ठिबक सिंचन :

  • ऊस लागवडीच्या पूर्वी जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर, सऱ्या पाडून झाल्यानंतर ज्या सऱ्यांमध्ये उसाची लागवड करावयाची आहे, त्याच सऱ्यांमध्ये ठिबक सिंचनाच्या इनलाइन नळ्या सरळ ठेवाव्यात. नळी शेवटी खुंटीला बांधून सरळ ठेवावी.
  • ऊस लागवडीपूर्वी सरीमध्ये पूर्ण ओल येईपर्यंत संच चालवून घ्यावा. कोरड्या जमिनीत उसाची लागवड करू नये. अन्यथा, उसाची उगवण होण्यास अडचण येते.
  • ठिबक सिंचन यंत्रणा ही दाबावर चालणारी आहे. त्यामुळे ठिबक सिंचन संच योग्य दाबावर चालविणे गरजेचे असते. फिल्टरजवळ दीड ते दोन किलो/ चौ. सें.मी. आणि सबमेनजवळ १ किलो/ चौ. सें.मी. दाब असणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळीकडे एकसमान पाणी दिले जाईल.
  • जमीन कायम वाफसा अवस्थेत राहील, एवढाच वेळ ठिबक सिंचन संच चालवावा.
  • ठिबक सिंचन संच नियमित सुरू ठेवावा. खूप जास्त वेळ संच चालवून पिकास जादा पाणी देऊ नये. तसेच, पिकास पाण्याचा  ताणही पडू देऊ नये.
  • ठिबकची नळी दुमडली जाणार नाही याची काळजी घ्यावी. नळी सरळ ठेवावी. नळीची टोके खुंटीला बांधून ठेवावी. अन्यथा, नळी दुमडल्या भागापासून पाणी पुढे जाणार नाही.
  • फिल्टर नियमित साफ करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचामधील सॅंड फिल्टर, स्क्रीन फिल्टर संच सुरू करताना रोज स्वच्छ करावा. त्यामुळे संचामध्ये योग्य दाब मिळून सगळीकडे सारखे पाणी मिळेल.
  • पंधरा दिवसांतून एकदा मेनलाइन आणि सबमेन लाइन फ्लश करून घ्याव्यात, त्यामुळे पाइपलाइन मध्ये साचलेली घाण, कचरा फ्लश व्हॉल्व्हद्वारे बाहेर निघून जाईल.
  • महिन्यातून एकदा गरजेनुसार नळ्यांची शेवटची टोके उघडून नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.
  • ठिबक सिंचनामधून पाण्यासोबत विद्राव्य खते, ॲसिड ट्रीटमेंट, क्‍लोरिन ट्रीटमेंट देण्यासाठी व्हेंच्युरी किंवा फर्टिलायझर टॅंक बसवून घ्यावा.
  • ऊस पिकास पाण्याच्या गुणवत्तेनुसार हायड्रोक्‍लोरिक ॲसिड आणि क्‍लोरिन ट्रीटमेंट वेळोवेळी लागवड होण्यासाठी आणि ऊस तोडणीनंतर करून घ्यावी. ठिबक सिंचनमधून फॉस्फॉरिक ॲसिडयुक्त विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.
  • ठिबक सिंचन संच काही काळ बंद ठेवल्यास आणि जमीन कोरडी झाल्यास उंदरांचा प्रादुर्भाव होतो. तो होऊ नये म्हणून ठिबक सिंचन संच नियमित सुरू ठेवावा. जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी द्यावे. सरीमध्ये लागवडीवेळी निंबोळी पेंडीचा उपयोग करावा. उंदरांच्या बिळाजवळ झिंक फॉस्फाइडच्या गोळ्या ठेवाव्यात.
  • उसाला माती चढवून झाल्यानंतर वाफ्यावर ठिबकची नळी उसाच्या ओळीजवळ ठेवावी.
  • जोड ओळ पद्धतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना उसाच्या दोन ओळींच्या मध्यभागी ठिबक सिंचनाची इनलाइन नळी सरळ ठेवावी. नळीची शेवटची टोके खुंटीला बांधावी.
  • ऊस तोडणीवेळी मजुरांना ठिबकची नळी उसाच्या जवळ असल्याची कल्पना द्यावी, म्हणजे ठिबकची नळी कापली जाणार नाही किंवा ऊस तोडणीपूर्वी ठिबकची नळी हळुवार बाहेर काढून घ्यावी आणि सबमेनवर बंडल तयार करून ठेवावे. ठिबक नळी बाहेर काढण्यापूर्वी ॲसिड ट्रीटमेंट करून घ्यावी. दुसऱ्या दिवशी संच पूर्ण दाबाने चालवून नळ्या पाण्याने फ्लश करून घ्याव्यात.
  • ऊस तोडणीनंतर पाचट जाळू नये. पाचटाचा आच्छादनासाठी उपयोग करावा किंवा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरावे. आच्छादनासाठी वापर केल्यास जमिनीत ओल टिकून राहते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • उसाच्या खोडव्यासाठी पुन्हा ठिबकचा वापर करताना ठिबकच्या नळ्या शेतात व्यवस्थित सरळ पसरवून घ्याव्यात, नळ्यांची टोके खुंट्यांना बांधून घ्यावीत.
  • या चुका टाळा : वेळोवेळी ॲसिड ट्रीटमेंट, क्‍लोरिन ट्रीटमेंट न केल्याने, तसेच योग्य फिल्टरची निवड न केल्यास इनलाइन नळ्यांमध्ये क्षार, जैविक पदार्थ, शेतात मातीचे कण, कचरा साचून ड्रिपर बंद पडतात, त्यामुळे काही शेतकरी ड्रिपरमध्ये टाचणी घालून ड्रिपरचे छिद्र मोकळे करण्याचे प्रयत्न करतात. काही शेतकरी ड्रिपरला काठीने ठोकतात, तसे करू नये. वेळोवेळी ॲसिड व क्‍लोरिन ट्रीटमेंट करावी. पाण्याच्या गुणवत्तेनुसार योग्य फिल्टरची निवड करावी. संपर्क : बी. डी. जडे, ९४२२७७४९८१ (लेखक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव येथे कार्यरत आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com