उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणी

उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणी
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणी

उसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान फुटवे मरायला सुरवात होते. चांगल्या कांड्या तयार झालेले फुटवे वाढतात. निसर्ग नियमानुसार एकरी फक्त ४० ते ४५ हजार ऊस शेवटपर्यंत टिकतात. यासाठी सुरवातीपासून ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रण करणे आवश्यक आहे.

ऊस फुटव्यांची चांगली वाढ झाल्यानंतर योग्य वेळी मोठी बांधणी करावी. कारण उसामध्ये कायमस्वरूपी फुटवे येत असतात. परंतु नंतर येणाऱ्या फुटव्यांचे पक्व ऊस होऊ शकत नाहीत. त्यासाठी वेळेवर मोठी बांधणी केल्याने उशिराचे येणारे फुटवे थांबवून उसाची जोमदार वाढ होण्यासाठी मदत होते.

  • साधारणपणे १०० ते १२० दिवसांनी पीकवाढीच्या परिस्थितीनुसार मोठी बांधणी करावी. यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणारे बैलअवजार (रिजर) किंवा छोट्या टॅक्टरच्या साह्याने मोठी बांधणी करावी.
  • मोठी बांधणी केल्यानंतर ठिबकची नळी दोन ऊस ओळींच्या मधोमध ठेवून एकवेळ १० ते १२ तास पाणी द्यावे किंवा मोठ्या बांधणीनंतर किंवा ठिबक नळी टाकण्यापूर्वी मोकळे/ पाटपाणी देण्याची सोय असल्यास देऊन नंतर ठिबक नळी दोन ओळींच्या मध्ये अंथरून नेहमीप्रमाणे पिकाच्या गरजेनुसार पाणी देण्यास सुरवात करावी.
  • सरीच्या मध्ये खते व पाणी दिल्याने मुळे अन्नद्रव्य व पाण्याच्या दिशेने वाढायला सुरवात होते. वरंब्यामध्ये केशाकर्षाने पाणी भिजल्याने कायमस्वरूपी वाफसा परिस्थिती टिकून राहिल्याने जोमदार वाढ होण्यास मदत होते.
  • मोठी बांधणी भक्कम झाल्यास उशिरा येणाऱ्या फुटव्यांना आळा बसतो. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते. तयार झालेले मोठे कोंब कांडी तयार करण्यास उपयुक्त ठरतात.
  • उसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्यांनी लहान फुटवे मरायला सुरवात होते. चांगल्या कांड्या तयार झालेले फुटवेच वाढत असतात. निसर्ग नियम आणि ऊस जातीच्या गुणधर्मानुसार एकरी फक्त ४० ते ४५ हजार ऊस शेवटपर्यंत टिकतात. यासाठी सुरवातीपासून ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रण करणे आवश्यक आहे.
  • यासाठी काही ठराविक सरीतील (८ ते १० ठिकाणी) एक मीटर अंतरातील कांडी सुटलेल्या व गळीतास तयार होणाऱ्या उसांची संख्या मोजावी. छोटे कोंब काढून घेण्यासाठी कांडी सुटलेल्या उसाच्या खालच्या / जमिनीलगतच्या दोन ते तीन कांड्यांचा वाळलेला पाला काढून छोटे कोंबही काढून घ्यावेत. कारण हे कोंब दोन ते तीन महिन्यांपर्यंत वाढत असतात. हे कोंब कांडी सुटलेल्या उसाच्या खाद्यामध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या अन्नपुुरवठ्यावर परिणाम होऊन उसाच्या जाडीवर परिणाम होऊन एकसारखे व समान वजनाचे ऊस तयार होण्यासाठी अडथळा निर्माण करतात.
  • एकरी उसाच्या जातीनुसार एकरी ४०,००० ते ४८,००० पक्व ऊस मिळण्यासाठी एका मीटरमध्ये नियंत्रित ऊस ठेवल्यास उसाचे सरासरी वजन वाढून २.५ ते ३.५ किलोचा ऊस तयार झाल्यास एकरी १०० टनांचे उद्दिष्ट सहज साध्य होईल.
  • वजनाने चांगला वाढलेला ऊस पावसाळ्याच्या सुरवातीला वाऱ्याने पडतो. ऊस कसाही जमिनीवर पडल्याने उसाचे डोळे फुटून पांकशा फुटतात. वजनात घट व्हायला सुरवात होते. त्यामुळे उसाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरवातीला (किंवा ७ ते ८ महिन्यांनंतर) उसाचे कट दाबून घेतल्यास नुकसान होणार नाही. जर चार फुटांची सरी असेल तर सहा ओळींनंतर, पाच फुटांची सरी असेल तर पाच ओळींनंतर आणि सहा फुटांची सरी असेल तर चार ओळींनंंतर ४५ अंश कोनामध्ये उसाच्या दोन्ही बाजूस १० फूट बांबू घेऊन कट दाबून घेतल्याने उसामध्ये शिरणारी हवा सहजरीत्या निघून गेल्याने ऊस पडण्याचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात घट होणार नाही.
  • उसाचे कट दाबत असताना मुळाभोवती निर्माण होणारी पोकळी भरून निघण्यासाठी पायाने ओली माती दाबावी. उसाचे कट दाबण्याचे काम चांगला पाऊस झाल्यानंतर किंवा पाटपाणी दिल्यानंतर करणे आवश्यक आहे. कोरड्या मातीमध्ये उसाचे कट दाबल्यास ऊस मोडण्याची शक्यता असते.
  • एकरी पक्व ऊस आणि फुटव्यांचे संख्या नियंत्रण (सलग लागवड पद्धत)

    दोन सरीतील अंतर (मीटर)   दोन सरीतील अंतर (फूट)     एक एकर मध्ये पडणारी सरीची लांबी मीटर (फूट)  एक मीटर मध्ये उसाची संख्या     एक मीटर मध्ये उसाची संख्या
    १.२     ४     ३३२० (१०८८९)    १२.२०    १३.४१
    १.३५     ४.५    २९५१ (९६७९)    १३.७२    १५.०९
    १.५०     ५     २६५६ (८७११)   १५.२४     १६.७७
    १.८०    ६     २२१३ (७२५९)   १८.२९     २०.१२
    २.१०   ७     १८९७ (६२२२)    २१.३४     २३.४८
    २.४०   ८      १६६० (५४४५)    २४.३९     २६.८३
    एकरामध्ये मिळणारी पक्व उसाची संख्या   - -    ४०,०००  ४४,०००

    एकरी पक्व ऊस व फुटव्यांचे संख्या नियंत्रण

    लागवड प्रकार     दोन सरीतील अंतर (मीटर)    दोन सरीतील अंतर (फूट)     एक एकर मध्ये पडणारी सरीची लांबी मीटर (फूट)  दिड फूट लागवड फुटव्यांची संख्या        दोन फूट लागवड फुटव्यांची संख्या     अडीच फूट लागवड फुटव्यांची संख्या    तीन फूट लागवड फुटव्यांची संख्या
    सरफेस ठिबक सिंचन     १.२     ४     ३३७४ (१०८८९)     ६.०६     ८.०८   १०.१०      १२.१२
    सरफेस ठिबक सिंचन        १.३५      ४.५     २९९९ (९६७९)     ६.८२    ९.०९     ११.३६     १३.६४
    सरफेस ठिबक सिंचन       १.५०       ५     २६९९ (८७११)     ७.५८   १०.१०      १२.३६     १५.१५
    सरफेस ठिबक सिंचन         १.८०     ६      २२४९ (७२५९)    ९.०९       १२.१२     १५.१५    १८.१८
    सब- सरफेस ठिबक सिंचन  १.८०       ६     २२४९ (७२५९)    ४.५५     ६.६०     ७.५८    ९.०९
    सब- सरफेस ठिबक सिंचन      २.१०     ७     १९२८ (६२२२)     ५.३०   ७.०७     ८.८४     १०.६१
    सब- सरफेस ठिबक सिंचन      २.४०    ८     १६८७ (५४४५)     ६.०६    ८.०८    १०.१०     १२.१२
    सब- सरफेस ठिबक सिंचन  एकरामध्ये मिळणारी पक्व उसाची संख्या - -   ४४,०००       ४४,०००       ४४,०००       ४४,०००    

    संपर्क : विजय माळी, ९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com