agricultural news in marathi, technology for control of pink boll worm, Agrowon, Maharashtra | Agrowon

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत संपवा कापसाचा हंगाम
डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. विश्लेष नगरारे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात बीटी कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान झाले. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या विभागामध्ये तिच्या प्रभावी नियंत्रणासाठी या हंगामापासूनच काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यातील फरदड न घेता वेळेवर कपाशीचा हंगाम संपवणे आणि पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन न घेणे अशा काही निर्णय त्वरित घ्यावे लागणार आहेत.

या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात बीटी कपाशीवर झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे लक्षणीय नुकसान झाले. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव असलेल्या विभागामध्ये तिच्या प्रभावी नियंत्रणासाठी या हंगामापासूनच काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यातील फरदड न घेता वेळेवर कपाशीचा हंगाम संपवणे आणि पूर्व हंगामी कपाशीचे उत्पादन न घेणे अशा काही निर्णय त्वरित घ्यावे लागणार आहेत.

भारतामध्ये २००२ मध्ये अधिकृतरीत्या बीटी कापूस लागवडीसाठी शासन मान्यता मिळाल्यानंतर ते लागवडीखाली आले. पुढे २००६ मध्ये बीटी-२ हे वाणही बाजारात उपलब्ध झाले. देशामध्ये कापसाखालील एकूण क्षेत्रापैकी ९३% हून अधिक क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते. दीड दशकाहून अधिक काळ बोंड अळ्यापासून संरक्षण मिळत असले तरी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव वाढत गेला. अर्थात, ही काही अचानक घडलेली प्रक्रिया नाही.
या प्रकाराची तपशीलवार मिमांसा केली असता त्यामागील अनेक कारणे दिसून येतात. उदा. कपाशीभोवती रेफ्युजी किंवा आश्रय पिके न लावणे, कापसाचा हंगाम फेब्रुवारी आणि त्यानंतरही लांबविणे, पूर्व हंगामी कापसाची एप्रिल-मे दरम्यान लागवड करणे, प्रादुर्भावाचे योग्य वेळी निदान न होणे, या सोबत एकात्मिक नियंत्रण पद्धतींचा अवलंब न करणे इ. यातील कापसाचा हंगाम वेळेत संपविणे व पूर्वहंगामी लागवड थांबविणे या सारख्या काही कारणांमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अविरतपणे सुरू राहण्यास मदत होते. बीटी प्रमाणे अन्य घटकांबाबतही त्यांच्यामध्ये प्रतिकारकता वाढण्यास मदत होते.

का संपवावा हंगाम वेळेतच?
चालू हंगामात महाराष्ट्रातील बीटी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची तीव्रता व त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पीक संरक्षण विभागातील शास्त्रज्ञांनी सप्टेंबर - डिसेंबर २०१७ दरम्यान विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांतील जवळपास १०५ गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये प्रादुर्भावग्रस्त शेतातील नमुने तपासणीबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यातून शेतकरी वापरत असलेले उत्पादन तंत्रज्ञान, कीड नियंत्रण उपाययोजना, स्थानिक पीक पद्धती यासारखी माहिती संकलित केली. त्यातील काही महत्त्वाच्या बाबी.

 • बऱ्यापैकी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागातील जवळपास ९० टक्क्यांहून जास्त शेतकरी अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान पिकाला अतिरिक्त खतमात्रा व सिंचन देतात. त्यातून कापसाचा हंगाम फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लांबवत असल्याचे निदर्शनास आले.
 • यातून गुलाबी बोंड अळीला अधिक काळासाठी खाद्यपुरवठा उपलब्ध होतो. अळीचा जीवनक्रम सातत्याने सुरूच राहतो. गुलाबी बोंड अळीसाठी कपाशी हे एकमेव खाद्यपीक आहे. जगण्यासाठीच्या स्पर्धेत या किडीवर दबाव येऊन हळूहळू तिच्यामध्ये बीटी कपाशीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढीस लागली असावी. मागील सुमारे १५ वर्षांपासून संथगतीने ही प्रक्रिया होत गेली. अलीकडील २-३ वर्षांपासून गुलाबी बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत गेला. त्याचेच रूपांतर चालू वर्षी बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप होण्यात झाले.
 • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या ९० दिवसांपासून पुढे) सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. तसेच ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हंगाम जसजसा लांबला जाईल तसतसे बोंडांवरील प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत जाते. वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच बोंडातील कापूस आणि बियांना होणाऱ्या नुकसानीची तीव्रताही वाढत जाते.

उपाययोजना :

 • आदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवावा. शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावेत. आताही उशीर झालेला नाही.
 • अळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव तसेच यादरम्यान हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात.
 • पीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढया चरावयास सोडाव्यात. पऱ्हाटीचे अवशेष जाळून टाकावेत. कोणत्याही स्थितीमध्ये पऱ्हाटी शेताच्या बांधावर साठवून ठेऊ नयेत.
 • गुलाबी बोंड अळी आपल्या उपजीविकेसाठी फक्त कपाशीवरच अवलंबून असते. शेतात पीक नसल्याने खाद्य पुरवठ्याअभावी अळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.

पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळावी
साधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करण्याची शिफारस आहे. परंतू, सर्वेक्षणादरम्यान प्रकर्षाने आढळून आलेली दुसरी आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ओलिताखालील कापूस क्षेत्रात बहुतेक शेतकरी कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यान करतात. यालाच पूर्वहंगामी लागवड असे म्हणतात. आधीच मार्चपर्यंत लांबवलेला मागील पिकाचा हंगाम व एक - दीड महिन्याच्या अंतराने केलेली पुढच्या हंगामातील कपाशीची लागवड यामुळे किडीचे जीवन चक्र खंडित होत नाही. किडीसाठी वर्षभर खाद्य पुरवठा उपलब्ध झाल्याने कीड सतत कार्यरत राहते.
गुलाबी बोंड अळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवड केलेल्या कापसाला पात्या लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. तसेच मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून येतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलै मध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो.
उपाययोजना
पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळावे. त्यामुळे जून-जुलै दरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध नसतात. त्यामुळे या अळ्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा “आत्मघाती उदय” (suicidal emergence)  असे  म्हणतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते. हंगामी कापूस पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यास मोठा फायदा होऊ शकतो.

महत्त्वाचे

 • डिसेंबरच्या शेवटपर्यंत सर्व वेचणी संपवून जास्तीत जास्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पीक शेतातून काढून टाकावे. कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये.
 • कमी कालावधीत व एकाच वेळेत परिपक्व होणाऱ्या (१५०-१६० दिवस) वाणांची निवड करावी.
 • सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागात कपाशीचा हंगाम वेळेत संपवावा.
 • पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यापेक्षा उन्हाळी हंगामात येणारी पर्यायी पिके घ्यावीत. यामुळे पिकांचा फेरबदल होऊन किडीचा जीवनक्रम खंडीत होऊ शकेल. पिकाच्या फेरबदलामुळे जमिनीची सुपीकताही टिकवून ठेवता येईल.

संपर्क : डॉ. बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५
(पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)

 

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...