गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या उपाययोजना

गारपीटग्रस्त केळी बाग
गारपीटग्रस्त केळी बाग

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा वेळी पिकाची झालेली हानी लवकरात लवकर भरून काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात. गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे बुंध्यातून मोडून पडणे, पाने फाटणे व घड सटकणे, बुंध्यावर, फळावर व केळी दांड्यावर जखमा होणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

मृगबाग व्यवस्थापन :

  • पीक सध्या घड निसवण्याच्या अवस्थेत आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारपिटीमुळे पाने फाटून झाड हलते. परिणामी मुळ्या उघड्या पडतात. अशावेळी त्या मातीने झाकून घ्याव्यात. प्रतिझाडास शेणखत १ किलो अधिक दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ९२ ग्रॅम असे मिसळून द्यावे. झाडास मातीने आधार द्यावा. त्यामुळे केळफूल योग्य वेळी बाहेर पडण्यास मदत होईल.
  • अतिवृष्टी व गारपिटीमुळे पाने फाटली जातात. परिणामी प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये बाधा निर्माण होते. अशावेळी झाडावरील पाने जास्तीत जास्त दिवस कार्यक्षम ठेवणे गरजेचे असते. गारपिटीचे प्रमाण जास्त असल्यास पाने, खोड तसेच फळांना जखमा होतात. जखमांच्या ठिकाणी बुरशीची वाढ होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण झाडावर फवारणी करावी.(चौकट पहा.)
  • केळफूल बाहेर पडल्यावर मर्यादित फण्या (८ ते ९) ठेवून केळफूल कापावे. कापलेल्या जागी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात द्रावण करुन ते ब्रशच्या सहाय्याने लावावे.
  • घडाचे वजन वाढून फळांना चकाकी येण्यासाठी घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून नॅपसॅक पंपाने दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. तसेच घड आकाशी रंगाच्या ६ टक्के सच्छिद्र पॉलीप्रोपीलीनच्या बॅगने झाकून घ्यावेत.
  • कांदेबाग व्यवस्थापन :

  • कांदेबाग वाढीच्या अवस्थेत आहे. जोराचा वारा किंवा गारपिटीमुळे पाने फाटून नुकसान झाल्यास नवीन येणारी पाने अधिकाधिक कार्यक्षम ठेवणे आवश्‍यक आहे.
  • अतिपावसामुळे दिलेली खते वाहून जातात. त्यामुळे पिकाला प्रतिझाड प्रति आठवडा युरिया १३ ग्रॅम अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ ग्रॅम अशी खतमात्रा एक महिन्यापर्यंत द्यावी.
  • बागेतील पिले व पिवळी तसेच रोगट पाने वेळोवेळी कापून त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी. बाग स्वच्छ ठेवावी.
  • बागेच्या चोहोबाजूंनी सजीव कुंपणाची लागवड केली नसल्यास ताबडतोब उंच वाढणारी मका किंवा ज्वारीची पश्‍चिम व उत्तर दिशेला दोन ते तीन ओळीत दाट लागवड करावी. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होईल.
  • पीक संरक्षण : गारपिटीमुळे पाने, खोड व फळांना इजा होते. परिणामी त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. त्यासाठी संपुर्ण झाडावर प्रतिबंधात्मक फवारणी करावी. प्रमाण - प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि. ढगाळ वातावरण व बागेतील आर्द्रता वाढल्यामुळे करपा तसेच इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी. प्रमाण - प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि. सूचना : फवारणी १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी. प्रत्येक फवारणीवेळी बुरशीनाशक बदलून घ्यावे.

    संपर्क : डॉ. रमेश देशमुख, ०२४६२-२५७३८८ (केळी संशोधन केंद्र, नांदेड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com