शेततळ्याची राखा योग्य पद्धतीने निगा

शेततळ्यात अस्तरीकरणासाठी योग्य गुणवत्तेची प्लॅस्टिक फिल्म वापरावी.
शेततळ्यात अस्तरीकरणासाठी योग्य गुणवत्तेची प्लॅस्टिक फिल्म वापरावी.

शेततळे खोदल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने व गाळाने भरण्याची शक्यता असते. तसेच पाणी योग्य प्रमाणे आत येणे, बाहेर जाणे या बाबीही शेततळे दीर्घकाळपर्यंत टिकून राहण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे शेततळे खोदताना संबंधित बाबींचा विचार करून रचना कराव्यात. शेततळ्याची खोदलेली माती वापरून शेततळ्याभोवती दोन मीटर रुंदीचा वर्म सोडून एक मीटर उंचीचा बांध घालावा. बांधाचा माथा एक मीटर बाजू उतार याचे प्रमाण १ः१.५ इतके ठेवण्यात यावे. पाणी आत येण्याचा मार्ग (इनलेट)

  • शेतात ज्या ठिकाणी शेततळे घेतले आहे तेथून ओघळीपर्यंत साधारण १० मीटर लांब आणि १.५ ते २ मीटर रुंदीचा इनलेट चर तयार करावा.
  • चराची खोली ०.५० मीटर पर्यंत घ्यावी. त्यास आवश्‍यक पण दोन टक्‍क्यांपेक्षा कमी उतार देऊन २० ते २५ सें.मी. जाडीच्या आकाराच्या दगडांचे आच्छादन करावे.
  • ओघळीचे पाणी इनलेटमध्ये घेण्यासाठी ओघळीमध्ये छोटेसे लुजबोल्डर स्ट्रक्‍टर करावे किंवा सिमेंटच्या मोकळ्या गोण्यांमध्ये वाळू भरून त्या ओघळीत आडव्या टाकाव्यात. जेणेकरून त्याचा उपयोग सिल्ट ट्रॅपसारखा होईल. ओघळीचे पाणी शेततळ्यात येईल.
  • पाणी बाहेर जाण्याचा मार्ग (आउटलेट)

  • शेततळे पाण्याने पूर्ण भरल्यानंतर जादा झालेले  पाणी ओघळीमध्ये सुरक्षितपणे सोडण्यासाठी आऊटलेट तयार करावे.
  • इनलेटप्रमाणेच आऊटलेटचे काम करावे. रुंदी १.५० ते २ मीटर खोली ०.५० मीटर व तळाची धूप होऊ नये म्हणून उतार २ टक्‍क्यांपेक्षा कमी ठेवावा. तळास दगडी आच्छादन करावे.
  • आउटलेटमधून बाहेर जाणारे पाणी शेतीसाठी जेव्हा पाहिजे तेव्हा घेण्यासाठी पाट करून घ्यावा. आउटलेटची लांबी शेततळ्यापासून ओघळीपर्यंत साधारणपणे १० मीटर ठेवावी.
  • आउटलेट खोदकाम करताना त्याला जमिनीच्या प्रकारानुसार १.५ः१ किंवा २ः१ असे बाजू उतार द्यावेत. दोन टक्‍क्यांपेक्षा जास्त उतारावर ॲप्रॉन घालावे.
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्याच्या पद्धती
  • जानेवारी महिन्यापासून तापमान वाढत जाते. वाढत्या तापमानामुळे शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन पाणी साठा कमी होतो. परिणामी, पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पुरेसा पाणीसाठी उपलब्ध होत नाही.
  • बाष्पीभवन कमी करण्यासाठी विविध जैविक तेलाचा (निम तेल) वापर करावा. या तेलाचा वापर दर १५ दिवसांच्या अंतराने करावा. याचे प्रमाण साधारणतः ४० मि.लि. प्रतिचौरस मीटर असे असावे.
  • शेततळ्याचे आकारमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेततळ्याच्या आकारमानासंबंधित संशोधन करून पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार शेततळ्याचे आकारमान निश्‍चित केले आहे. तसेच साठलेल्या पाण्यातून संरक्षित सिंचनाच्या मात्रा निश्‍चित केल्या आहेत. शेततळ्यातील साठलेल्या पाण्यातून संरक्षित सिंचन हे सहा सें. मी. खोलीचे दोन वेळा देता येईल.

    पाणलोट क्षेत्र (हेक्टर)     शेततळ्याची माथ्याची लांबी, रुंदीसहीत खोली (मीटर)    बाजूचा उतार     आकारमान घनमीटर     संरक्षित सिंचन क्षेत्र (हेक्टर)     शेततळ्याने व्यापलेली  जागा टक्के
    १-२     २० x २० x ३ मीटर     १.५ : १     ७४१     ०.७५     ४.००
    २-३ २५ x २५ x ३ मीटर      १.५ : १  १२८१     १.५    ३.१३
    ३ पेक्षा जास्त     ३० x ३० x ३ मीटर     १.५ : १ १९७२    २.२५    ३.००

    शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर

  • साठलेल्या पाण्याचा पुनर्वापर योग्यरितीने करण्यासाठी पंपसेट, पाइपलाइन तसेच तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून कमीत कमी पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त क्षेत्रावर कार्यक्षमरित्या करता येईल.
  • पाणी देताना ते केव्हा व कसे द्यावे तसेच किती प्रमाणात द्यावे या गोष्टींचा विचार करावा. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल.
  • तुषार सिंचनाद्वारे पाणी देताना ६ सें.मी. खोलीचे संरक्षित सिंचन द्यावे.
  • शेततळ्याचे पाणी शक्‍यतो नगदी पिके तसेच फळबागांसाठी वापरावे. यामुळे निश्‍चित उत्पादन मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहतील.
  • खरीप हंगामात पावसाचा खंड असल्यास किंवा रब्बी हंगामात पिकांच्या गरजेनुसार एक किंवा दोन संरक्षित सिंचन देऊन जिरायती शेतीत उत्पादनात स्थिरता आणता येते.
  • शेततळ्यासाठी अस्तर

  • ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे तसेच पाणी पाझरण्याचा वेगही प्रचंड आहे तेथे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरलेले शेततळे काही दिवसांत कोरडे होते. पर्यायाने शेततळ्याचे अपेक्षित फायदे शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.
  • अभ्यासावरून असे दिसले की प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण पाणी साठविण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.
  • शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करावे.
  • अस्तरीकरणासाठी बेन्टोनाईट, माती-सिमेंट मिश्रण, दगड, विटा, सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. सिमेंट व माती प्रमाणात १ः८ व जाडी ५ सें.मी. इतकी ठेवावी.
  • प्लॅस्टिक फिल्मची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. यावर उन्हाचा किंवा अतिनील किरणांचा विपरीत परिणाम होत नाही.
  • प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरवताना मुरमाची अणकुचीदार टोके वर येऊ नयेत याची काळजी घ्यावी. तसे असल्यास सुक्‍या मातीचे किंवा वाळूंचे थर पसरून त्यावर प्लॅस्टिक फिल्मला घड्या पडणार नाहीत या पद्धतीने पसरावे.
  • शेततळ्याच्या चारही बाजूंनी माथ्यावर ३० सें.मी. x ३० सें.मी. आकाराचे चर खोदून घ्यावे. या चरात कापड फिल्म गाडून मातीने चर भरून घ्यावा. शेततळे तयार केल्यानंतर प्राणी फिल्म चावून खराब करू शकतात. तसेच गाई किंवा म्हशीसुद्धा शेततळ्यात पडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी शेततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करावे.
  • शेततळ्याची निगा

  • शेततळे काळ्या खोल जमिनीत खोदले असेल, तर अशा जमिनीत पाणी झिरपून पाण्याचे प्रमाण कमी राहते. शेततळ्यात गाळ राहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवण क्षमता कमी होते.
  • शेततळे घेणेपूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणेकरून पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबरच गाळ वाहून येणार नाही.
  • शेततळ्यास गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २x२x१ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि ज्या बाजूने पाणी निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पाण्यामुळे गाळणी होईल.
  • बऱ्याच ठिकाणी शेततळ्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर असे दिसले की, ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्यात पाणी जाणाऱ्या तोंडामध्ये व तसेच आऊटलेटमध्ये फांदेरी बंधारा किंवा दगड-विटांचा वापर करून उपचार केले आहेत, त्या शेततळ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. विशेषकरून ज्या शेतांमध्ये उताराला आडवी किंवा समतल मशागत केलेली आहे, अशा शेतातील शेततळ्यात गाळ व माती वाहून आलेली नाही. शेततळ्याच्या इनलेटमध्ये केलेल्या फांदेरी बंधाऱ्यांना (काळ्या खोल जमिनीतील) व इतर जमिनीत दगड-विटा वापरलेल्या ठिकाणी फार कमी प्रमाणात गाळ जमतो. फांदेरी बंधाऱ्याच्या वरच्या बाजूच्या खोलगट भागात गाळ साचतो.
  • बऱ्याच ठिकाणी शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी खालच्या तोंडातून मोकळे न वाहता ते शेततळ्याच्या वरच्या बाजूने शेतात मागे पसरलेले दिसते. याचा अर्थ असा, की शेततळ्याचे खालचे तोंड हे वरच्या तोंडापेक्षा उंच ठेवलेले आहे.  हे लक्षात घेता शेततळ्यात पाणी आत येणाऱ्या तोंडापेक्षा पाणी बाहेर जाणारे तोंड हे किमान सहा इंच तरी खाली असावे.
  • संपर्क : डॉ. मदन पेंडके : ९८९०४३३८०३ ( अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com