अवेळी पावसात घ्या हळदीची काळजी
अवेळी पावसात घ्या हळदीची काळजी

अवेळी पावसात घ्या हळदीची काळजी

सद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र हवामान खात्याने अवेळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. काही भागांना गारपिटीचाही तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत काढणी करून सुकविण्यासाठी टाकलेली हळद भिजण्याची दाट शक्‍यता आहे. हळद भिजल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी. हळद काढणीनंतर शिजवण्यात येते. अशी शिजवलेली हळद सुकण्यास टाकल्यानंतर भिजल्यास कडक बनते. तिला लोखंडी हळद असे म्हणतात. बाजारात तिला खूपच कमी भाव मिळतो. त्यामुळे सद्यःस्थितीत पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • हळदीचा पाला कापून ठेवल्यानंतर पाऊस आल्यास वाफसा आल्यानंतर लगेच काढणी करा. अन्यथा हळकुंडाच्या टोकांना कोंब फुटण्यास सुरवात होते. परिणामी हळदीतील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. प्रक्रिया केल्यानंतर हळकुंडावर सुरकुत्या पडतात.
  • हळदीची काढणी केली असल्यास ओली हळकुंडे पावसात भिजल्यावर त्यावर फारसा परिणाम होत नाही.
  • हळद शिजवणे सुरू असल्यास हळदीची काढणी करतेवेळी हळकुंडात ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो. तो शिजवल्यानंतर ८० ते ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढतो. हळद सुकविण्यासाठी टाकल्यानंतर १२ ते १५ दिवसांमध्ये तो ८ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो. साधारणतः ४ ते ५ दिवसांपर्यंत तो ५० ते ५५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान असतो. तोपर्यंत हळद पावसामध्ये भिजल्यास हळदीवर फारसा परिणाम होत नाही. परंतु हळद शिजवल्यापासून सुकायला टाकून ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाल्यास हळद पावसामध्ये भिजू देऊ नये. अन्यथा ती कडक/लोखंडी बनते.
  • उपाययोजना

  • पाऊस आल्यास हळद गोळा करता यावी यासाठी हळद सुकविण्यासाठी जुने शेडनेट, जुन्या साड्या, ताडपत्री यांचा वापर करा.
  • पुढील वर्षासाठी वापरण्यात येणारे बियाणे पावसामध्ये भिजणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा साठवणुकीमध्ये बियाणे सडण्याचा धोका राहील. तसेच पूर्ण सुकलेली हळदही कोणत्याही परिस्थितीमध्ये पावसामध्ये भिजू देऊ नये. त्यामुळे पाऊस येण्याच्या काळात बियाणे व सुकलेली हळद पॉलिथिनच्या कापडात तात्पुरती गुंडाळून ठेवावी. जेव्हा पाऊस संपून वातावरण पूर्ण कोरडे होईल तेव्हा पॉलिथिन कापडातून बियाणे वा सुकलेले हळकुंड बाहेर काढून ठेवावे.
  • संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९ (काढणी पश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा. जि. रायगड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com