फळबागांचे पुनरुज्जीवन फायद्याचे

जुन्या फळझाडांच्या मुख्य फांद्या ठेवून इतर फांद्यांची छाटणी करावी.
जुन्या फळझाडांच्या मुख्य फांद्या ठेवून इतर फांद्यांची छाटणी करावी.

फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटते. फळांचा आकार लहान होतो. अशा परिस्थितीत शेतकरी बागा सोडून नवीन बागेच्या लागवडीकडे वळतात, त्यामुळे खर्च वाढून नवीन उत्पन्न उशिरा मिळते. मात्र सुधारित तंत्रज्ञान, योग्य छाटणीचा वापर करून फळ बागांचे पुनरुज्जीवन करता येते.

बहुतांशी फळबागांचा ऱ्हास हा अपेक्षित उत्पादन देण्यापूर्वीच झालेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे फळबागांचा ऱ्हास होण्याची कारणे व जुन्या बागांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या यांची माहिती घेऊन उपाययोजना कराव्यात.

फळबागांचा अवेळी ऱ्हास होण्याची कारणे  

  • शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब न करणे.
  • फळबागांना संतुलित खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन न करणे
  • अयोग्य कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन
  • तांत्रिक माहितीचा अभाव आणि त्याचा योग्य वेळेस वापर न करणे.
  • लागवडीसाठी अयोग्य जमिनीची व कलमांची/ रोपांची निवड
  • कुचकामी व सदोष तण नियंत्रण
  • फळ पिकांचा लांब गर्भावस्था कालावधी
  • अयोग्य पद्धतीने फळांची काढणी
  • काढणीपश्चात व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष  
  • फळ झाडे १५ ते २० वर्षांची झाल्यानंतर  
  • जुन्या बागांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी

  • बारमाही फळ पिकांचे कॅनोपी व्यवस्थापन अनियमितपणे होत असते. कॅनोपीच्या अनियमित आकारामुळे मोठे नुकसान होते. कारण अशा फळ झाडांत हळूहळू फांद्यांची दाटी वाढते. परिणामी फांद्या एकमेकांत अडकून मोडतात. उत्पादनक्षम फांद्यांची संख्या घटते. परिणामी फळ उत्पादनात घट होते.
  • वेडीवाकडी वाढ झालेल्या फांद्यांची अन्नद्रव्य वहनक्षमता घटते. पंधरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांची नवीन फांद्या येण्याची क्षमता कमी झालेली असते.
  • दाट फांद्यांमुळे रोग व किडींचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. मिळणारी फळेदेखील चांगल्या प्रतीची नसतात. अशी बाग शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होत नाही.
  • जुन्या फळ बागांमध्ये झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. परिणामी नवीन पालवी फारच कमी येते. अशा प्रकारच्या बागांमध्ये कीटकनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी मोहोर तसेच फळे गळतात.
  • जुन्या बागांमधील झाडे फार उंच वाढलेली असल्याने फळे काढणे अवघड होते.
  • फळबाग पुनरुज्जीवनाची उद्दिष्टे

  • फळ बागांचे नूतनीकरण करण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे पुनरुज्जीवन.
  • उत्पादकता आणि फळ बागांचे आर्थिक वय (उत्पादनक्षम) वाढविणे.
  • कमी उत्पादक व रोगग्रस्त फळ झाडांचे उच्च उत्पादनक्षम झाडांत रूपांतर करणे.
  • फळ धारणेचा कालावधी कमी करणे.
  • फळांचे जास्तीत जास्त उत्पादन घेणे.
  • रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करणे.
  • उच्च प्रतीच्या फळांचे उत्पादन घेणे.
  • फळ बागांचे पुनरुज्जीवन करण्यामागील तत्त्वे

  • फळ झाडांचा वरील वाढता शेंडा कापून झाडांवर फळ धारण करणाऱ्या भागालगत नवीन फुटव्यांची संख्या वाढविणे.
  • फळ झाडांचा वाढता शेंडा कापून झाडांमधील मुळे व शेंडे यांच्यातील असमतोल दूर केला जातो. परिणामी झाडांवर नवीन फांद्यांची उगवण सुरू होते.
  •  संपर्क : शशांक भराड, ९६५७७२५७११ (उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com