योग्य प्रकारे करा रेशीम अंडीपुंजांची वाहतूक

रेशीम अळ्यांचे योग्य व्यवस्थापन
रेशीम अळ्यांचे योग्य व्यवस्थापन

हॅचिंग तारखेच्या किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या नजीकच्या शासकीय रेशीम कार्यालयात अंडीपुंजांची मागणी नोंदवावी. अंडीपूंज पुरवठा केंद्र ते कीटकसंगोपनगृहाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या वाहतुकीदरम्यान अंड्यातील नाजूक गर्भाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रेशीम कीटकांच्या अंडीपूंजांचा नियमित पुरवठा शासनाच्या अंडीपूंज निर्मिती केंद्र तसेच खासगी अंडीपूंज निर्मिती केंद्रावरून होत असतो. अंडीपूंज निर्मिती केंद्रात मागणीप्रमाणे विविध जातींची अंडीपुंज तयार केले जातात. आपणास हव्या असलेल्या अंडीपुंजाच्या हॅचिंग तारखेच्या (अंड्यांतून अळ्या बाहेर येण्याची क्रिया म्हणजे हॅचिंग) किमान १५ दिवस अगोदर आपल्या नजीकच्या शासकीय रेशीम कार्यालयात अंडीपुंजांची मागणी नोंदवावी. जेणेकरून आपणास वेळेत व आपल्या मागणीप्रमाणे अपेक्षित जातीच्या अंडीपुंज पुरवठा करणे शक्‍य होईल.

  • बऱ्याचदा शेतकऱ्यांना या गोष्टी माहिती नसल्याने ते अंडीपुंजांची वेळेत मागणी नोंदवत नाहीत. परिणामी अंडीपुंज वेळेत न मिळाल्याने कीटकसंगोपनास उशीर होतो, त्यामुळे किटकसंगोपन कार्यक्रम व तुती बागेतील तुतीची वाढ यांची सांगड न बसल्याने प्रत्येक टप्प्यावर परिणाम होऊन संपूर्ण नियोजन कोलमडते. असे वारंवार घडत राहिल्यास वर्षभरात रेशीम पिकांची संख्या कमी होऊन, कोषांचे वार्षिक उत्पादन व उत्पन्नही घटते. त्याचप्रमाणे तुती बागेची वेळेवेळी खुरपणी, खत खरेदी, खत देणेची मजुरी, तुती बागेला पाणी देणे इ. तुती बागेवर केलेला व्यवस्थापन खर्च वाढून निव्वळ नफ्यामध्ये घट होते. हे लक्षात घेता रेशीम किटकांच्या अंडीपुंजांची मागणी वेळेतच करणे आवश्‍यक आहे.
  • संपूर्ण वर्षभराचे रेशीम पिकांचे नियोजन करून त्याप्रमाणे आखणी व अंमलबजावणी करावी. तरच  प्रत्येक तुती पानाचे रुपांतर रेशीम अळ्यांच्या माध्यमातून दर्जेदार कोषात होते. यातून वर्षभरात अपेक्षित कोषोत्पादन मिळेल आणि उत्पन्नही वाढेल.
  • अंडीपूंज वाहतूक :

  • रेशीम कीटकांची अंडी, अंडीपूंज शीट तसेच अंडीपुंज पेटी सगळीकडे उपलब्ध अाहे. अंडी खसखशीपेक्षा आकाराने थोडी मोठी असतात. रेशीम अंडी लहान व नाजूक असल्याने अंडीपूंज निर्मिती केंद्र, अंडीपूंज पुरवठा केंद्र ते कीटकसंगोपनगृहाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या वाहतुकीदरम्यान अंड्यातील नाजूक गर्भाला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेणेकरून अंड्यातील वाढ होत असलेल्या गर्भावर परिणाम होत नाही.
  • अंडीपुंजांची चुकीच्या तसेच अशास्त्रीय पद्धतीने वाहतूक केल्यास अंड्यातील गर्भाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन एकाचवेळी अंड्यातून रेशीम अळ्या बाहेर न येणे (अनियमित हॅचिंग), अंड्यांमधील गर्भ मृत होणे अथवा गर्भ कमकुवत होणे यासारखे दुष्परिणाम संभवतात.
  • वाहतूक करताना महत्त्वाच्या बाबी :

  • अंड्यांमध्ये जिवंत गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे साधारणपणे अंडीपूंज निर्मितीनंतर तिसऱ्या ते पाचव्या दिवसांपर्यंत अंडीपुंजांची वाहतूक केली जाते. त्यानंतर वाहतूक केली गेल्यास काही अंशी अंडीपुंजांच्या हॅचिंगवर परिणाम होऊ शकतो, त्याचप्रमाणे रेशीम अळीची सुदृढ वाढ व कोषोत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असते.
  • अंडीपूंज निर्मिती केंद्रात अंडीपुंज शीतगृहात असल्यास असे अंडीपूंज एकदम उघड्या वातावरणात न आणता प्रथम काही वेळ शीतगृहातच १५ अंश सेल्सिअसवर ठेवून नंतरच खोलीतील साधारण तापमानात आणून ठेवावेत. त्यानंतरच वाहतूक करावी. जेणेकरून अंड्यातील गर्भावर अचानक घडलेल्या कमी-जास्त तापमानाचा परिणाम होणार नाही.
  • अंडीपुंजांचा प्रखर सूर्यप्रकाश व जास्त तापमानापासून संरक्षण करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळच्या थंड वातावरणात वाहतूक करावी. त्याचप्रमाणे पावसाळी वातावरणात अंड्यांच्या पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करावे.
  • अंडीपूंजांची वाहतूक हवाबंद खोक्‍यात न करता अंडीपूंज वाहतुकीसाठी विशेष अशी सच्छिद्रयुक्त पिशवी वापरावी. प्लॅस्टिक पिशवीचा वापर करू नये.
  • अंडीपुंजांचा तंबाखुशी संपर्क येऊ देऊ नये. त्याचप्रमाणे वाहतुकीदरम्यान अंडीपूंज पेट्रोलियम पदार्थ, कीटकनाशके, खते, रॉकेल यांच्या संपर्कात न ठेवता सुटसुटीत, सैलसर, वायुविजनाची चांगली व्यवस्था असेल अशा ठिकाणी ठेवावेत.
  • वाहतुकीच्या वेळी अंडीपूंजांची आदळ-आपट होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • एसटीतून वाहतूक करताना ड्रायव्हरसाठी असलेल्या कॅबीनमध्ये तसेच प्रवाशांच्या बॅगा ठेवण्यासाठी असलेल्या जागेत अंडीपूंज ठेवू नये.
  • प्रवासाच्या वेळी डोक्‍याखाली उशी म्हणून अंडीपूंजांच्या पिशवी किंवा बॉक्‍सचा वापर करू नये. त्याचप्रमाणे ब्रिफकेस किंला सुटकेसमध्ये अंडीपूंज ठेवू नये.
  • अंडीपूंज कागदाची घडी घालू नये. कोणत्याही सामानाचा बोजा पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • अंडीपूंज वाहतुकीसाठी साधने :

  • अंडीपूंज वाहतुकीसाठी सच्छीद्र लाकडी पेटी, सच्छीद्र थर्माकोल पेटीचा वापर केला जातो. तथापि केंद्रीय रेशीम मंडळाच्या सी.एस.आर. अँड टी.आय., म्हैसूर यांनी खास रचना असलेली सछिद्र पिशवीची निर्मिती केली आहे. या पिशवीमध्ये अंडीपूंज सुटसुटीत - सैलसर रहाण्यासाठी पिशवीमध्येच अंडीपूंज कागद अडकविण्यासाठी लोखंडी हॅंगरची व्यवस्था केली आहे. ज्यामुळे अंडीपुंजांवर कोणत्याही प्रकारचा दाब पडत नाही.
  • सछिद्र पिशवीमधून १०० कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी अंडीपुंजांची वाहतूक करावयाची असल्यास पिशवीच्या बाहेरील बाजूस हलका पाण्याचा फवारा मारल्यास पिशवीतील वातावरण थंड राहण्यास मदत होते. या पिशवीमध्ये तापमान व आर्द्रता योग्य राखणेसाठी ओल्या स्पंज पट्ट्या ठेवण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे पिशवीतील तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस व आर्द्रता ६५ ते ८५ टक्केपर्यंत रहाण्यास मदत होऊन वातावरणातील कमी-जास्त तापमानाचा अंड्यातील गर्भावर परिणाम होत नाही. गर्भही सुरक्षित राहण्यास मदत होते. 
  • संपर्क : संजय फुले , ९८२३०४८४४० (प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com