डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक अवशेष

डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक अवशेष
डिंकपोस्टिंग कल्चरद्वारे लवकर कुजवा पीक अवशेष

शेतीतील टाकाऊ मानले जाणारे पिकांचे अवशेष योग्य रीतीने कुजवल्यास त्यापासून चांगल्या दर्जाचे सेंद्रिय खत उपलब्ध होऊ शकते. या प्रक्रियेसाठी नैसर्गिकरीत्या लागणारा दीर्घ कालावधी कमी करण्यासाठी अवशेष कुजवण्याची क्रिया वेगाने करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करता येतो. डिंकपोस्टिंग कल्चरच्या वापराविषयी माहिती घेऊ.

  • केवळ रासायनिक खतांचा वापर केल्यास पुढे एका टप्पानंतर पिकांच्या उत्पादन स्थिर होते, किंवा कमी होत जाते. त्याच प्रमाणे जमिनीच्या सुपीकतेवरही विपरीत परिणाम होतो. अलीकडे राज्यातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत चालले आहे. हे टाळण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे गरजेचे आहे.
  • पशुधनापासून मिळणारे शेण, मुत्र, गोठ्यातील टाकाऊ पदार्थ, शेतीतील वाळलेला पाला पाचोळा, वाळलेले गवत, पिकांचे टाकाऊ अवशेष, टाकाऊ भाजीपाला, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, कोंबड्यांची विष्ठा, शेळया-मेंढ्यांच्या लेंड्या यापासून उच्चप्रतीचे सेंद्रिय खत मिळू शकते. यातील शेणखत, लेंडीखत, पोल्ट्री खत यांचा वापर काही प्रमाणात शेतकरी करतात. मात्र, ताज्या स्वरुपातील ही खते पिकांना लगेच उपलब्ध होत नाहीत. त्याऐवजी त्यापासून कंपोस्ट खत, गांडुळखत तयार केल्यास फायदा होतो.
  • कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणारा नैसर्गिक कालावधी हा जास्त असतो. प्रचलीत पद्धतीने सेंद्रिय खत तयार करण्यासाठी किमान ३-४ महिन्यांपासून ५ ते ६ महिन्यांपर्यंत कालावधी लागतो. परिणामी शेतकऱ्यांमध्ये फारशी उत्सुकता राहत नाही. कच्चा माल शेतकऱ्यांकडे उपलब्ध असूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात.
  • कंपोस्टिंगचा कालावधी कमी करण्यासाठी काही जैविक घटक मदत करू शकतात. अशा जिवाणूंपासून जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये डिंकपोस्टिंग कल्चर तयार करण्यात येते. अशा कल्चरचा वापर पिकांचे अवशेष कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये केल्यास कुजवण्याचा कालावधी निम्म्याने कमी करता येतो.
  • असा करावा डिंकपोस्टिंग कल्चरचा प्रभावी वापर 

  • टाकीमध्ये १०० लिटर पाणी घेऊन, त्यात १ किलो बारीक केलेला गुळ मिसळावा. पाणी काठीच्या साह्याने हलवून हा गूळ विरघळून घ्यावा.
  • या पाण्यामध्ये डिंकपोस्टिंग कल्चर मिसळावे. ते चांगल्या रीतीने शक्यतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध अशा प्रकारे ढवळून घ्यावे.
  • टाकीचे तोंड जाडसर कपड्याने अथवा बारदानाने घट्ट बांधावे.
  • द्रावण दोन ते चार दिवस तसेच ठेवावे. त्यामुळे त्यात जिवाणूंची वाढ होते.
  • सावलीच्या ठिकाणी घट्ट केलेल्या सपाट जमिनीवर किंवा जमिनीवर प्लॅस्टिक पसरावे. त्यावर १ टन काडीकचरा, वाळलेले गवत, पिकाचे टाकाऊ अवशेष, जनावरांच्या गोठ्यातील टाकाऊ पदार्थ यांचा साधारणत: १ फुटाचा पसरट ढीग तयार करावा. लांबी व रुंदी सोईनुसार ठेवावी.  टाकीतील २० लिटर द्रावण या अवशेषांवर समप्रमाणात शिंपडावे.
  • त्यावर पुन्हा एक टनापर्यंत पीक अवशेष १ फुटाच्या थरात समप्रमाणात पसरून घ्यावे. त्यावर टाकीतील २० लिटर द्रावण समप्रमाणात शिंपडावे.  
  • साधारणपणे एकावर एक असे ५ थर होईपर्यंत वरीलप्रमाणे प्रक्रिया करावी. पाच टन पीक अवशेषांसाठी १०० लिटर जिवाणूंचे द्रावण यासाठी पुरेसे होईल.
  • पुढे या ढिगावर वेळोवेळी गरजेनुसार पाणी शिंपडत राहावे. पिकांच्या अवशेषांमध्ये साधारणत: ४०-५० टक्के ओल राखण्याचा प्रयत्न करावा. अतिरीक्त म्हणजेच वाहून जाण्याएवढे पाणी वापरल्यास त्यातून डिंकपोस्टिंग कल्चर वाहून जाण्याची शक्यता असते.
  • प्रत्येक आठवड्याला हा ढिगारा उपसून खालचा थर व वरचा थर खाली या प्रमाणे प्रक्रिया राबवावी.
  • डिंकपोस्टिंग कल्चरमुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. परिणामी अवशेषांच्या ढिगाची उंची कमी कमी होत जाते.  
  • साधारणत: ४ ते ६ आठवड्यात (३०-४५ दिवसांत) कंपोस्टखत तयार होते.
  • पाच टन पीक अवशेषापासून सुमारे ४ ते ४.५ टन कंपोस्टखत मिळू शकते.
  • वरील टाकीमध्ये तयार केलेल्या डिंकपोझिंग कल्चर द्रावणाचा वापर बीजप्रक्रिया, सिंचनाच्या पाण्यासोबत देण्यासाठी, पिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील शिल्लक अवशेषांवर फवारणीसाठी करता येतो.
  • संपर्क : ज्युली सव्वालाखे, ८८०५३४७२७० संपर्क : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (ज्युली सव्वालाखे या यवतमाळ येथील खासगी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये कार्यरत असून, जितेंद्र दुर्गे हे अमरावती येथील श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com