मशागतीद्वारे मातीचे व्यवस्थापन

बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया येथील प्रक्षेत्रामध्ये भात पिकानंतर त्याच शेतामध्ये केलेली गहू पिकाची लागवड.
बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया येथील प्रक्षेत्रामध्ये भात पिकानंतर त्याच शेतामध्ये केलेली गहू पिकाची लागवड.

मशागतीचे अनेक फायदे असले तरी गेल्या शतकामध्ये त्याचा अतिरेक होत गेला. जसजशी मोठी, ताकदवान यंत्रे उपलब्ध होत गेली, तसा मानवाचा मातीच्या उलथापालथीचा वेग वाढला. त्याचा फटका सुपीकतेला पर्यायाने पिकांच्या उत्पादनवाढीला बसला. यांत्रिक मशागत आणि शून्य मशागत या सध्या प्रचलित असलेल्या दोन्ही विचारसरणीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

पीक उत्पादनासाठी जमिनीची मशागत केली जाते. मशागतीच्या अनेक पद्धती आहेत. त्यात उदा. बीजरोपणासाठी छोटी छोटी छिद्रे तयार करणे, टोकणी, हाताने लागवड अशा अत्यंत सोप्या पद्धतीपासून यंत्राद्वारे क्लिष्ट अशा पद्धतीचा समावेश होतो.

  • प्राथमिक मशागत :  खोल नांगरण, यंत्राद्वारे जमिनीची उलटापालट इ.
  • द्वितीय मशागत :  जमीन समांतर करणे (लेव्हलिंग), पट्टा पद्धत, सरी वरंबा तयार करणे, उतार कमी करणे, मातीचे बांध घालणे, पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल, याकडे लक्ष देणे इ.
  • यातील काही पीक लागवडीपूर्वीच्या व काही पिकात आंतरमशागतीसाठी अवलंबल्या जातात.
  • शेतीच्या सुरवातीपासूनच माणसाने बीजरोपणासाठी हातापासून ते उपलब्ध साधनांचा वापर केला आहे. त्यातील कौशल्ये हळूहळू विकसित होत गेली. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात अधिक ताकदवान यंत्रे उपलब्ध झाल्याने जमिनीत अधिक खोलपर्यंत उलाढाल शक्य झाली. काम सोपे व कष्ट कमी झाल्याने या पद्धती जगभर स्वीकारल्या गेल्या. मात्र, याचे दुष्परिणामही त्याच काळात दिसून येऊ लागले. अठराव्या शतकाची अखेर ते एकोणिसाव्या शतकाची सुरवात या काळात युरोप अमेरिकेत अनेक धुळीची वादळे उठली. त्याचे मूळ अन्य कारणांइतकेच मशागतीच्या बदललेल्या पद्धतीत असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दशकापासून जगभरात किमान मशागत ते शून्य मशागत तंत्रापर्यंतचा प्रवास झाला आहे. वास्तविकत: हे जुनेच तंत्र आहे. मात्र, मध्यंतरी यंत्राच्या वाढत्या सुधारणांमुळे जमिनीची उलथापालथ करण्याची क्षमता वाढली. परिणामी जमिनीच्या सुपीक थरांचा विचार न करता जमिनीची खोल मशागत, सपाटीकरण यांनी वेग घेतला. त्याचा सर्वाधिक फटका जमीन सुपीकतेला बसला. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडेशन होत गेल्याने जमिनीची उत्पादनक्षमता घटत गेली आहे. जगभरात आज पारंपरिक मशागत पद्धती आणि शून्य मशागत या दोन्ही विचारसरणीचे पुरस्कर्ते आणि विरोधक आहेत. मशागतीच्या दृष्टीने सकारात्मक असलेल्या गटांच्या दृष्टीने खालील फायदे महत्त्वाचे ठरतात.

      मशागतीचे फायदे

  • मातीतील वायू व पाणी यांचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. त्यामुळे बिजांकुरणासह मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • तण नियंत्रण.
  • जमिनीवर यंत्रांचा किमान दबाव.
  • किडी व रोगकारक घटकांचे सुप्तावस्था जमिनीतून उन्हात आल्याने नष्ट होण्यास मदत.
  • शून्य मशागत तंत्राचे पुरस्कर्ते मात्र जमिनीमध्ये मशागतीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या खोलवर उलथापालथीला आक्षेप घेतात. या दोन्ही विचारसरणीतील सकारात्मक बाबींचा विचार करू. त्यानुसार जमिनीचे खालील दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.                                      
  •    मशागतीची गरज असलेले माती प्रकार   कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागतही चालू शकणारे माती प्रकार.
    चिकण मातीचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी  चिकण मातीचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक.
    केवोलोनाईट आणि इलाईट प्रकारचे खनिज असतात.   सेमेकटाईट या खनिजाचे प्रमाण अधिक असते.
    १ः१ आणि २ः१ प्रकारची क्ले (चिकण) माती     २ः१ प्रकारची क्ले (चिकण) माती

    संवर्धित शेती : येत्या दशकात भारतासह जगभरात कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब क्रांतिकारक बदलासाठी कारणीभूत ठरू शकेल. त्यातून यंत्राद्वारे जमिनीवर पडणारा दबाव कमी होईल. जमिनीवर कायमस्वरूपी वनस्पतींचे आच्छादन ठेवल्याने जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होईल. यांत्रिक मशागत व मशागतरहित शेतीसंदर्भात लुधियाना (पंजाब) येथील बोरलॉग इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया येथे प्रयोग सुरू आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यातील बारकावे प्रत्यक्ष अभ्यासण्याचा योग आला. त्यातून संवर्धित शेतीचे महत्त्व, गरज आणि आवश्यकता अधोरेखित होत आहे. त्याविषयी पुढील भागामध्ये पाहू.

    संपर्क :  डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४ (मृदशास्त्रज्ञ, मृदशास्त्रज्ञ पथक, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com