वेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ

...अशी करावी गुलाबाची छाटणी
...अशी करावी गुलाबाची छाटणी

गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी छाटणीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. छाटणीचे नियोजन करताना गुलाबाचा प्रकार, झाडाचा आकार, वय यानुसार काही बदल करावे लागतात. गुलाब हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फूलपीक असून, त्याची पॉलिहाऊसमध्येही लागवड केली जाते. पॉलिहाऊसमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या जाती या प्रामुख्याने डच जाती असून, लांब दांड्याच्या फुलांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. या जातींपासून वर्षभर फुले उपलब्ध होऊ शकतात. मात्र, बाजारपेठेचे नियोजन आणि हंगामानुसार फुलांच्या उपलब्धेतेसाठी छाटणी करणे गरजेचे असते. साध्या शेतीमध्ये लागवडीखाली असलेल्या जाती वेगळ्या असून, त्यामध्येही उत्तम प्रतीचे गुलाब मिळविण्यासाठी छाटणी आवश्यक असते. गुलाबातील छाटणी नेमकी कशी करायची याविषयी माहिती घेऊ.

छाटणीचे फायदे :

  • झाडांच्या काही फांद्या कापून काढल्यास नव्या फुटी चांगल्या येण्यास मदत होते. या नव्या फुटींवर येणारी फुले आकाराने मोठी व संख्येने अधिक मिळतात.
  • छाटणीमुळे झाडाचा आकार आणि आकारमान मर्यादित ठेवता येते.
  • झाडाच्या खोडावर फांद्या व उप फांद्यांचा समतोल राखता येतो.
  • छाटणीमुळे झाडात हवा व सूर्यप्रकाश खेळता राहतो. परिणामी रोगकिडीचे प्रमाण कमी होते.
  • गुलाबाची छाटणी फांद्याची विरळणी, झाडाला आकार आणि नवीन फूट येण्याच्या उद्देशाने केली जाते. त्यामुळे छाटणी करताना प्रथमतः जुन्या वाळलेल्या, कमकुवत, एकमेकात गुंतलेल्या, रोग व कीडग्रस्त फांद्या तळापासून काढून टाकाव्यात. तसेच एक वर्षाची जुनी वाढ एका विशिष्ठ उंचीपर्यंत अथवा लांबीपर्यंत ठेवून पूर्ण छाटावी. यामुळे नव्याने येणारी फूट जोमदार, निरोगी येते.
  • छाटणीची वेळ :

  • गुलाब झाडांची छाटणी वेळेत करण्याची आवश्यकता असते. आपल्या उद्देशाने त्याची वेळ निश्चित करावी. गुलाबाची छाटणी वेळेत केल्यास नवीन फुटीच्या वाढीसाठी, पक्वतेसाठी आणि गुलाब फुलांच्या वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळतो.
  • छाटणी वेळेच्या आधी केल्यास हंगामाआधी फुले मिळण्यासोबतच दर्जामध्ये घट होते. उशिरा छाटणी केल्यानेही उत्पादनात घट येते.
  • बागेतील रोग-कीडग्रस्त, वाळलेल्या फांद्या, अनियमित वाढलेल्या फांद्यांची छाटणी त्वरीत करून घ्यावी. अन्यथा रोगांच्या प्रादुर्भावात वाढ होण्यासह झाडाचा आकार बदलतो. अशा फांद्या तळापासून काढून टाकाव्यात.
  • गुलाबाच्या छाटणीसाठी झाडाची विश्रांती, अवस्था किंवा झाडाच्या वाढीची स्थिती यांचा विचार करावा. झाडांची वाढ मंद झाल्याचे निदर्शनास आल्यास छाटणीची वेळ आल्याचे समजावे.
  • छाटणीची योग्य वेळ ही स्थानिक हवामानावर अवलंबून असते. भारतात स्थानिक हवामानानुसार पावसाळा संपल्यानंतर हिवाळी हंगाम सुरू होण्याचा काळ गुलाब छाटणीसाठी योग्य असतो. मात्र, रोज फुलांची काढणी होत असताना नकळत छाटणीही होत असते.
  • उत्तर भारतात गुलाब वर्षातून एकदा छाटतात. आठ दिवसांच्या अंतराने केलेली छाटणी डिसेंबरपासून मार्चपर्यंत उत्तम फुलांच्या उत्पादनाचे सातत्य टिकवून ठेवण्यास उपयोगी पडते.
  • महाराष्ट्राच्या हवामानात गुलाबाची वर्षातून दोनदा छाटणी केली जाते. पहिली छाटणी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर तर दुसरी जून महिन्यात केली जाते.
  • डोंगराळ प्रदेशात गुलाबाची मार्च किंवा एप्रिल महिन्यात छाटणी करतात. छाटणीच्या वेळेतील विविधतेमुळे भारतात गुलाबाची फुले वर्षभर उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • छाटणी करताना घ्यावयाची काळजी :

  • गुलाबाच्या काडीवर एक आड एक असे डोळे असतात. काडीवरील डोळ्याचे स्थान छाटणीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. नवीन फूट आपणाला बाहेरील अथवा आतील बाजूस हवी, ते काडीवरील डोळ्याचे स्थान ठरवतो. डोळ्याचे हे स्थान ओळखून काडी छाटावी.
  • छाटणी करताना डोळ्याच्या वर घेतलेला काप हा डोळ्याच्या विरुद्ध दिशेस उतार होईल असा घ्यावा. काप कधीही सपाट घेऊ नये. सपाट कापामुळे पाणी साठून रोगाची लागण होते.
  • डोळ्याच्यावर अर्धा सें.मी. उंचीची काडी ठेवून छाटणी करावी. यापेक्षा जास्त काडीची उंची ठेवल्यास मर रोगाची लागण होण्याची शक्यता असते. काप डोळ्याच्या फार जवळही घेऊ नये. डोळ्याच्या जवळ काप घेतल्यास डोळ्यास इजा होण्याची शक्यता असते.
  • छाटणी धारदा सिकेटरने करावी. छाटणी करताना काडी चिंबनार नाही, तसेच साल सोलली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा अशा जखमांमधून रोगाची प्रादुर्भाव होतो.
  • खबरदारीचा उपाय म्हणून छाटणी संपताच कापलेल्या भागावर १०% बोर्डोपेस्ट लावावी.
  • संपर्क :  डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वित पुष्प संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com