टोमॅटो लागवडीची तयारी...

टोमॅटो लागवडीसाठी पॉलिमल्चिंगचा वापर फायदेशीर ठरतो.
टोमॅटो लागवडीसाठी पॉलिमल्चिंगचा वापर फायदेशीर ठरतो.

टोमॅटो या फळपिकाच्या पुनर्लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार करावी. सरी वरंबा किंवा गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन पद्धतीने लागवड करावी. पूर्वी फळवर्गीय भाजीपाला घेतलेल्या जमिनीत पुन्हा टोमॅटो लागवड टाळावी. बी पेरणीपासून २५ ते ३० दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे १२ ते १५ सें.मी. उंचीची झाल्‍यावर रोपांची पुनर्लागवड करावी. रोपांची पुनर्लागवड सरी वरंब्‍यावर करावी.

  • लागवडीसाठी वाफ्यातून राेपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात. रोपांची पुनर्लागवड संध्‍याकाळी किंवा उन कमी झाल्‍यावर करावी.
  • ज्या जमिनीत आधीच्या हंगामात टोमॅटो, भेंडी, वांगी, बटाटा, वेलवर्गीय भाज्या आदी पिकांची लागवड केलेली असेल अशा जमिनीत टोमॅटोचे पीक घेण्याचे टाळावे. कारण अशाठिकाणी  पहिल्या पिकावर आलेल्या रोगकारक बुरशी व कीडी यांचा नवीन टोमॅटो पिकावर त्वरीत प्रादुर्भाव होतो.  
  • रोपांची लागवड करण्यापूर्वी शेत तयार करून घ्यावे. त्यासाठी शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. वखरणीपूर्वी जमिनीत हेक्‍टरी १०-१२ टन (३० ते ४० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • हलक्या व मध्यम जमिनीत जोड ओळ पद्धतीने (गादीवाफा) लागवड करावी. गादीवाफ्याची लांबी शेताच्या सोयीनूसार पण रुंदी ४ फूट एवढी ठेवावी. दोन रोपातील अंतर २ ते २.६ फूट ठेवावे. एकाच ओळीत लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर १.६ ते २ फूट ठेवावे.
  • भारी जमिनीत एक ओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर २ फूट ठेवावे. भारी जमिनीत जोडओळ पद्धतीने लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर २.६ फुटापेक्षा अधिक ठेवावे.
  • रोपांची लागवड गादीवाफ्यांवर करण्यापूर्वी गादी वाफा ठिबक सिंचन संच चालवून भिजवून घ्यावा. त्याचवेळी ठिबक सिंचनातून प्रतिएकरी ३ लिटर ट्रायकोडर्मा प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करुन सोडावे. शेतात जीवाणूजन्य मर रोगाचा नियमित प्रादुर्भाव होत असल्यास प्रतिएकरी २ क्विंटल निंबोळी ढेप टाकावी.  
  • रोपांची लागवड करताना रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. रोप लावल्यानंतर कडेची माती चांगली दाबून घ्यावी. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खोड ताबडतोब पिचते व अशी रोपे नंतर दगावतात.
  • लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांच्या आत ज्या रोपांची मर झाली असेल त्या ठिकाणी नवीन रोपे लावून नांगे भरून घ्यावेत.
  • खत व्यवस्थापन :

  • साधारणपणे एकरी १० ते १२ टन इतकी शेणखताची मात्रा  टाकावी. गादीवाफे तयार करताना कोणत्याही रासायनिक खतांचे बेसल डोस देऊ नये.
  • सरळ वाणांसाठी एकरी ८० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी खते द्यावीत. संकरीत वाणांसाठी १०० किलो नत्र, ७० किलो स्फुरद व ७० किलो पालाश या प्रमाणात खत द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर १५, २५, ४०, ५५ दिवसांनी समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावी. खते बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावीत व मातीआड करावीत.
  • खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
  • संकरित, सुधारित आणि सरळ वाणासाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट, १० किलो मॅंगेनीज सल्फेट, ३ किलो कॅल्शियम सल्फेट, २ किलो बोरॅक्‍स आणि १० किलो मॅग्नेशिअम सल्फेट अशी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. ती मात्रा लागवडीनंतर ७, ३०, ६०, ९० दिवसांनी समप्रमाणात विभागून द्यावी.
  • जैविक खतांमध्ये एकरी २ किलो अॅझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे प्रति १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
  • पाणी व्यवस्थापन :

  • रोपांच्‍या लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे आणि त्‍यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
  • रब्बी हंगामात ५ ते ७ दिवसांच्‍या अंतरांनी रोपांना पाणी द्यावे. भारी काळ्या जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात. हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त तर भारी जमिनीत कमी द्याव्यात
  • पीक फुलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्त्वाचे आहे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे, फळे तडकणे या समस्या निर्माण होतात.
  • पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. परिणामी झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.
  • पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची अतिवाढ होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत म्हणजे लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.
  • पाणी देण्यास ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यामुळे पाण्‍याची ५० ते ५५ टक्‍के बचत होऊन उत्‍पन्‍नात ४० टक्‍के वाढ होते. ठिबक संचामधून पाणी देताना दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढे पाणी मोजून द्यावे.
  • पॉलिमल्चिंगवरील लागवड फायदेशीर : रोपांची पुनर्लागवड पॉलिमल्चिंग अंथरून केल्यास तणनियंत्रण, ओलावा व्यवस्थापन होऊन उत्पादनात वाढ होते. पॉलिमल्चिंगसाठी वरील बाजूस चंदेरी व खालील बाजूस काळा रंग असलेला किंवा दोन्ही बाजूंस काळा रंग असलेला कागद वापरणे फायदेशीर दिसून आले. एका बंडलमध्ये ४०० मीटर लांबीचा कागद असतो. पाच फूट अंतरावर गादी वाफे काढल्यास एकरी सहा बंडल लागतात. खाली अाणि वर निळा-निळा, तांबडा-तांबडा, काळा-काळा असे रंग असलेल्या कागदांमध्ये काळा-काळा व चंदेरी-काळा रंगांचे पेपर वापरणे फायदेशीर पडते.

    मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे

  • पिकातील तणांचे नियंत्रण
  • मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत
  • पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत
  • पाण्यात विरघळणारी खते वाफ होऊन उडून जात नाहीत. परिणामी खतांची बचत होते.
  • जास्तीची थंडी किंवा उष्ण तापमान यापासून मुळांचे संरक्षण होते.
  • मातीचे तापमान नियंत्रित राहते. परिणामी, अन्नद्रव्यांचे विशेषतः थंडीमध्ये चांगले शोषण. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे जिवाणूंचीही चांगली वाढ होते.
  • अतिवृष्टीपासून उंच गादीवाफ्याचे, परिणामी पिकांचे चांगले संरक्षण होते.
  • टोमॅटोच्या फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते.
  • रोग व किडींचे चांगले नियंत्रण.
  • संपर्क : गजानन तुपकर, ८२७५४१२०६४ (विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com