आडसाली ऊस लागवड फायदेशीर

आडसाली ऊस लागवडीसाठी एक किंवा दोन डोळे असलेल्या बेण्यांचा वापर करावा.
आडसाली ऊस लागवडीसाठी एक किंवा दोन डोळे असलेल्या बेण्यांचा वापर करावा.

आडसाली हंगामामध्ये लावलेला ऊस जोमदार वाढतो. सुरू हंगामातील उसापेक्षा दीडपट उत्पादन मिळते. कारण उगवणीपासूनच पिकाला अनुकूल हवामान मिळते. तसेच दोन पावसाळे मिळतात आणि जोमदार वाढीचा कालावधी १० ते ११ महिन्यांचा मिळतो. त्यामुळे आडसाली उस लागवड फायदेशीर ठरते. हवामान : ऊस पिकाची चांगली वाढ होण्यासाठी उष्ण व दमट हवामान तसेच साखर तयार होण्यासाठी थंड व कोरडे हवामान आवश्‍यक असते. जुलै - ऑगस्टमध्ये साधारणत: २१ ते २९ अंश सेल्सिअस तापमान व ९५ टक्के आर्द्रता असते. परिणामी पिकाची उगवण ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत होऊन भरपूर फुटवे येतात. ऊसवाढीच्या काळात ऊसाला सूर्यप्रकाशाची गरज असते आणि पक्वतेच्या कालावधीमध्ये किमान तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस असल्यास उसामध्ये साखर जास्त प्रमाणात तयार होते.

जमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी १ ते १.५ मीटर खोलीची, मध्यम काळी जमीन, ६० टक्केपेक्षा जास्त जलधारणाक्षमता असलेली, सुपीक जमीन (सामू ६.५ ते ८.५) असावी. क्षारांचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा कमी,चुनखडीचे प्रमाण १५ टक्के पेक्षा कमी व सेंद्रिय कर्ब किमान ०.५ टक्के असावा.   

पूर्वमशागत : अधिक उत्पादनासाठी योग्य व वेळेवर पूर्वमशागत आवश्‍यक असते. उसाची मुळे ९० ते १०० सें. मी. पर्यंत खोल जाऊन खालील थरातील अन्न व पाणी शोषून घेतात. परिणामी उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीतील अंतर वाढले तरी ऊस पीक तग धरू शकते. तसेच मुळे खोल गेल्यामुळे ऊस लोळण्याचे प्रमाणही कमी राहते. पूर्वमशागतीच्या वेळी नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळविणे, जमिनी सपाट करणे, रानबांधणी करणे या कामांचा समावेश होतो. पूर्वीचे पीक काढल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी. पहिल्या नांगरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी आडवी नांगरट करावी. नांगरणीमुळे जमीन मोकळी होऊन पाणी जमिनीत सहज मुरते, हवा खेळती राहते. पाण्याचा चांगला निचरा होतो. पूर्वीचे पिकाचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन सेंद्रिय पदार्थांची भर पडते. नांगरणीनंतर जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. त्यानंतर जमिनीत ढेकळे असल्यास कुळवाने अगर मैंद चालवून फोडावीत त्यामुळे सरी चांगली पडते. पिकास पाणी समप्रमाणात मिळण्यासाठी जमीन समपातळीत करून घ्यावी. साधारणपणे जमिनीस ०.३ टक्केपर्यंत उतार ठेवावा. जमीन सपाट केल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार मध्यम काळ्या जमिनीत १ मीटर तर भारी काळ्या जमिनीत १.२० मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पाण्याची बचत व पिकास जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी मध्यम काळ्या जमिनीत ७५ सें.मी. व भारी जमिनीत ९० सें.मी. अंतरावर सऱ्या काढून पहिल्या दोन सऱ्या उसाच्या लागवडीसाठी तयार कराव्यात. तिसरी सरी सपाट करून रानबांधणी करावी.

बेणे प्रक्रिया : प्रति १०० लिटर

  • कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम - द्रावण करून त्यात बेणे १० मिनिटे बुडवावीत.    
  • खवले कीडनियंत्रणासाठी वरील द्रावणात डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) २६५ मि.लि. किंवा मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही ३०० मि.लि. याप्रमाणात टाकून बेणे बुडवावे.
  • जिवाणूसंवर्धकाच्या बेणे प्रक्रियेसाठी अॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत १.२५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात तयार केलेल्या द्रावणात अर्धा तास बुडवून घ्यावेत. जिवाणूसंवर्धकाच्या बेणेप्रक्रियेमुळे नत्र खताची मात्रा ५० टक्के तर स्फुरदाची मात्रा २५ टक्के इतकी कमी करता येते.
  • लागवड : लागवडीसाठी एक डोळा किंवा दोन डाेळे टिपरी पद्धतीचा अवलंब करावा. जास्तीत जास्त उत्पादनासाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागवड करावी. टिपरे तयार करताना डोळ्याच्या वरील १/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (१ मीटर सरी अंतर) हेक्टरी ३०,००० टिपरी व भारी जमिनीसाठी (१.२ मीटर सरी अंतर) हेक्टरी २५,००० टिपरी बेणे लागते. एक डोळा पद्धतीने लागवड करताना दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. व दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांची लागवड करताना दोन टिपऱ्यामध्ये १५ सें.मी. अंतर ठेवून डोळे बाजूस येतील अशा पद्धतीने लागवड करावी. आडसाली हंगामात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने लागवड सरीच्या बगलेत करावी. हलक्या मध्यम जमिनीत आेली लागवड करावी तर भारी चोपण / खारवट जमिनीत कोरड्या पद्धतीने ऊस लागवड करावी. पट्टा पद्धतीने लागवड करताना मध्यम जमिनीत ७५ सें.मी. वर दोन ओळी लावून १५० सें.मी. रुंदीचा पट्टा ठेवावा तर भारी जमिनीत ९० सें.मी. वर दोन ओळी लावून १८० सें.मी. रुंदीचा पट्टा ठेवावा.

    आंतरमशागत :

  • लागवडीनंतर वाफसा येताच हेक्टरी अॅट्राझीन किंवा मेट्रीब्युझिन १.४ किलो प्रति १,००० लिटर पाणी याप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणीनंतर ४ दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारची मशागत करू नये.
  • उसात नांग पडले असल्यास रोपांची त्याठिकाणी लागवड करावी. रोपनिर्मितीसाठी लागवडीच्या वेळीच एका पाटात एक डोळा टिपऱ्यांची लागवड करावी.
  • तणनाशकांच्या फवारणीनंतरही काही दिवसांनी उगवणाऱ्या तणांच्या निर्मूलनासाठी एक- दोनवेळा खूरपणी करावी.
  • पिकास नत्राची मात्रा चार हफ्त्यात द्यावी. नत्राची दुसरी मात्रा देताना कृषिराज औजार चालवून खत जमिनीत चांगले मिसळावे. पीक १२ - १४ आठवड्यांचे असताना नत्राची तिसरी मात्रा देऊन बाळबांधणी करावी. यासाठी निम्मा वरंबा लाेखंडी नांगराच्या सहाय्याने फोडून ऊसास हलकी भर द्यावी. भर दिल्यामुळे उसाला नंतर फुटवे फुटण्यास प्रतिबंध होतो.
  • पक्की बांधणी करताना खताची शेवटची मात्रा देऊन संपूर्ण वरंबा पहारीच्या औजाराने किंवा लोखंडी नांगराने फोडून सायन कुळवाने कुळवावे. यामुळे ढेकळे बारीक होऊन तणांचाही बंदोबस्त होतो. दोन ओळींतील कुळविलेल्या क्षेत्रात रिजर चालवून पिकास भर द्यावी. त्यामुळे वरंब्याच्या ठिकाणी सऱ्या निर्माण होतात.
  • पाणी व्यवस्थापन : पिकाची पाण्याची गरज ही वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हंगाम यावर अवलंबून असते. जास्त पाणी दिल्यास जमीन क्षारपड होण्याची शक्यता असते. वाढीच्या सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते. मात्र बांधणीनंतर जास्त पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे वाढीच्या अवस्थेत  पावसाळ्यात (जुलै - ऑक्टोबर) १५ -२० दिवसांनी, हिवाळ्यात (नोव्हेंबर - फेब्रुवारी) १८ - २० दिवसांनी तर उन्हाळ्यात (मार्च - जून)  ८ - १० दिवसांनी पाणी द्यावे. आडसाली उसास साधारणपणे ३८-४० पाळ्या द्याव्या लागतात. उगवण व फुटवा फुटण्याच्या काळात साधारणपणे ८ -१० सें.मी. (वरंब्यांच्या अर्ध्या उंचीपर्यंत) पाणी द्यावे. बांधणीनंतर जाेमदार वाढीच्या काळात १० - १२ सें.मी. (वरंब्याच्या २/३ उंचीपर्यंत) व पक्वता कालावधीमध्ये ७ - ८ सें.मी. पाणी एका पाळीस द्यावे.  

    जाती आडसाली ऊस पीक साधारणत: १५ ते १७ महिने शेतात उभे असते. त्यामुळे लागवडीसाठी मध्यम पक्व होणाऱ्या को- ८६०३२ (नीरा) व को एम ०२६५ (फुले २६५ ) या जातींची निवड करावी. खत व्यवस्थापन : हेक्टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत दोन समान हफ्त्यात द्यावे. पहिला हफ्ता पहिल्या नांगरणीनंतर द्यावा. उर्वरित हफ्ता लागवडीच्या अगोदर सरीत द्यावा.

                               रासायनिक खत मात्रा (किलो प्रति हेक्टर )

    खतांचा हप्ता     आडसाली हंगाम (किलो/हेक्टर) आडसाली हंगाम (किलो/हेक्टर) आडसाली हंगाम (किलो/हेक्टर)
        नत्र   स्फुरद     पालाश
    लागणीचेवेळी  ४०      ८५      ८५    
    लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी      १६० --- ---
    लागणीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी   ४० --- ---
    बांधणीचे वेळी     १६०   ८५    ८५
    एकूण               ४००   १७० १७०
    को. ८६०३२ साठी खताची मात्रा   ५००   २००  २०० 

     संपर्क : डॉ. एस. पी. घोडके, ९९६०४८२७८० (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com