अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे

अर्जुन लागवड
अर्जुन लागवड

अर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे. . विविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

अर्जुन वृक्षाचे उपयोग :

  • आयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी चिकित्सांमध्ये खोडाच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. खोडाची साल अर्जुनारिष्ठ, अर्जुन घृत , अर्जुन क्षीरपाक, ककुभादिचुर्ण, नागार्जुनाभ्र रस, प्रभाकर वटी आदी औषधेनिर्मितीसाठी वापरली जाते.
  • हृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात.  
  • सालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.
  • वसंतऋतूत वाढलेला कफ तसेच शरद ऋतूत वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा वापर केला जातो.
  • अतिसार, ताप व मुत्रविकारातही ही वनस्पती फारच उपयुक्त आहे.
  • लाकडाचे उपयोग :

  • अर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.
  • गाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत. कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.
  • कोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.
  • लाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.
  • टसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त
  • नैसर्गिक अधिवास व हवामान : हिमालयाच्या पायथयापासून ते मध्य दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते. समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, कोरडे, शुष्क पर्णझडी वनांमध्ये, विशेषत: पाण्याच्या जागेत, नद्या-नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते. शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली अाहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.

    लागवड तंत्रज्ञान : जमीन : अर्जुन वृक्षाच्या लागवडीसाठी पाणी धरून ठेवणारी भारी - मध्यम जमीन चांगली मानवते. वाढही चांगली मिळते.

    लागवड पद्धत : लागवड रोपांपासून किंवा खुंटनिर्मिती करून करावी. खुंट तयार करण्यासाठी १५ महिने वयाची रोपे वापरली जातात. लागवड जून-जुलै महिन्यात ५ x१० मीटर अंतरावर १.५ x१.५x१.५ फुट आकाराचे खड्डे घेऊन करावी. खड्डे खोदून भरतेवेळी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व माती यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपाने लागवड करावयाची असल्यास दोन वर्ष वयाची उंच रोपे लावावीत. लागवडीनंतर तण, गुरे, आग यांच्यापासून काळजी घ्यावी. अतिउन्हाळा, थंडी इ.पासून रोपांचे/रोपवनांचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्‍यक असते. योग्य खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहा-सात वर्षांत झाडे चार मीटरपर्यंत उंच वाढतात व घेर २५ सें.मी.पर्यंत वाढतो. वृक्ष वाढ धिम्या गतीने होते. पहिल्यावर्षी रोपांची वाढ केवळ ३० ते ३५ सें.मी. एवढीच उंच होते. ६ ते ७ वर्षात ३.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांना फळे येण्यास सुरवात होते.

    काढणी : झाडे ६ - ७ वर्षांची झाल्यानंतर जिवंत साल काढली जाते. साल काढताना ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ निवडणे आवश्‍यक आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढताना चारही बाजूंची साल न काढता एका बाजूची साल प्रथम १० x २० सें.मी. इतक्या भागाची काढावी. त्यानंतर त्यासमोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी. अशापद्धतीने राहिलेल्या भागाची साल काढावी. यापासून वर्षभरात अर्धा किलो वाळलेली साल मिळते. बाजारात अर्जुन पावडरला सध्या ५०० - ६०० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.

    वृक्षाची आेळख : शास्त्रीय नाव : Terminalia arjuna कुळ : Combreteceae अर्जुन कमी काळ पानगळ असलेला वृक्ष अाहे. उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच नवीन पाने धारण करतो. वृक्षाची साल जाड, गुळगुळीत पांढरट असते. वृक्ष सुमारे ८० फुटांपर्यंत उंच वाढतो. जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरून फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा एक आड एक असतात. पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात. फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बाेटभर भागावर एकवटलेली असतात. फळ गर्द बदामी, पाच पाकळ्या असलेले असते. फुले फेब्रुवारी - मार्च महिन्यात येतात. त्यानंतर फळे मे महिन्यापर्यंत परिपक्व होतात. अभिवृद्धी : अ) रोपवाटिका तंत्र : मे महिन्यात परिपक्व फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जाते. शक्यतो ताजी फळे रोपनिर्मितीसाठी वापरली जातात. एक किलोत साधारणत: ३५० फळे असतात. संस्करण न करता फळे रोपनिर्मितीसाठी वापरल्यास ६० टक्के तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ८० टक्के पर्यंत रुजवा मिळतो. गादीवाफ्यावर फळे दोन ओळीत अर्धा फुट अंतर ठेवून व दोन फळात १० सें.मी. अंतर ठेवून पेरावीत. वाफ्यावर फळे जमिनीत अर्धी व जमिनीवर अर्धी राहतील अशी पेरावीत. संस्करण केलेली फळे ८ ते १० दिवसांत रुजण्यास सुरवात होते. रोपवाटिकेत नियमित तण काढणी व पाणी खत व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पेरणीनंतर ३ महिन्यात रोपे १२ ते १५ सें.मी. वाढतात.

    ब) नैसर्गिक   पुनरुत्पादन : नैसर्गिक पुनरोत्पादन पावसाळ्याचे सुरुवातीच्या काळात नदीपात्रात आढळून येते. वळीव पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पालापाचोळ्यातील बियांचे सहज अंकुरण होते.

    संपर्क : डॉ. व्ही. एम. इल्लोरकर , ९४२२८३१०५३ (कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com