अॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान

अॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान
अॅस्परॅगस लागवड तंत्रज्ञान

आपल्या देशातील शतावरी वनस्पतीच्या कुळातील अॅस्परागस ही भाजीची जात आहे. ती अॅस्परागस ऑफिसिनॅलिस या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. या भाजीचे मूळस्थान युरोप आणि सैबेरिया आहे. युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, चीन देशांत मोठ्या प्रमाणात अॅस्परागसची लागवड होते. ताजे कोवळे कोंब खाण्यासाठी अॅस्परागसला मागणी आहे. आपल्या राज्यातील हवामानात याचे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. काश्‍मीरमध्ये या भाजीच्या कॅनिंगचा उद्योग चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.

आहारातील महत्त्व :

  • ही भाजी चवदार तसेच आरोग्यवर्धक आहे. यामध्ये कॅलरीज कमी असतात.
  • यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, ई, फोलिक आम्ल, तसेच सूक्ष्म खनिजे म्हणजे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम असते.
  • कमी प्रमाणात सोडियम आणि जस्त अशी पोषक द्रव्ये उपलब्ध होतात.
  •    जमीन :   योग्य जमीन, मशागतीचे तंत्र आणि बारमाही पाण्याची सोय असेल तर बागायती जमिनीत ॲस्परागसची लागवड केली, की ६ ते ८ वर्षे उत्पादन मिळत रहाते.

  • पोयट्याची, सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असलेली व मातीत रेतीचे पुरेसे प्रमाण आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. मुरमाड, खडकाळ, त्याचप्रमाणे पाणी जास्त काळ धरून ठेवणारी सखल, पाणथळ जमीन योग्य नाही.
  • जमिनीचा सामू ६ ते ६.५ असावा. जमिनीत बहुवर्षीय तण नसावेत.
  • लागवडीचे नियोजन :

  • लागवडीचे क्षेत्र समपातळीत असावे. एका बाजूस थोडा  उतार चालतो; पण शेताच्यामध्ये खोलगट भाग नसावा. कारण, खोलगट भागात पाणी साचून तेथील पीक चांगले येत नाही. उताराच्या शेवटी पाणी निचरा होण्यासाठी चर खोदावा. हा चर नेहमी स्वच्छ ठेवावा.
  • जमीन चांगली खोल नांगरावी, चांगली तापू द्यावी. आडवी-उभी नांगरट करून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. हिरवळीच्या पिकांची लागवड करून फुलोऱ्यात ही पिके जमिनीत गाडावीत. यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
  • जमिनीची पूर्वमशागत झाल्यावर दर एक मीटर अंतरावर ३० सें.मी. खोल व ३० सें.मी. खोल व ३० सें.मी. रुंदीचे समांतर चर खोदावेत. चर खोदून झाल्यावर ते चांगले वाळू द्यावेत. त्यानंतर चरातील खोदून वर काढलेल्या मातीत एकरी २० टन चांगले कुजलेले शेणखत, एक टन निंबोळी पावडर मिसळून चराची निम्मी खोली अंदाजे १५ सें.मी. भरून टाकावी. बाकी राहिलेला निम्मा खोल चर  रोपांची लागवड केल्यावर राहिलेल्या मिसळमातीने भरावयाचा आहे. म्हणून निम्मी माती चराच्या वरच्या बाजूस शिल्लक ठेवावी.
  • लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर एक मीटर, दोन रोपांतील अंतर ५० सें.मी. ठेवून करावी. एकरी  ८,००० रोपांची लागवड होते.
  • रोपनिर्मिती :

  • एक एकर क्षेत्रासाठी एक किलो बियाणे पुरेसे होते. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी. रोपवाटिकेत तयार केलेली रोपे १० ते १५ आठवड्यांची लागवडीस वापरली जातात.
  • गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी १.२ मीटर रुंद, तीन मीटर लांब आणि २५ सें.मी. उंच आकाराचे गादीवाफे तयार करावेत.
  • गादी वाफ्यातील मातीत चांगली पोयट्याची चाळलेली माती, एक भाग कुजलेले शेणखत व एक भाग चांगली गाळलेली रेती यांचे मिश्रण मिसळावे. सोबत शिफारशीत कीडनाशकाची पावडर मिसळावी.
  • खतमाती मिश्रणाचा २५ सें.मी. उंचीचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्याच्या रुंदीच्या समांतर १० सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोल रेषा काढाव्यात. या रेषेत ५ सें.मी. अंतरावर एका ठिकाणी दोन बिया पेराव्यात.
  • बियाणे पेरण्याच्या अगोदर २४ तास पाण्यात भिजवून ते कोरडे करून वापरावे. बी पेरून झाल्यावर त्या बियाण्यावर चाळलेली बारीक रेती टाकून बी झाकावे. गादीवाफ्यावर हळूहळू पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर वाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादन पसरावे. रोज सकाळी किंवा सायंकाळी झारीने वाफ्यांना पाणी द्यावे. पाणी देताना प्लॅस्टिक आच्छादन काढावे. पाणी दिल्यानंतर वाफ्यावर परत पसरावे. हे प्लॅस्टिक आच्छादन बियाण्याची उगवण क्रिया होताच काढून टाकावे. चांगले ताजे बियाणे १५ ते २० दिवसांत उगवते.
  • रोपांना पाणी देताना प्रति लिटर पाण्यात पोटॅशियम नायट्रेट १ ग्रॅम  आणि  कॅल्शियम नायट्रेट १ ग्रॅम मिसळून रोपांना द्यावे. रोपे १० ते १२ आठवडे वाफ्यावर वाढू द्यावे.
  • वेळोवेळी तणांचे नियंत्रण करावे. कीड रोगांच्या प्रादुर्भावावर लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्याने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • पिशवीत रोपनिर्मिती :

  • प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करता येतात.  त्यासाठी २२.५ सें.मी. लांब, १० सें.मी. रुंद अशा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करावा. पाणी निचरून जाण्यासाठी पिशवीच्या तळाशी छिद्रे पाडावीत. एक भाग चांगली पोयटा माती, एक भाग कुजलेले शेणखत आणि एक भाग चाळलेली बारीक रेती आणि शिफारशीत कीडनाशक पावडरीचे मिश्रण भरावे. मातीचे मिश्रण प्लॅस्टिक पिशव्यात भरावी. पिशव्यात बी पेरण्याच्या अगोदर बियाणे २४ तास पाण्यात भिजवून सुकवून घ्यावे. प्रत्येक पिशवीत २ बिया २ सें.मी. खोल पेरून त्यावर चाळलेली बारीक रेती टाकून बी झाकावे. सर्व पिशव्या रोपवाटिकेत ठेवाव्यात. झारीने पाणी द्यावे. पिशवीतील माती खालपर्यंत भिजेल एवढे पाणी द्यावे.
  • सर्व पिशव्यांवर एका प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. दिवसातून दोन वेळा पाणी द्यावे. बियाण्याची उगवण होताच प्लॅस्टिक पेपर काढून टकावा. दररोज पाणी देताना प्रतिलिटर पाण्यात पोटॅशियम नायट्रेट १ ग्रॅम  आणि  कॅल्शियम नायट्रेट १ ग्रॅम मिसळून रोपांना द्यावे.
  • कीड, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करावी.  
  • रोपे १० ते १२ आठवड्यांची झाल्यावर पुनर्लागवडीसाठी तयार होतात. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपे तयार केल्यास जमिनीत कायमच्या ठिकाणी नांगे पडण्याची शक्‍यता कमी असते.
  • रोपे पुनर्लागवडीपूर्वीची काळजी :

  • रोपांची पुनर्लागवड करण्याअगोदर शेतात रोपे लावण्यासाठी जे चर खोदलेले आहेत त्यांना एक दिवस अगोदर पाणी देऊन ओले करून घ्यावेत. त्यामुळे चरात थंडावा निर्माण होईल. असे पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपे लावावीत. रोपे सकाळी किंवा सायंकाळी लावावीत.
  • वाफ्यातील रोपवाटिकेतील रोपे लागवड करावयाची असल्यास वाफ्यांना एक दिवस अगोदर भरपूर पाणी देऊन ठेवावे. वाफ्यातून रोपे काढताना मुळे व दांडे तुटण्याची शक्‍यता असते. तुटलेल्या मुळांची रोपे चांगली रुजत नाहीत. म्हणून रोपे वाफ्यातून काळजीपूर्वक काढावीत. वाफ्यातील रेतीच्या मिश्रणामुळे मुळांना दुखापत न होता रोपे निघतात. लागवडीपूर्वी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे बुडवून लावावीत.
  • अॅस्परागस रोपांमध्ये नर व मादी फुले निरनिराळ्या झाडांवर येत असल्याने लागवडीसाठी नर रोपे निवडावीत. रोपे लहान असल्यास नर व मादी झाडे ओळखता येत नाहीत. रोपांची चांगली वाढ, जास्त फांद्या व मुळांची वाढ जास्त असलेली रोपे नर म्हणून लागवडीसाठी निवडावीत. लागवड केलेल्या नर रोपांना जास्त प्रमाणात कोंब उपलब्ध होतात.
  • रोपांची लागवड :

  • पाणी सोडून ओल्या केलेल्या चरात एका ठिकाणी दोन रोपे ५० सें.मी. अंतराने एकत्र लावावीत. चराच्या १५ सें.मी. खोलीत रोप सरळ उभे हाताने धरून ठेवावे. शिल्लक राहिलेली माती चरातील मोकळ्या जागेत टाकून चर बुजवावा. सर्व चर बुजविमुळे शेताचा पृष्ठभाग समपातळीत होतो. सर्व शेत सपाट दिसते.
  • प्लॅस्टिकच्या पिशवीतील लागवडीसाठी रोपे लागवडीच्या पूर्वी एक दिवस अगोदर पिशव्यांना पाणी देऊ नये. पाणी न दिल्यामुळे पिशवीतील माती घट्ट होऊन राहील, पिशवी फाडताना मुळावरील माती  पडणार नाही. पिशवीतील रोपे पिशवी ब्लेडने कापून वेगळी करून  चरात ५० सें.मी. अंतराने सरळ उभी ठेवून चरावर असलेली माती हाताने चरात टाकून सर्व चर पूर्ण सपाट करून घ्यावेत. या पद्धतीत पिशवीतील रोपांची मुळे चराच्या खाली असावीत. या रोपांचा हिरवा भाग जमिनीच्या पृष्ठभागाच्यावर ठेवावा.
  • लागवड झाल्यावर रोपांना हळूहळू पाणी द्यावे. स्प्रिंकलरने पाणी दिल्यास चांगले किंवा ठिबक संचाद्वारे पाणी द्यावे. लागवड केल्यानंतर तीन दिवस रोज एकदा पाणी द्यावे. त्यानंतर एक दिवसाआड तीन वेळा पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर चार, पाच किंवा आठ दिवसांनी पाणी द्यावे.
  • ठिबक पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास पिकाची प्रति दिवसाची गरज (लिटर्स) काढून तेवढेच पाणी मोजून द्यावे.
  • रोपांची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी रोपांची काही पाने सुकतात. पण पुढे थोड्याच दिवसात जमिनीतून बारीक कोंब येताना दिसतात. वाळलेली पाने कात्रीने अलगद कापावीत.
  • लागवडीनंतरचे व्यवस्थापन :

  • रोपे लागवडीनंतर दोन महिन्यांपर्यंत शेतात सपाट स्थितीतच पाणी द्यावे. अथवा ठिबक पद्धतीने पाणी द्यावे. लागवड दोन महिन्यांची झाल्यानंतर रोपांच्या बुंध्यावर मातीची भर द्यावी.
  • रोपांच्या दोन ओळीतील माती खुरप्याने हलवून घ्यावी. ती माती रोपांच्या बुंध्यावर भर देण्यासाठी वापरावी. पहिली भर रोपांच्या बुंध्यावर ७ ते ८ सें. मी. उंचीची असावी. या भर देण्याच्या क्रियेमुळे रोपे लागवडीसाठी चर खोदला होता त्या ठिकाणी वरंबा तयार होईल. दोन वरंब्याच्या मधल्या जागेत सरी तयार होईल. सरीतून या नंतरचे पाणी द्यावे.
  • मातीची भर रोपांच्या बुंध्यावर असणे हे पिकाच्या बाबतीत आवश्‍यक आहे. अशा प्रकारे वरंब्याची उंची कमी होईल, तेव्हा दोन-तीन महिन्यांनी एकदा भर द्यावी.
  •   खत व्यवस्थापन :

    पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये खतमात्रा ( प्रति एकरी) :

    अ.क्र. खते देण्याची वेळ युरिया १५ः१५ः१५
    १) लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यानंतर झाडास माती लावण्याच्या वेळेस (३० दिवसांनी) रोपांची व मुळांची वाढ होण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट ८ किलो अधिक बोरॉन १ किलो द्यावे. -- २६६ किलो
    २) लागवडीनंतर चौथ्या महिन्यात रोपांची व मुळांची जोमदार वाढ होण्यासाठी खोडास मातीची भर लावताना मॅग्नेशियम सल्फेट ४ किलो अधिक बोरॉन १ किलो द्यावे. ५५ किलो --
    ३) लागवडीनंतर आठव्या महिन्यात मुळांची व रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी - मातीची भर लावताना मॅग्नेशियम सल्फेट ४ किलो अधिक बोरॉन १ किलो ५५ किलो --

    टीप :  माती परिक्षणावर आधारीत खतांचा वापर करावा.

  • लागवडीनंतर रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी पहिल्या वर्षी नत्र १०० किलो, स्फुरद ८० किलो आणि पालाश ८० किलो वरीलप्रमाणे खते विभागून द्यावीत. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट १६ किलो आणि  बोरॉन ३ किलो मातीत मिसळून चौकटीत सांगितल्याप्रमाणे विभागून द्यावे.
  • लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासून पिकास दर महिन्यास १० किलो नत्र (२१.७४० किलो युरिया), आठ किलो स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो), आठ किलो स्फुरद (म्युरेट ऑफ पोटॅश १३.३३५ किलो) अशी खत मात्रा द्यावी. सोबत शिफारशीनुसार १६ किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि ३ किलो बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्ये विभागून द्यावीत.
  • पिकास ठिबक सिंचनाने शिफारशित विद्राव्य खते द्यावीत. विद्राव्य खते देताना द्रावणाचा सामू ६ ते ६.५ असावा. सामूचे प्रमाण वाढल्यास नायट्रीक आम्लाचा वापर करावा.
  • सेंद्रिय खतांचा वापर :  या पिकाची  मुळे तंतुमय व झुपकेदार असतात. ती जमिनीत जास्त खोल जात नाहीत. जमिनीच्या आत पसरतात. त्यांच्या वाढीसाठी मुळांच्या भोवती सेंद्रिय खतांची आवश्‍यकता असते. वर्षांतून एकदा एकरी २० टन चांगले कुजलेले शेणखत  मातीत मिसळून द्यावे. काढणी :

  • लागवड एक वर्षाची झाली म्हणजे कोवळे कोंब काढण्यास सुरवात करावी. रोपांच्या बुंध्यातून कोवळे कोंब येतात. या कोवळ्या कोबांची उंची २० ते २२ सें.मी. झाली म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून हे कोवळे कोंब धारदार सुरीने कापावेत. कोंब येणे सतत चालू असते.
  • सकाळी व सायंकाळी कोंबांची काढणी करावी. कोवळे नवीन आलेले कोंब झाडाच्या बुंध्यातून निघतात, सरळ वाढतात.
  • उत्तम प्रतीचे कोंब बुंध्याजवळ दोन सें.मी. जाडीचे असतात.
  • चांगल्या प्रतीचे व मध्यम प्रतीचे कोंब बाजारात विकण्यासाठी कापून घ्यावेत. कमी प्रतीचे कोंब कापू नयेत; ते तसेच ठेवावेत, कारण त्या कोंबातून पानांची निर्मिती होते.पाने झाडांच्या वाढीसाठी मदत करतात.
  • कोंबाची काढण्याची अवस्था पूर्ण झाल्यावर त्यातून शेंड्याकडून पाने बाहेर येण्यास सुरवात होते. असे पान आलेले कोंब कमी प्रतीचे असतात. अशा प्रकारच्या कोंबात तंतुमय भाग जास्त प्रमाणात तयार होतो. म्हणून शेंडा उमलण्याच्या अगोदर कोंब काढावा.
  • उत्तम मशागत, व्यवस्थापन असल्यास त्याच जमिनीत १० ते १२ वर्षे पीक राहत असल्यामुळे दर वर्षी झाडांची वाढ जास्त होत राहते. वाढीच्या प्रमाणात नवीन कोंब येण्याचे प्रमाण वाढत राहते. लागवडीपासून ३ ते ४ वर्षांपासून उत्पादन पुढे वाढत जाते.
  • कोंब कापण्यावर ते स्वच्छ थंड पाण्यात बुडवून ठेवावे. त्यासाठी कोंब कापताना अर्धी बादली स्वच्छ पाण्याने भरून घेऊन त्यात कापलेले कोंब उभे राहतील असे ठेवावेत.
  • फार काळ कोंब आडव्या स्थितीत राहिल्यास शेंड्याकडच्या भाग वाळून वाकडा होतो. वाकडे झालेले कोंब पॅकिंग करण्यास अडचणीचे होतात.
  • उत्पादन :

  • जमिनीचा मगदूर, व्यवस्थापन आणि मशागतीच्या तंत्राप्रमाणे उत्पादन कमी अधिक येते. रोपांचे वय वाढत जाईल तसे उत्पादन दर वर्षी वाढत जाते.
  • एकरी वार्षिक उत्पादन अंदाजे तीन वर्षांपर्यंत १.६ ते २  टनापर्यंत येते.पुढे उत्पादन दर वर्षी वाढत जाऊन  ६ ते ८ टनापर्यंत मिळते.
  • पहिल्या वर्षी रोपांची वाढ होत असल्याने कोंबांचे उत्पादन मिळत नाही. लागवडीपासून दुसऱ्या वर्षी अगदी नगण्य कोंबाचे उत्पादन मिळते.
  • दुसऱ्या वर्षात निघालेल्या कोंबाची काढणी २ ते ३ आठवडे करावी. म्हणजे पुढील कोंबापासून पानांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पुढे उत्पादन वाढत जाते.
  •  पॅकिंग :

  • पॅकिंग करण्यासाठी  २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम वजनाच्या सारख्या आकाराचे कोंब घेऊन जुड्या बांधाव्यात.
  • प्रत्येक जुडीच्या बुंध्याखाली पाणी शोषून घेईल अशी आठ सें.मी. उंचीची कागदाची पट्टी गुंडाळावी. कागद गुंडाळलेल्या सर्व जुड्या थंड पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवाव्यात.
  • त्यानंतर जुड्या प्लॅस्टिक पिशवीत पॅक कराव्यात.  हवेसाठी छिद्र असलेल्या जाड कोरुगेटेड बॉक्‍समध्ये जुड्या पॅक करून बाजारात पाठवाव्यात. वाहतूक रात्रीच्या वेळी करावी. रेफर व्हॅनची सोय असल्यास १ ते २  अंश सेल्सिअस तापमानात वाहतूक करावी.
  • साठवण : कोंब काढणीनंतर प्रतवारी करून शीतगृहामध्ये १ ते ४  अंश सेल्सिअस तापमान आणि ६५ ते ७० टक्के आद्रतेमध्ये २ ते ४ आठवडे चांगल्या स्थितीत साठविता येतात.

    कॅनिंग :

  • कोंब हवाबंद डब्यात भरून साठविता येतात. प्रतवारी केलेले कोंब स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यावेत. पॅकिंग करावयाच्या डब्याच्या उंचीच्या आकारप्रमाणे कापून घ्यावेत. परत थंड पाण्याचे धुऊन घ्यावेत.
  • उकळत्या पाण्यात २ ते ३ मिनिटे बुडवून ठेवावेत.
  • दोन टक्के मिठाचे द्रावण उकळून थंड करून ते द्रावण डब्यामध्ये भरावे. कोंबवर येईल एवढे मिठाचे द्रावण भरावे. कोंबाचे तुकडे डब्यामध्ये उभे ठेवावे. त्यानंतर डबे हवाबंद करावेत. थंड जागी साठवावेत.
  • प्रतवारी : कोंबाची प्रतवारी लांबी आणि जाडीप्रमाणे करतात. जाड प्रतीच्या कोंबांना पातळ प्रतीच्या कोंबापेक्षा चांगली मागणी असते. कोंबाच्या लांबीनुसार प्रतवारीः

  • १५ सें. मी. ते १८ सें. मी. लांब (जाड)-स्पेशल प्रत
  • १८ सें. मी. ते  २० सें. मी. लांब (जाड कोंब)- स्टॅंडर्ड प्रत
  • २० सें.मी. ते २४ सें. मी. लांब (जाड कोंब)- सर्वसाधारण प्रत
  • कोंबाच्या रंगाचे प्रकार : जगभरात अॅस्परागसची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हिरव्या रंगाचे कोंब, जांभळट रंगाचे कोंब आणि पांढऱ्या रंगाचे कोंब या तिन्ही प्रकारच्या कोंबाच्या जातींची लागवड होते. भारतात फक्त हिरव्या रंगाच्या कोंबांच्या जातीची लागवड होते.

    पीक संरक्षण :

    कीड नियंत्रण : भुंगेरा (बीटल) : लक्षणे : कीटक आणि अळ्या उगवून आलेले कोवळे कोंब खातात.

    रोग नियंत्रण अॅस्परागस रस्ट (तांबेरा) : लक्षणे : तांबडे-पिवळे ठिपके मुख्य खोडावर आणि फांद्यावर दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास ठिपके लहान पट्ट्यांमध्ये रूपांतर होऊन रंगाने लाल-तपकिरी किंवा केशरी रंगाचे होऊन पुढे गडद रंगाचे पट्टे दिसतात. त्यामुळे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात येते. फ्युजारियम विल्ट : लक्षणे :  कोंब तपकिरी रंगाचे होऊन निस्तेज होतात. कोबांची वाढ खुंटते, उत्पादनावर परिणाम होते. टीप : कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीड, रोग नियंत्रणाची उपाययोजना करावी.

    संपर्क : डॉ. अरूण नाफडे , ९८२२२६११३२. (लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com