हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्त

हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तर
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तर

गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही हवामानातील बदलाचा तीव्रपणा जाणवू लागला आहे. त्याचे विपरीत परिणाम शेती आणि मातीतील सूक्ष्मजीवांवर अधिक होतात. त्यांच्या संख्येतील कमी-अधिक होण्यामुळे शेतीत रोगांचे प्रमाण वाढत आहे. मातीच्या सुपीकतेवर परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी संवर्धित शेती हेच दीर्घकालीन उत्तर ठरू शकते, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत होताना दिसते. हवामानामध्ये होणारे बदल हा जागतिक पातळीवर सातत्याने चर्चिला जाणारा विषय आहे. गेल्या दोन दशकांपासून या विषयामध्ये संशोधन आणि विचारमंथन होत आहे. महाराष्ट्रामध्येही गेल्या काही वर्षापासून खालील स्वरूपाचे बदल तीव्रतेने जाणवत आहेत. कमी कालावधीमध्ये जास्त तीव्रतेने पडणारा पाऊस, वातावरणामध्ये निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, गारपीट, वादळ, अवकाळी पाऊस, पावसाळ्यात दोन पावसामध्ये पडणारा मोठा खंड किंवा संततधार, उन्हाळा, हिवाळा यातील कमाल व किमान तापमानातील कमी होणारे अंतर, तापमानातील एकदम होणारी वाढ किंवा घट, ऋतूमानामध्ये बदल होत असताना सकाळी तापमानामध्ये घट, दुपारी तापमान वाढ आणि संध्याकाळी पाऊस अशी विचित्र स्थिती. अशा अनियमित वातावरणामुळे गेल्या दशकामध्ये आरोग्याच्या समस्यात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यात प्रामुख्याने विषाणू- जिवाणूजन्य आजारातील वाढ होत आहे. वातावरणातील या बदलांचा असाच काहीसा परिणाम माती आणि शेतामध्ये वाढणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या बाबतीतही होताना दिसतो. पूर्वी जे रोग वर्षाच्या काही ठराविक काळातच प्राधान्याने आढळत असत, ते अलीकडे वर्षभर शेतामध्ये ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनाला बसत आहे. यावर मात करण्यासाठी हवामानातील बदलांचा वेध घेणारी स्मार्ट शेतीची कल्पना मांडली जात आहे. त्यात प्राधान्याने एकात्मिक शेती पद्धती, एकत्रित पीक व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य आणि निविष्ठा व्यवस्थापन, वनीकरण, शेतीमध्ये जैवविविधतेचे संगोपन, पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्ती विशेषतः वनस्पती, माती व पाणी यांचे शाश्वत व्यवस्थापन, पशुधन व्यवस्थापन अशा संवर्धित शेतीमधील विविध घटकांचा समावेश केला जातो.

संवर्धित शेतीतील छोटे उपाय दीर्घकालीन विचार करताना संवर्धित शेतीमध्ये हवामान बदलाचा फटका अत्यंत किमान पातळीवर बसतो.

  • अचानक तीव्र पाऊस होणाऱ्या प्रदेशामध्ये पिकामध्ये मातीवर आच्छादन पिकांचा अवलंब उपयुक्त ठरू शकतो. यातून सुपीक मातीच्या थराची होणारी धूप कमी होईल. पाणी रोखले जाऊन, मातीतील पाण्याच्या आंतरप्रवाहामध्ये वाढ होते.
  • तापमानातील वाढ आणि घट या दोन्ही परिस्थितीमध्ये मातीच्या तापमानामध्ये होणाऱ्या तीव्र बदलामुळे सूक्ष्म जिवांवर परिणाम होतो. मातीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मातीवर वनस्पती आच्छादने, सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन उपयुक्त ठरते. अशा आच्छादनामुळे वाढलेल्या सेंद्रिय घटकांचा फायदाही उपयुक्त जिवाणूंच्या संख्या वाढते. गांडुळांची संख्याही वाढत असल्याचे अनुभव आहेत.
  • दोन पावसामध्ये मोठा खंड पडण्याच्या स्थितीमध्ये ही आच्छादने जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी फायद्याची ठरतात. पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये संवर्धित शेती पद्धतीच्या अवलंब केल्यास फायदा होतो. अशा शेतीतील पिके वातावरणातील तीव्र बदलांमध्ये अधिक काळ तग धरू शकतात.शेतीमध्ये किमान मशागत हे तत्त्व वापरले जाते. परिणामी मातीच्या थरांची उलटापालट होत नाही. अशा सातत्याने होणाऱ्या मातीच्या थरांच्या उलटापालटीमुळे हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये वाढ होत असते. ती टळते. एकूण दीर्घकालीन विचार करता हवामानातील बदलांच्या काळामध्ये संवर्धित शेती मातीच्या व पर्यायाचे पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक ठरू शकते.
  • संपर्क :  डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४ एन. आर. खान, ९८९०९१८३८९ (डॉ. शेख हे मृदशास्त्रज्ञ असून, प्रा. खान हे राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com