भातपिकातील रासायनिक खतांचा वापर

भात पिकातील नत्र व स्फुरद कमतरता
भात पिकातील नत्र व स्फुरद कमतरता

भातपिकाच्या भरपूर उत्पादनासाठी त्याच्या संतुलित आहार व्यवस्थापनाची गरज असते. मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पिकाच्या गरजेनुसार मात्रा न दिल्यास पिकात त्यांच्या कमतरतेअभावी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पिकाच्या संतुलित आहार व्यवस्थापनासाठी रासायनिक खतांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती घ्यावी. भात लागवडीसाठी हेक्‍टरी १०० किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फूरद व ५० किलोग्रॅम पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस आहे. हळव्या जातींमध्ये : लागवडी वेळी ५० टक्‍के नत्र, संपूर्ण स्फूरद व पालाश आणि उरलेले ५० टक्‍के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे. निमगरव्या व गरव्या जातींमध्ये : लागवडी वेळी ४० टक्‍के नत्र आणि संपूर्ण स्फूरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्‍के नत्र आणि २० टक्‍के नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. संकरित जातींकरिता हेक्‍टरी १२० किलोग्रॅम नत्र, ५० किलोग्रॅम स्फूरद व ५० किलोग्रॅम पालाश या प्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस आहे. ही खत मात्रा लागवडीवेळी ५० टक्‍के नत्र, संपूर्ण स्फूरद व पालाश आणि उरलेले २५ टक्‍के नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्‍के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. नत्राचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रभावी पर्याय निचऱ्याद्वारे होणारा नत्राचा ऱ्हास कमी करण्यासाठी नत्र खतांची मात्रा विभागून द्यावी. शेतात सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. युरिया खताला निबोंळी पेंड किंवा करंज पेंड १:५ या प्रमाणात द्यावी. भात खाचरात नत्राच्या विघटनाने ७ ते २० टक्क्यांपर्यंत ऱ्हास होतो. यासाठी नत्रयुक्‍त खते देण्यासाठी अमोनियमयुक्‍त खते वापरावीत. खते जमिनीत खोलवर वापरावीत. जमिनीची धूप कमी होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी शेत समपातळीत आणावे. युरिया ब्रिकेट्‌सचा वापर नत्रयुक्‍त खतांचा पिकास अधिक काळ उपयोग होण्यासाठी युरिया ब्रिकेट्‌स हा प्रभावी पर्याय आहे. यामध्ये युरिया आणि डायअमोनियम फॉस्फेट ६०:४० प्रमाणात वापरून ब्रिकेट्‌स तयार करतात.  भातासाठी १७० किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात वापर करावा. सूक्ष्मअन्नद्रव्य खते भातपिकास नत्र, स्फूरद व पालाश ही प्रमुख अन्नद्रव्यांबरोबरच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये लागतात. पिकांना कार्बन, हायड्रोजन व निसजन ही मूलद्रव्ये हवा व पाण्यातून मिळतात. त्याचप्रमाणे भातपिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची जरुरी असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे स्वरूप

  • बोरॉन - बोरॅक्स ( १०-१५ टक्के बोरॉन)
  • लोह सल्फेट - हिराकस (१९ टक्के लोह) किंवा चिलेटेड स्वरूपात (१२ टक्के लोह)
  • मंगल मॅंगनीज सल्फेट -(३० टक्के मंगल)
  • जस्त - झिंक सल्फेट (२१ टक्के जस्त), चिलेटेड झिंक (१२ टक्के जस्त)
  • ताम्र - ताम्र सल्फेट (२४ टक्के ताम्र)
  • मॉलिब्डेनम - अमोनियम मॉलिब्डेनम (५२ टक्के मॉलिब्डेनम)
  • क्लोरिन - सोडियम क्लोराईड सिलिकॉन - सिलिकॉन डायनासाइड
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे भातपिकावर होणारे परिणाम प्रमुख अन्नद्रव्ये नत्र कमतरतेचा पिकावर परिणाम

  • भातरोपे प्राथमिक अवस्थेत असताना नत्राची  कमतरता - पाने पिवळी व पिवळसर हिरवी होतात. रोपांची वाढ खुंटलेली वाढ आणि कमी फुटवा, अशी लक्षणे दिसतात.
  • भात पीक पक्व होईपर्यंत नत्राची कमतरता राहिल्यास - प्रत्येक लोंबीतील दाण्यांची संख्या  कमी होते. दाणे पूर्ण भरत नाहीत.
  • भात पिकाच्या प्राथमिक अवस्थेत नत्राचा पुर्ण पुरवठा, मात्र नंतरच्या काळात कमतरता झाल्यास - रोपांची खालील जुनी पाने प्रथम पिवळी पडतात, परंतु नवीन येणारी पाने नेहमीप्रमाणे हिरवी राहतात.
  • भातपिकास शिफारशीत प्रमाणापेक्षा जास्त नत्र दिल्यास - पीक उंच होऊन पक्वतेच्या वेळेस लोळते. पिकाचे नुकसान होते. पीक कडा करपा, करपा, तसेच तुडतुडा व लष्करी अळीस बळी पडू शकते.
  • स्फूरद कमतरतेचा पिकावर परिणाम

  • भातपिकाच्या फुटव्यांची संख्या कमी होणे, वाढ खुजी राहणे आणि लोंबीतील दाणे रोगट दिसणे.
  • स्फूरदाची कमतरता असलेल्या भातरोपाची पाने गर्द हिरवी दिसली, तरी कमकुवत व नेहमीपेक्षा जास्त उभट होतात.
  • पालाश कमतरतेचा पिकावर परिणाम
  • जमिनीत कमी प्रमाणात पालाशची कमतरता असल्यास - भातरोपांची पाने गडद हिरवी दिसतात. फुटवा कमी येतो आणि रोपे खुजी दिसतात.
  • अधिक प्रमाणात पालाशची कमतरता भासल्यास - भातरोपांची पाने तांबूस पिवळसर ते पिवळसर तपकिरी होतात. पानांच्या टोकाकडील भाग पांढरट दिसतो. हा रंग वाढत पानांच्या खालील भागापर्यंत वाढत जातो. तपकिरी रंगाचे डाग पानांवर दिसतात. लोंबीतील दाण्याचा आकार आणि वजन कमी होते.
  • भातरोपे अशक्त बनतात. पाण्याचे शोषण चांगले होत नाही. वाढीची शक्ती कमी होते. कर्बग्रहण व श्‍वसन क्रिया योग्य प्रकारे न झाल्याने उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतात.
  • प्रमुख सूक्ष्मद्रव्ये लोह लोह कमी असल्यास भातरोपांची हरितद्रव्य तयार करण्याची शक्ती कमी होते व प्रथम कोवळ्या फांद्या, पाने यावर लोह अभावाचा परिणाम होतो, पाने लहान होतात तसेच पानांना प्रथम पिवळसरपणा येऊन नंतर ती पांढरट रंगाची होतात. झिंक भातरोपाच्या तळापासून नवीन येणाऱ्या पानांची मधली शीर फिकट रंगाची होते. जुन्या पानांवर तांबूस तपकिरी ठिपके येतात. त्याचा आकार वाढत जाऊन संपूर्ण पान पिंगट रंगाचे दिसते. रोपाची वाढ आणि फुटवा कमी होतो. द्रव्याची कमतरता तीव्र असल्यास रोपे मरतात. मध्यम प्रमाणात कमतरता असल्यास पीक पक्व होण्याचा कालावधी वाढतो. उत्पादन कमी मिळते. अल्कलीधर्मीय, पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता जाणवते. मॅग्नेशिअम भातरोपाच्या पानातील हरितद्रव्य कमी होते. पानांच्या शिरा हिरव्या राहतात. शिरांच्या मधील जागेचा हिरवटपणा कमी होतो. गंधक भातरोपाच्या पानांना पिवळसरपणा येतो. झाडांची वाढ कमी होते.

    कॅल्शिअम भातरोपामध्ये नत्र कमी प्रमाणात उपलब्ध होते.  झाडाला होणारी पाण्याची उपलब्धता कमी होते. नवीन पानांतील हरितद्रव्य कमी होते. जुनी पाने पिवळसर होतात. रोपे खुजी होतात. फुटवा कमी येतो. ताम्र भातरोपाच्या पानांना पिवळसरपणा येतो. ताम्राचा तुटवडा तीव्र झाल्यास पाने गळतात. बोरॉन भातरोपाच्या पानाची टोके फिकट पिवळसर होतात. पानाच्या दोन्ही बाजूपर्यंत हे लक्षण पसरते. रोगट झाडे तपकिरी होतात व कोमेजतात. समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनीत, तसेच सेंद्रिय खते जास्त असणाऱ्या आणि पाण्याची कमतरता असणाऱ्या जमिनीत या द्रव्याची कमतरता आढळते. वरीलप्रमाणे सूक्ष्मद्रव्यांची कमतरता पिकांमध्ये दिसून आल्यास सूक्ष्मद्रव्यांचे खत एकरी पाच किलो या प्रमाणात युरियासमवेत पिकास द्यावे. यामुळे थोड्याच दिवसांत पीक सुधार पडतो. नेहमीप्रमाणे वाढ होते. संपर्क : डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१५०५, (कृषी संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com