काजू कलमांना द्या योग्य खतमात्रा

काजू कलमांच्या चांगल्या वाढीसाठी शिफारशीत खतमात्रा देणे आवश्यक आहे.
काजू कलमांच्या चांगल्या वाढीसाठी शिफारशीत खतमात्रा देणे आवश्यक आहे.

सुरवातीच्या तीन वर्षांत कलमांना योग्य वळण देण्यासाठी छाटणी करावी. कलमांना बुंध्यापासून १.५ मीटर अंतरावर किंवा विस्तारानुसार २५ सें. मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल गोलाकार चर खोदून त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात खते द्यावीत. नवीन लागवड केलेल्या कलमांचे बुंधे तणविरहीत ठेवावेत. पाऊस संपल्यानंतर कलमांच्या बुंध्याजवळची माती हलवून मोकळी करावी. तसेच बुंध्याभोवती पालापाचोळा किंवा गवताचे आच्छादन करावे. कलमांच्या जोडाखाली येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. सुरवातीच्या तीन वर्षांत कलमांना योग्य वळण देण्यासाठी छाटणी करावी. जमिनीपासून सुमारे ०.७५ ते १ मीटर उंचीपर्यंत कलमांच्या खोडावर फांद्या येऊ न देता खोड स्वच्छ ठेवावे. साधारणपणे एक मीटर उंचीवर चारही बाजूंनी फांद्यांची वाढ होऊन झाडाचा आकार घुमटाकार होईल याकडे लक्ष द्यावे.

  • डोंगर उतारावरील काजू बागेतील जमिनीची धूप आणि अन्नद्रव्यांचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कलमाभोवती दोन मीटर जागा सपाट करावी. तसेच दोन झाडांतील वरच्या भागात ४.५ मीटर लांब, ०.३ मीटर खोल चर खोदावा. चराची वरची रुंदी ०.६ मीटर व तळाची रुंदी ०.३ मीटर ठेवावी. त्यामुळे जमिनीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरते. आगीपासून संरक्षणासाठी  कुंपणाच्या कडेने जमीन गवत विरहीत ठेवावी.
  • जुन्या बागांमधील सुकलेल्या वेड्यावाकड्या फांद्या दोन वर्षांतून एकदा छाटाव्यात. छाटलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी.
  • कलमाचे उत्पादन वाढविण्यासाठी तीव्र छाटणी करावी. फळांच्या काढणीनंतर छाटणी करावी. छाटणीनंतर कलमाचे खोडकिड्यापासून संरक्षणासाठी  १० लिटर पाण्यात २० मि.लि. क्लोरपायरीफॉस मिसळून खोडावर ओतावे.
  • नवीन लागवड केलेल्या कलमांची काळजी :

  • लागवडीनंतर कलमांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी बागेला काटेरी दाट कुंपण करावे.
  • काजूच्या झाडाच्या दीड मीटर परिघवर्तुळातील सर्व गवत फावड्याने तासून घ्यावे. कलमांना बुंध्यालगत मातीची भर द्यावी, जेणेकरून कलमांना भक्कमपणा येईल.
  • कलमांवरील वाळलेल्या फांद्या, निर्जीव फांद्या काढून टाकाव्यात. रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी.
  • शिफारशीनुसार योग्य प्रमाणात खते देऊन झाडांना मातीची पुरेशी भर द्यावी.
  • शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण : क्विनॉलफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
  • टी मॉस्किटो नियंत्रण : लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मि.लि.प्रति १० लिटर पाणी
  • खत व्यवस्थापन :

  • चार वर्षे जास्त वयाच्या कलमाला चार घमेली शेणखत, १०० ग्रॅम नत्र (युरिया २.२०० किलो) २५० ग्रॅम स्फुरद (१.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २५० ग्रॅम पालाश (४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. या प्रमाणापैकी १/४ भाग पहिल्या वर्षी, १/२ दुसऱ्या वर्षी आणि ३/४ भाग तिसऱ्या वर्षी द्यावा. चौथ्या वर्षापासून खताची पूर्ण मात्रा वरीलप्रमाणे द्यावी.
  • कलमांना बुंध्यापासून १.५ मीटर अंतरावर किंवा विस्तारानुसार २५ सें. मी. रुंद आणि १५ सें.मी. खोल गोलाकार चर खोदून त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात खते द्यावीत.
  • लागवडीनंतर एक वर्षानी कलमांना  जून-जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबरअखेर अशी दोन हप्त्यांत खते द्यावीत. ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असेल तेथे जून महिन्यात खतांचा हप्ता द्यावा.
  • काजू कलमांना वयोमानानूसार द्यावयाची खतमात्रा

    वय वर्षे लागवडीनंतर     शेणखत (घमेली)     नत्र (ग्रॅम)    स्फुरद (ग्रॅम)    पालाश (ग्रॅम)
    १      २५० (युरिया ५०० ग्रॅम)   ६३ (४०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट)   ६३(१०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश)
    २        ५०० (युरिया १ किलो)   १२५ (८०० ग्रॅम सुपर फॉस्फेट)  १२५ (२०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश)
    ३    ७५० (युरिया १.७२५ किलाे)        १८८ (१.२५किलो सिंगल सुपर फॉस्फेट)     १८८ (३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश)
    ४     १००० (युरिया २.२०० किलाे)     २५० (१.५० किलाे सिंगल सुपर फॉस्फेट)    २५० (४०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश)

    संपर्क : योगेश परुळेकर, ८२७५४५४९७८ (उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com