वेळीच द्या हुमणी नियंत्रणाकडे लक्ष

हुमणीच्या विविध अवस्था व हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊसपिकाचे झालेले नुकसान.
हुमणीच्या विविध अवस्था व हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊसपिकाचे झालेले नुकसान.

ज्या ठिकाणी वळवाचा पाऊस होऊन गेला आहे, अशा ठिकाणी हुमणीचे भुंगे मिलनासाठी जमिनीबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. मिलनानंतर हे प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालतात. त्यामुळे येत्या काळामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. वेळीच नियंत्रणाचे उपाय योजण्याची आवश्यकता आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (उदा. ज्वारी, बाजरी, मका इ.) यांची मुळे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करते. झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येईतो मोठे नुकसान झालेले असते. त्या स्थितीमध्ये हुमणीचे नियंत्रण करणे अवघड असते. हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याअाधीची अवस्था प्रौढ भुंग्यांवर जून महिन्यात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

जीवन चक्र : यामध्ये अंडी, अळी, कोष व भुंगा अशा चार अवस्था असतात.  भुंगेरे : होलोट्रॅकीया प्रजातीचे भुंगे गडद विटकरी रंगाचे असून, त्यांची लांबी २.५ सेंमी व रुंदी १ सेंमी असते. पंख जाड व टणक असतात. पाय तांबूस रंगाचे असून, नर व मादी या दोन्हीमध्ये मिशा असतात. नर भुंग्यात मिशीची गाठ मोठी असते व उडताना ‘घुं s s’ असा आवाज येतो. पहिल्या वळीवाच्या पावसानंतर सायंकाळी भुंगे जमिनीतून बाहेर येतात. नर मादीचे मिलन होते. त्यानंतर हे भुंगे कडुनिंब, बाभळी किंवा शेताभोवती असणाऱ्या झाडाझुडपावर जाऊन बसतात. हे निशाचर असल्याने पुन्हा सूर्योदयापूर्वी जमिनीत लपून राहतात. अंडी : जमिनीत ४ इंच खोलीवर मादी अंडी घालते. दररोज एक याप्रमाणे ६० दिवस अंडी घालते. अंडे ज्वारी किंवा मटकीच्या आकाराचे असतात. सुरवातीला पांढरे नंतर तांबूस गोलाकार होतात. त्यांची लांबी ३.६५ मिमी व रुंदी २.१५ मिमी असते. अंड्यातून १० ते १५ दिवसांनी अळी बाहेर पडते. अळी : अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढरट असते. अळीच्या ३ अवस्था असतात. पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी अवस्था ३० ते ४५ दिवस आणि तिसरी अवस्था १४० ते १४५ दिवसाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी ४५ ते ६५ मिमी लांब, १२ मिमी जाडीची असून इंग्रजी C आकाराची असते. रंग पिवळसर पांढरा असतो, जबडा मजबूत असतो, डोळे तांबूस ते गडद तांबूस असतात. ही पिकांसाठी नुकसानकारक अवस्था आहे. कोष : किडीचा कोष पांढरा असतो. ऑगस्ट ते मार्च या महिन्यात जमिनीत भोवती आवरणात राहते. कोषातून बाहेर पडलेले भुंगे ४ ते ५ महिने जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. पहिल्या वळीवाच्या पावसानंतर बाहेर येतात. जीवनकाळ ९० ते ११० दिवसांचा असून, एका वर्षात हुमणीची एक पिढी पूर्ण होते.

संपर्क : मंगेश नवले, ९८५०९७०१९९ (मंगेश नवले हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा, नेवासा जि. नगर येथे ऊस विकास अधिकारी असून, काकासाहेब शिंदे सरव्यवस्थापक आहेत.) हुमणी नियंत्रणाचे उपाय किडीचे शास्त्रीय नाव : होलोट्रॅकिया सेरेटा. आर्थिक नुकसान संकेत पातळी : एक हुमणी प्रतिएक घनमीटर अंतर.

मशागतीचे उपाय :

  • पूर्वहंगामी ऊस लागवडीअगोदर सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात शेत ३ ते ४ वेळा उभे-आडवे खोलवर नांगरावे. नांगरटीनंतर शेतातील ढेकळे फोडावीत. मोठ्या ढेकळांच्या आत हुमणीच्या निरनिराळ्या अवस्था (अंडी, अळी, कोष) राहण्याची शक्‍यता असते.
  • उसाच्या तोडणीनंतर अतिप्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेण्याऐवजी सूर्यफुलाचे पीक घ्यावे.
  • हुमणीग्रस्त ऊस शेतात भुईमूग अथवा ताग पिकाचा सापळा पीक म्हणून वापर करावा.
  • प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे :

  • होलोट्रॅकिया सेरेटा प्रजातीच्या हुमणीचे भुंगेरे प्रामुख्याने कडुलिंब अथवा बाभळीची पाने खातात. पावसाळ्याच्या सुरवातीला ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
  • विशेषतः कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात पावसाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) ल्युकोफोलीस प्रजातीची हुमणी भुंगेरे उसाच्या पानांवर आढळतात. ते सायंकाळी गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
  • हा अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचा उपाय  ठरतो.
  • जैविक नियंत्रण : ऊस लागवडीवेळी जमिनीत मेटारायझिम ॲनिसोपली किंवा बिव्हेरिया बॅसियाना २०  किलो प्रतिहेक्‍टरी मिसळावे.

    रासायनिक उपाययोजना :

  • शेणखताच्या प्रतिगाडीमध्ये शिफारशीत दाणेदार किटकनाशक मिसळावे. नंतर खत शेतात टाकावे.
  • कडुनिंब अथवा बाभळीच्या झाडांवर क्लोरपायरीफाॅस (२० टक्के इ.सी.) २ मि.लि. प्रति  लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • उसाबरोबरच अन्य पिकांत क्लोरपायरीफाॅस (२० टक्के इ.सी.) ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे जमिनीत पिकांच्या मुळापाशी अाळवणी करावी.
  • ऊस लागवडीच्या वेळी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यांत फिप्रोनिल (०.३ टक्के दाणेदार) २५ किलो प्रतिहेक्‍टर याप्रमाणात मातीत मिसळावे.
  • मोठ्या उसात क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के) ५ लिटर प्रति १ हजार लिटर पाण्यात मिसळून हेक्‍टरी जमिनीत ड्रेंचिंग करावे.
  • संपर्क : ०२०-२६९०२१००, २६९०२२५५   (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे.) नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com