पीक सल्ला

तुरीची पेरणी उशिरात उशिरा ३१ जुलै पर्यंत संपवावी.सोयाबीनवरील प्रौढ चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
तुरीची पेरणी उशिरात उशिरा ३१ जुलै पर्यंत संपवावी.सोयाबीनवरील प्रौढ चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव

१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत बाजरी, सूर्यफूल, तूर अधिक सोयाबीन, ही पिके व बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर, एरंडी अधिक तीळ इत्यादी आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा. कपाशी व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांची पेरणी उशिराने २५ जुलैपर्यंत करावी.

  • पेरणीसाठी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांचा वापर करावा.
  • पेरणीसाठी रूंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा.
  • शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
  • पाऊस अधिक लांबल्यास पेरणीसाठी हेक्टरी २५ टक्के अधिक बियाण्यांचा वापर करावा व रासायनिक खताची मात्रा २५ टक्के ने कमी करावी.
  • पीक वाढीच्या काळात १५ ते २० दिवसांची उघडीप असल्यास, जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेत तण विरहीत ठेवावे. त्यासाठी गरजेनुसार खुरपणी करावी. हलकी कोळपणी करून जमिनीत पडलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. आच्छादनाचा वापर करावा. उदा. गिरीपुष्प/सुबाभूळ पाला ३ टन/ हे किंवा सोयाबिन/गहू पिकाचे काड २ ते २.५ टन/हे पसरावे.
  • पोटॅशियम नायट्रेट १.० ते १.५ टक्के (१० ते १५ ग्रॅम प्रतिलिटर) याप्रमाणे फवारणी करावी.
  • पेरणीनंतर ४ ते ५ आठवड्यांनी कोळप्याच्या सहाय्याने किंवा लाकडी नांगरास ५-६ इंचावर दोरी बांधून ४ ओळीनंतर स­ऱ्या काढाव्यात. त्यामुळे पुढे पडणा­ऱ्या पावसाचे मूलस्थानी जलसंवर्धन होते.
  • मशागत तसेच पेरणी व आंतरमशागतीची कामे उताराला आडवी (समतल रेषेत) करावीत.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन व एकात्मिक तण व्यवस्थापन करावे.
  • सिंचनाची उपलब्धता असल्यास संरक्षित सिंचन द्यावे. त्यासाठी एक आड एक सरी पद्धत तसेच आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.
  • अधिक पाऊस झाल्यास निचरा व्यवस्थापन करावे.
  • कपाशी व तूर पिकांत मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
  • बाजरी

  • पेरणीस उशीर झाल्यास ३० जुलैपर्यंत करता येते; मात्र लवकर येणारे सरळ वाण पेरावेत.
  • जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे जमिनीत ओल असताना द्यावे.
  • निंदणी व कोळपणी करून पिकातील तणांचे नियंत्रण करावे.
  • पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ठराविक अंतरावर (४ किंवा ६ ओळीनंतर) जमिनीच्या उतारास आडवे चर नांगराच्या सहाय्याने काढावे.
  • केवडा रोगनियंत्रणासाठी पेरणीनंतर १४ दिवसांनी कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे.
  • तूर

  • तुरीची पेरणी जास्तीत जास्त २५ ते ३१ जुलै पर्यंतच संपवावी.
  • तूर पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी मजुरांची कमतरता असल्यास पेरणीनंतर ४८ तासांच्या आत पेंडीमिथॅलीन (३० ई.सी.) २.५ लिटर  प्रतिहेक्टर प्रति ५०० ते ७५० लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  • पिकाला ३० दिवसांनंतर युरिया किंवा इतर रासायनिक खताची मात्रा जमिनीतून देऊ नये.
  • अांतर मशागतीची कामे वेळेवर करावीत.
  • पाऊस जास्त झाला असल्यास जास्तीचे पाणी शेताबाहेर जाण्यासाठी चर काढून पाणी शेताबाहेर काढावे.
  • तीळ

  • पेरणी जास्तीत जास्त ३१ जुलैपर्यंत करावी.
  • पेरणीवेळी प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद याप्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
  • पेरणीसाठी तीळ नं. ८५, फुले-१ आणि पंजाब -१ या वाणांची निवड करावी.
  • जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी २५ किलो नत्र प्रतिहेक्टरी युरियाद्वारे जमिनीत ओल असताना द्यावे.
  • तणांचा वेळीच बंदोबस्त करावा.
  • शेतात ठराविक अंतरावर जमिनीच्या उतारास आडवे चर नांगराच्या सहाय्याने काढावेत.
  • सोयाबीन

  • पेरणी जास्तीत जास्त २५ जुलैपूर्वी संपवावी.
  • पेरणीवेळी प्रतिहेक्टरी ३० : ६० : ३० : २० किलो नत्र : स्फुरद : पालाश : गंधक प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावे.
  • पिकाची निंदणी व कोळपणी करून तणांचे नियंत्रण करावे.
  • दर ४ ते ६ ओळीनंतर जमिनीच्या उतारास आडवे चर नांगराच्या सहाय्याने काढावे.
  • मातीपरीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.
  • पिकास ३० दिवसांनंतर नत्राची मात्रा देऊ नये.
  • तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर परंतु पीक व तणे उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलिन (३० ई.सी.) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टरी याप्रमाणात ७५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  किंवा तणे उगवून आल्यानंतर म्हणजे १५ ते २० दिवसादरम्यान (तणे २ ते ३ पानावर असताना) इमॅझीथॅपर हे तणनाशक ७५० मि.लि. प्रतिहेक्टर ५०० ते ७०० लिटर पाण्यात घेऊन तणांवर फवारणी करावी.
  • पाने गुंडाळणाऱ्या व पाने पोखरणाऱ्या कीडीची तीव्रता कमी करण्यासाठी २१ दिवसांनंतर पहिल्या फवारणीच्या माध्यमातून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन (३,००० पीपीएम) ४ मि.लि. किंवा प्रोफेनाेफॉस (५० टक्के ई.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
  • हुमणी, खोडमाशी व चक्रीभुंगा किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (५० टक्के ई.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • लष्करी अळीसाठी सापळा पीक म्हणून पेरणीवेळी बांधावर एरंडीची लागवड करावी. एरंडीच्या पानांवर आढळणाऱ्या अळ्या गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९०० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com