खरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...

वाणी (मिलिपीड) किडीचा प्रादुर्भाव व कपाशीचे प्रादुर्भावग्रस्त रोपटे.
वाणी (मिलिपीड) किडीचा प्रादुर्भाव व कपाशीचे प्रादुर्भावग्रस्त रोपटे.

खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपसंख्या घटते व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. खूरपडी म्हणजे विविध प्राण्यांचा एकत्रित होणारा प्रादुर्भाव; यामध्ये पक्षी, खार, वाणी, क्रिकेट, वायरवर्म (काळी म्हैस) इत्यादींचा समावेश होतो. या किडी बहुभक्षी असून एकदल, द्विदल, डाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर त्यांचा प्रादुर्भाव होतो.

खूरपडीच्या नुकसानीचे प्रकार

  • पक्षी विशेषत: कमी ओलाव्यात बियाणे व्यवस्थित खोलीत न पडल्यास किंवा बियाणे व्यवस्थित न झाकल्यास ते दाणे वेचून खातात.
  • खार दाणे उकरून खाते.
  • पावसाळ्यात सुरवातीला वाणीचे समूह शेतात दिसतात. वाणी रोपट्यांच्या बुंध्यांशी डोके खूपसून आत शिल्लक असलेला दाणा खातात. कालांतराने अशी रोपे सुकतात.
  • जमिनीवरील नाकतोडे रंगाने काळे असून ते कमी अंतराच्या उड्या मारतात. नाकतोडे जमिनीतील दाणे खाऊन नुकसान करतात.
  • वायरवर्म (काळी म्हैस) ही कीड भुरकट ते काळ्या रंगाचे असतात. ही कीड मुख्यत: (अळ्या) अंकुरलेले दाणे खातात. तर प्रौढ रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडतात. परिणामी, पिकांचे नुकसान होते.
  • जमिनीतील किडींच्या प्रादुर्भावाची कारणे

  • मे व जून महिन्यात हलका पाऊस हलका व तुरळक तसेच २०० ते २५० मि.मी.पेक्षा कमी पडल्यास जमिनीतील किडींच्या जीवनचक्रास चालना मिळते. परिणामी, त्यांचे प्रजोत्पादन झपाट्याने होते. मात्र दोन ते तीनवेळा मोठा तीव्रतेचा पाऊस झाल्यास किडी दबून नष्ट होतात व प्रादुर्भावात लक्षणीयरित्या घट होते.
  • पडीक गवताळ जमिनी प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतात. भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन काळ्या म्हशीच्या वाढीस उपयुक्त असते.
  • रोपावस्थेत पावसाची दीर्घ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • सर्वेक्षण : वायरवर्म (काळी म्हैस) या किडीसाठी पेरणीपूर्वी शेताचे सर्वेक्षण करावे. किडींची संख्या जाणून घेण्यासाठी शेतातील ऐच्छिक पद्धतीने प्रतिएकरी २० ठिकाणे निवडावीत. प्रत्येक निवडलेल्या ठिकाणाची १ फूट x१ फुट x ०.५० फूट याप्रमाणे माती गोळा करावी. त्यात अळ्या, प्रौढांची संख्या मोजावी व २० ठिकाणची सरासरी काढावी किंवा वरील २० ठिकाणी गव्हाच्या बियाण्याचे आमिष सापळे ठेवावेत; त्यात सापडलेल्या अळ्या / प्रौढ यांची संख्या मोजावी.

    बियाणे अमिष सापळे बनविण्याची पद्धत : गहू पीठ दीड कप अधिक मध दोन चमचे अधिक पाणी अर्धा कप याप्रमाणात मिश्रण करावे. मिश्रणाच्या गोळ्या करून कांदे साठविण्याच्या पोत्याच्या छोट्या तुकड्यामध्ये बांधून जमिनीत वरील २० ठिकाणी झेंडे लावून गोळ्या ४ ते ६ इंच खोल गाडाव्यात. व्यवस्थापन :

  • पक्षी, खारींपासून पीक वाचविण्यासाठी शेताची राखण करावी.
  • वाणीचे (मिलिपेड) समूह गोळा करून नष्ट करावेत.
  • सेंद्रिय पदार्थ किंवा पिकांचे अवशेष किंवा किडींची हंगामापूर्वी विल्हेवाट लावावी. न कुजलेल्या सेंद्रिय खताचा वापर केल्यास वाणी, वायरवर्म इत्यादींचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे न कुजलेल्या सेंद्रिय खताचावापर करू नये.   
  • नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी धुऱ्यावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करून धुरे स्वच्छ ठेवावेत. 
  • जमिनीला भेगा पडल्यास उपलब्धतेनुसार ओलित करावे.  
  • संपर्क : डॉ. ए. पी. कोल्हे,९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com