सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवड

सीताफळाच्या भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी उच्चउत्पादनक्षम जातींची लागवड करावी.
सीताफळाच्या भरपूर व दर्जेदार उत्पादनासाठी उच्चउत्पादनक्षम जातींची लागवड करावी.

महाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक पट्टे आढळले आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांचा या पट्ट्यात समावेश होतो. या नैसर्गिक पट्ट्यात काही चांगल्या प्रतीची फळे व भरपूर उत्पन्न देणारी झाडे आहेत; त्यामधून निवड पद्धतीने कांही उत्तम जाती विकसित करण्यात आल्या आहेत. आपल्या विभागानुसार योग्य जातींची निवड करून लागवड केल्यास फायदेशीर ठरते.   सीताफळ वर्गीय फळझाडे ही अॅनोना या कुळात मोडतात. अॅनोना कुळात पन्नासपेक्षा जास्त प्रजाती असून त्यापैकी फक्त पाच प्रजातींची फळे खाण्यायोग्य आहेत.

अॅनोना कुळातील फळझाडे सीताफळ (अॅनोना स्क्वॅमोसा) : स्वीट सोप किंवा शुगर अॅपल नावाने हे ओळखले जाते. फळाचा खाण्यायोग्य भाग पेरीकार्प आहे. फळे हिरवट पिवळी असतात. ती झाडावर गुच्छामध्ये किंवा सुटी वेगवेगळी लागतात. सीताफळामध्ये स्त्रीकेशर व पुकेशर वेगवेगळ्या वेळी पक्व होतात. रामफळ (अॅनोना रेटीकुलाटा) : यालाच बुलक्स हर्ट असेही म्हणतात. रामफळाचे झाड ६-८ मीटर उंच वाढते. पिकलेल्या फळाचा रंग पिवळसर लाल असतो.  फळाला डोळे नसतात. साल चिकन असते, गर दाट मऊ असतो. बियाचे प्रमाण कमी असते. हनुमान फळ (अॅनोना चेरीमोया) : सीताफळवर्गीय फळांमधील सर्वांत उत्तम, अप्रतिम चवीचे हे फळ मानले जाते. फळाचा गर मऊ लोण्यासारखा असून, रंग दुधाळ असतो. बियांचे प्रमाण कमी असते. लक्ष्मण फळ (अॅनोना अॅटीमोया) : हे फळ (अॅनोना स्क्वॅमोसा × अॅनोना चेरीमोया) यांचा संकर असून मानवनिर्मित फळ आहे. फळांचा आकार हृदयासारखा आहे. झाडाची उंची ७-८ मीटर असते. सोर सोप (अॅनोना म्युरिकॅटा) : याचे फळ सर्वांत मोठे असते.

सीताफळातील सुधारित वाण धारूर-६ बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातून निवड पद्धतीने विकसित. या जातीची फळे गोलाकार व मोठी असतात. एका फळाचे वजन सरासरी ३५०-४०० ग्रॅम असते. गराचे प्रमाण ४७ टक्के तर एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण २४ ब्रिक्स असते. बियाचे प्रमाण तुलनेने कमी. फळाचे डोळे आकाराने माेठे असतात. गर रवाळ व खाण्यास अतिशय रुचकर, स्वादिष्ट असतो. बाळानगरी झाड उंच व आकार वेडावाकडा असतो. पाने कमी प्रमाणात असतात. फळांचा आकार साधारणपणे गोलाकार असतो. फळे मध्यम आकाराची असतात. फळांचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर असतो. गर मळकट पांढरा, रवेदार गोड व चविष्ट असतो. फळातील बियांची संख्या कमी असते. फळाचे वजन २५०-३५० ग्रॅम असते. साखरेचे प्रमाण २५० ब्रिक्स व गराचे प्रमाण ५३ टक्के असते. लाल सीताफळ काळपट लाल आकर्षक रंग असतो. फळाचा पृष्ठभाग खरखरीत असतो. गराचा रंग पांढरा असून, चव गोड व स्वादिष्ट असते. फळाचे वजन २४०-२५० ग्रॅम असतेे. गराचे प्रमाण ४८ टक्के असते. साखरेचे प्रमाण २३-२५ टक्के असते. बियांचे प्रमाण कमी असते. टी. पी.- ७ निवड पद्धतीने विकसित. फळांचा रंग आकर्षक हिरवा रंग असतो. फळाचे सरासरी वजन ४००-५०० ग्रॅम, साखरेचे प्रमाण २८ टक्के, गराचे प्रमाण जास्त, गर गोड व स्वादिष्ट, बियाचे प्रमाण कमी असते. ए.पी.के.-१ या जातीच्या प्रत्येक झाडापासून ७०-८० फळे मिळतात. फळाचे वजन २१०-२२० ग्रॅम असते. साखरेचे प्रमाण २५ टक्के, गर मऊ, अतिशय स्वादिष्ट व गोड असतो. अर्का सहान ही संकरित जात असून, फळाचा रंग हिरवट पिवळसर असतो. फळ आकाराने मोठे व त्रिकोणाकृती असते. फळात बिया कमी, गराचे प्रमाण जास्त असते. गर अतिशय गोड व स्वादिष्ट असतो. साठवणुकीचा कालावधीही जास्त असतो. फळे काढणीस पाच महिने लागतात. फळाचे वजन सरासरी ४५० ते ५०० ग्रॅम असते. मॅमाॅथ झाड मध्यम आकाराचे असून, फांद्या आखुड व पाने दाट असतात. हे झाड झुडपासारखे दिसते. फळ फिक्कट हिरव्या रंगाचे हृदयाच्या आकाराचे व १८०-२०० ग्रॅम वजनाचे असते. साखरेचे प्रमाण २५०-२७० ब्रिक्स असते. गराचे प्रमाण ४४ टक्के असते. फळांचा पृष्ठभाग गुळगुळीत व चमकदार असून गर पांढरा, रवेदार व गोड असतो. पिंक मॅमाॅथ फळे आकाराने थोडी मोठी असतात. फळांचे वजन सरासरी ३ किलोग्रॅमपर्यंत असते. या जातीच्या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन डोळ्यांमधील भागात पिवळसर गुलाबी रंग असतो. फळे खाण्यास अतिशय गोड, रसाळ व स्वादिष्ट असतात. या जातीची फळे हाताने वेगळे करून त्यामधील गर चमच्याने खाता येतो. आफ्रिकन प्राइड पिंक मॅमाॅथपेक्षा या जातीची फळे आकाराने बरीच मध्यम असतात. फळांचे वजन सरासरी ५०० ते ८०० ग्रॅम असते. फळे चाकूच्या साह्याने कापून आतील गर चमच्याच्या साह्याने खाता येतो. ब्रिटिश गुनिया या जातीची फळे पांढरट हिरव्या रंगाची असतात. फळे आकाराने मोठी असतात. गराचे प्रमाण जास्त, बिया कमी असतात. झाडावर फळे लागण्याचे प्रमाण कमी किंवा विरळ असते. या जातीची फळे पिकल्यानंतर एक आठवड्यापर्यंत टिकून राहतात.

आइसलॅंड जेम  जातीच्या फळाचा आकार खूप मोठा असतो. फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. गराचे प्रमाण खूप जास्त असते. गर खूप गोड, मधुर, रुचकर, असतो. बियाचे प्रमाण खूपच कमी. फळाचा रंग पांढरट हिरवा असतो. विरळ लागण, फळाचा आकार अनियमित असतो. हे फळ एक आठवड्यापर्यंत टिकून राहते. बार्बाडोस सीडलिंग साखरेचे प्रमाण जास्त, हिरवट साल, नारंगी पिवळसर कडा, उशिरा येणारी ही जात आहे. एन.एम.के.-१ (गोल्डन) फळाचा रंग हिरवट पिवळसर, माठे डोळे, फळाचे वजन ३०० ते ६०० ग्रॅम, साखरेचे प्रमाण २२ ते २४ टक्के गर, गर ४५ ते ५० टक्के, फळांची लागण जास्त, काढणीस तयार असणारी फळे झाडावर १५ ते २५ दिवस टिकून राहतात. काढणीनंतर चार दिवसांपर्यंत फळे टिकून राहतात. इस्राईल सिलेक्शन फळाचा आकार त्रिकोणी पिवळसर हिरव्या रंगाचे फळ, साल अतिशय पातळ, गर पांढराशुभ्र अतिशय गोड स्वादिष्ट गरामध्ये पोकळयांचे प्रमाण सर्वाधिक व टिकवण क्षमता जास्त. फुले पुरंदर फळाचे सरासरी वजन ४५० ते ५५० ग्रॅम आकर्षक गडद हिरवा रंग प्रतिझाड ६० ते ८० फळे मिळतात. गराचा रंग पांढराशुभ्र, अल्हाददायक सुगंध सौम्य स्वाद व जिभेवर जास्त काळ टिकणारी चव.

संपर्क : वैभव कांबळे,८५५१९२८१२८ (सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड,)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com