जमिनीच्या मगदुराप्रमाणे शेवगा लागवडीचे अंतर ठेवावे.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे शेवगा लागवडीचे अंतर ठेवावे.

कोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीर

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेवगा हे पीक चांगले उत्पन्न देणारे आहे. पावसाळ्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर शेवग्याची लागवड करावी. तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टीने केली जाते. फलोद्यान योजनेमुळे महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्र वाढत आहे. सलग लागवडीसोबतच आंबा, पेरू, सीताफळ, मोसंबी, संत्री, लिंबू अशा अन्य फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड वाढत आहे. शेवगा हा बहुवर्षीय द्विदलवर्गीय वृक्ष असून, जमिनीत नत्र स्थिर करतो. त्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत  सुधारण्यास मदत होते.

हवामान : उत्तम वाढीसाठी समशीतोष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. सर्व साधारण २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात शेवग्याची वाढ चांगली होते. झाडास फुले व शेंगा भरपूर लागतात. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच ढगाळ हवामान, अतिथंड तापमान, धुके आणि अति पाउस या पिकाच्या वाढीस बाधक ठरते.

जमीन : शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत फायदेशीर ठरते. डोंगर उताराच्या हलक्या जमिनीही उपयुक्त ठरतात.  मात्र निचरा न होणाऱ्या भारी काळ्या जमिनीत शेवगा लागवड करू नये. अशा जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात. झाडे मरतात. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.

लागवडीचा हंगाम : कोरडवाहू किंवा कमी पावसाच्या क्षेत्रात जून- जुलै महिन्यांमध्ये शेवगा पिकाची लागवड करावी.

लागवडीची पद्धत : बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड कमी पावसाच्या प्रदेशात जून- जुलै महिन्यामध्ये करावी, तर कोकणासारख्या अति पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट- सप्टेंबर या कालावधीत करावी. व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास मे- जून महिन्यांत २ x २ x २ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. त्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०० ग्रॅम निंबोळी खत व १० ग्रॅम दाणेदार कीटकनाशक मातीत चांगले मिसळून घ्यावे. खड्डा भरून घ्यावा. हलक्या जमिनीत लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ मी x २.५ मी (प्रति हेक्टरी ६४० रोपे) व मध्यम जमिनीसाठी ३.० मी x ३.० मी  (प्रति हेक्टरी ४४४ रोपे) अंतर ठेवावे. शेवग्याचे बियाणे उपलब्ध झाल्यावर त्याचे प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करावी. बियाणे टोकताना त्यास इजा होऊ नये म्हणून बी न दाबता हळुवारपणे पिशवीत ठेवून नंतर त्यावर माती टाकावी. पाणी द्यावे. शेवग्याचे बी पिशवीत लावल्यानंतर एक महिन्याच्या आत लागवड होईल याची काळजी घ्यावी. रोप जास्त दिवस पिशवीत ठेवल्यास सोटमूळ वाढून वेटोळे होतात. रोप खराब होते.पाने गळून रोपे जळण्याची शक्यता असते. काढणी व उत्पादन : शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडणीस येतात. पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. शेंगाकाढणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. काढणीनंतर विक्रीपुर्वी शेंगाची जाडी, पक्वता व लांबीनुसार प्रतवारी करावी. ताजेपणा टिकण्यासाठी शेंगा ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवाव्यात. एक वर्षानंतर पूर्ण वाढ झालेल्या जातीनुसार झाडापासून २५ ते ३५ किलो शेंगा मिळतात.

सुधारित जाती : पी के एम-१ (कोईमतूर-१,), पी के एम-२ (कोईमतूर-२): तमिळनाडू कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित केलेल्या या जाती आहेत. शेंगा लवकर येतात तसेच भरपूर प्रथिनयुक्त असतात. शेंगा दोन ते अडीच फूट लांब, पोपटी रंगाच्या, भरपूर आणि चविष्ट गराच्या असल्यामुळे देशांतर्गत व निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. कोकण रुचिरा : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित या शेंगाची लांबी १.५ ते २ फूट असून, शेंगा त्रिकोणी आकाराच्या असतात. पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी ३५ ते ४० किलो शेंगा मिळतात. भाग्या (के. डी. एम.-०१) : कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित ही जात बारमाही उत्पादन देणारी असून, ४ ते ५ महिन्यांत फलधारणा होते. शेंगांची चव उत्तम असून, २०० ते २५० शेंगा प्रति झाड प्रति वर्ष मिळतात. ओडिसी : या जातीला वर्षातून दोनदा बहर येतो. लागवडीनंतर अवघ्या ४ ते ५ महिन्यांत फुले गुच्छाने लागतात, सहा महिन्यांपासून हिरव्या रंगाच्या शेंगांची तोड सुरू होते. शेंगांची लांबी १.५ ते २ फूट असून, झाडांना शेंगा घोसाने लागतात. शेंगांत गराचे प्रमाण जास्त असून चव उत्कृष्ट असते. काढणी नंतरची टिकवणक्षमता चांगली असल्याने अन्य शेंगांच्या तुलनेत बाजारभाव चांगला मिळतो. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून सरासरी वर्षाला २५ ते ३० किलो शेंगा मिळतात. एकदा लागवड केल्यास व वेळेवर छाटणी केल्यास ४ ते ५ वर्षे सलग उत्पन्न मिळत राहते.

संपर्क : अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com