पिकाच्या मूलस्थानी जलसंधारण महत्त्वाचे...

मूलस्थानी जलसंधारण
मूलस्थानी जलसंधारण

समतल मशागत आणि पेरणीमुळे पिकाच्या दोन ओळींतील पावसाचे पाणी त्याच ओळीत राहून ते जमिनीत मुरण्यास पुरेसा कालावधी मिळतो. पावसाचे पाणी जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात मुरल्यामुळे व पिकांना सारख्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ एकसारखी होऊन उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. जिरायती शेतीमध्ये फायदेशीर आणि स्थिर उत्पादन देणाऱ्या पीकपद्धती बरोबरच, पिकांच्या मूलस्थानी पावसाचे पाणी मुरविण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुहेरी फायदा होऊन पीक उत्पादनासाठी फायदेशीर ठरते. जिरायती शेतीमध्ये पावसाचे पाणी पिकांच्या मूलस्थानी मुरविण्याच्या उपयुक्त पद्धती प्रामुख्याने वनस्पती व्यवस्थापनविषयक व जमीन मशागतविषयक प्रकारात येतात. वनस्पती व्यवस्थापनविषयक प्रकारामध्ये, समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती व जैविक बांधाचा समावेश होतो, तर जमिनीची मशागतविषयक पद्धतीमध्ये मृतसरी, ठराविक ओळीनंतर जलसंधारण सरी, सरी- वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा - सरी व बंधिस्त बांध पद्धतींचा समावेश होतो.

समतल मशागत आणि पेरणी :

  • समतल मशागतीअंतर्गत जमिनीची नांगरणी, वखरणी, पेरणी व आंतरमशागतीची कामे त्या क्षेत्राच्या समतल रेषेला समांतर करण्यात येतात. या सर्व पद्धती आंतरबांध क्षेत्रात बांध बंधिस्तीच्या जोडीने बांधाला समांतर राबविण्यात येतात.
  • कमी उताराच्या जमिनीवर (१ टक्क्यांपेक्षा कमी) केवळ या पद्धतीच्या उपयोगाने मृद व जलसंधारण साधने शक्य आहे. दुर्बीण, प्लॅस्टिकची पारदर्शक नळी अथवा हायड्रोमार्करच्या साह्याने शेतावर एक किंवा अधिक (जमिनीच्या उतारानुसार) समतल मार्गदर्शक रेषा मशागतीपूर्वीच आखून घ्याव्यात. उन्हाळ्यातील मशागत, पेरणी व आंतरमशागत या मार्गदर्शक रेषेला समांतर करण्यात येतात.
  • या पद्धतीमुळे पिकाच्या दोन ओळीतील पावसाचे पाणी त्याच ओळीत राहून ते जमिनीत मुरण्यास पुरेसा कालावधी मिळतो. पावसाचे पाणी जमिनीत सारख्या प्रमाणात मुरल्यामुळे व पिकांना सारख्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने पिकांची वाढ एक सारखी होऊन उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.
  •  समतल मार्गदर्शक रेषेविना केवळ उताराला आडवी मशागत व पेरणी करण्याने जलसंधारणात वृद्धी होऊन उत्पादनात वाढ होते. उताराला आडवी मशागत व पेरणी करणे उत्पादन वाढीसाठी निश्चित फायदेशीर आहे.
  • आंतरपीक पद्धती : मृद,जलसंधारणाच्या दृष्टीने आंतरपीक पद्धती, जलसंधारणाच्या मशागतीच्या पद्धतीएवढीच परिणामकारक आहे. आंतरपिक पद्धतीतील डाळवर्गीय पिकांच्या समावेशामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याला अटकाव होऊन जमिनीत पाणी जास्त मुरते. त्यामुळे स्थिर उत्पादनाबरोबरच जलसंधारणाच्या दृष्टीने, शिफारशीत आंतरपीक पद्धतीची योग्य ओळीच्या प्रमाणात निवड करावी.

    उभ्या पिकात सऱ्या काढणे : कमी उताराच्या जमिनीवर प्रारंभीची आंतरमशागतीची कामे संपल्यानंतर (पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) बळीराम नांगराने किंवा कोळप्यांच्या फणाला दोर बांधून काही ओळीनंतर सऱ्या काढतात. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पावसाचे परिणामकारकरित्या संधारणास अशा सऱ्या उपयुक्त ठरतात. या सऱ्यांमुळे जमिनीत पाणी अधिक मुरुन दीर्घकाळ टिकून राहते. दीर्घ कालावधीच्या पिकांना त्याचा उपयोग होतो. कापूस, तूर अशा जास्त अंतरावर घेणाऱ्या पिकासाठी प्रत्येक २ ओळीनंतर तर ओळीने पेरल्या जाणाऱ्या कमी अंतराच्या पिकासाठी जसे ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकासाठी प्रत्येक चार ते सहा ओळीनंतर सऱ्या काढण्यात येतात. यामुळे हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाऊन उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

    सरी वरंबा व बंदिस्त सरी :

  • हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर पिकांच्या मूलस्थानी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी सरी वरंबा पद्धत उपयुक्त आहे. पेरणीपूर्वी सरी वरंबे तयार करून वरंब्यावर पेरणी करतात.  सऱ्यामध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ते वरंब्यात; तसेच जमिनीत मुरते. अतिरिक्त पाणी सरीद्वारे शेताबाहेर वाहून नेले जाते.
  • सरी वरंबा पद्धतीमुळे वरंब्यामध्ये हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाऊन पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरते.
  • ही पद्धत ज्वारी, बाजरी, सूर्यफूल इत्यादी पिकासाठी फायदेशीर आहे.
  • कमी पावसाच्या क्षेत्रात तसेच अनियमित उताराच्या जमिनीत सरी वरंबा पद्धतीमध्ये सलग सरी न ठेवता ठराविक अंतरावर सरीमध्ये आडवे वरंबे तयार करतात. यास बंदिस्त सरी पद्धत असे म्हणतात. ही पद्धत पिकांच्या मूलस्थानी पाणी मुरविण्यासाठी सर्वात उपयुक्त  आहे.
  • रुंद वरंबा सरी पद्धत :

  • ही पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा यादृष्टीने अतिशय उपयुक्त आहे.
  • रिजरच्या साह्याने रुंद वरंबे - सऱ्या तयार करतात. पिकांच्या ओळीच्या गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठरवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला सऱ्या पाडण्यात येतात. या रुंद वरंब्यावर पेरणी करण्यात येते.
  • साधारणपणे जास्त अंतरावरील पिकांच्या (कापूस, तूर) दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या (सोयाबीन, हरभरा) तीन ते चार ओळी वरंब्यावर येतील. याप्रमाणे नियोजन करून सऱ्या पाडण्यात येतात.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होते. सरीतील पाणी वंरब्यामध्ये मुरते. तर अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढले जाते. वंरब्यामध्ये हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जाऊन उत्पादनात वाढ होते.
  • जास्त पावसाच्या क्षेत्रात सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार देण्यात येतो. रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये पेरणीसाठी क्रीडा संस्थेने विकसित केलेले बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करावा.
  • जैविक बांध

  • कमी उताराच्या जमिनीवर मृद व जलसंधारणाकरिता मातीच्या बांधाच्या ऐवजी जैविक बांधाचा उपयोग करता येऊ शकतो. मध्यम उतारावरील जमिनीकरिता मातीच्या बांधाच्या जोडीने जैविक बांधाचा उपयोग परिणामकारक आहे.
  • खस गवत, सुबाभुळ, गिरीपुष्प किंवा उत्पादक झुडुप वर्गीय वनस्पती किंवा चरावू गवताचा उताराला आडवा किंवा समतल रेषेवर २५ ते ३० मिटर अंतरावर बांध तयार करावा.
  • सुबाभूळ व गिरिपुष्पाच्या छाटणीच्या कोवळ्या फांद्या आणि पाने हे सेंद्रिय खत, आच्छादन तसेच चरावू गवताचा चारा म्हणून उपयोग होतो.
  • सुबाभळीचा ज्वारीवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे सुबाभूळची ज्वारीवर अाधारित पीक पद्धतीच्या क्षेत्राकरिता जैविक बांधासाठी उपयोग करू नये.
  • जैविक बांधाचा समतल मशागतीकरिता मार्गदर्शक रेषा म्हणूनही उपयोग होतो.
  • संपर्क : ०२४५२-२२५८४३ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com