सेंद्रिय शेतीचा वसा घेत व्यावसायिक पिकांची शेती

किरण पवार आपल्या शेतात
किरण पवार आपल्या शेतात

घोडेगाव (जि. जळगाव) येथील किरण पवार गेल्या तीन वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. कापूस, कांदा, मोसंबी, डाळिंब आदी पिकांमध्ये त्याचे प्रयोग सुरू आहेत. मिळणाऱ्या एकरी उत्पादनाबाबत, गुणवत्तेबाबत ते समाधानी आहेतच. शिवाय उत्पादन खर्चातही बचत झाल्याने किरण यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत.      रासायनिक निविष्ठांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे विशेषतः सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले आहे. रासायनिक खते, कीडनाशके यावरील खर्च वाढतो आहे. या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी घोडेगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील मध्यमवयीन शेतकरी किरण भीमराव पवार सुमारे तीन वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीकडे वळले. पहिल्या वर्षी केवळ सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करताना अनेक अडचणी आल्या. त्रास झाला. उत्पादनही म्हणावे तेवढे मिळाले नाही. परंतु जसजसे सेंद्रिय शेतीत सातत्य ठेवत गेले तसतसे त्याचे फायदे दिसू लागले.  

सेंद्रिय शेतीचा घेतलेला वसा : किरण यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे २५ एकर शेती आहे. यातील आठ एकर शेतात त्यांनी पूर्णतः सेंद्रिय शेतीचे उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहेत. महागड्या रासायनिक निविष्ठा वापरूनही समाधानकारक उत्पादन येत नव्हते. अशातच किरण सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग काम करणारे पिंप्री खुर्द (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी नाना पाटील यांच्या संपर्कात आले. नानांनी त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व व फायदे समजावून देत मार्गदर्शनही केले. मात्र केवळ सेंद्रिय पध्दतीचा वापर केल्यास उत्पादनावर परिणाम होईल या भीतीने घरातून सुरवातीला विरोध झाला. परंतु, किरण आपल्या निश्चयावर ठाम राहिले. त्यांनी दशपर्णी अर्क, जीवामृत स्लरी तयार करण्याचे प्रशिक्षण तालुका कृषी विभागातर्फे घेतले. सेंद्रिय शेतीसंबंधीचे शेतकऱ्यांचे अनुभव अभ्यासले.  

मोसंबी, कांदा, कपाशी : किरण यांनी तीन एकर मोसंबीची लागवड केली अाहे. त्यातही जीवामृत स्लरी, दशपर्णी अर्क यांचा वापर केला जातो. सुमारे २० गुंठ्यात डाळिंब असून लहान झाडे असल्याने त्यात कांद्याचे आंतरपीक घेतले आहे. डाळिंबासाठीही सेंद्रिय घटकांचाच वापर सुरू आहे. मोसंबी बागेत कपाशीचे आंतरपीक घेतले जाते. उर्वरित चार एकरांत सलग कपाशी आहे.     जैविक घटकांचा वापर :

  • दशपर्णी अर्कचा तयार करताना प्रति दोनशे लिटर पाण्यात पाच किलो कडुनिंबाचा पाला, यासोबत एरंडी, करंजी, सीताफळ, धोत्रा, कण्हेर आदी झाडांचा पाला वापरला जातो. साधारण २१ दिवस हे मिश्रण आंबवले जाते.
  • जीवामृत स्लरीमध्ये गोमूत्र, बेसन पीठ, गूळ, शेण यांचे मिश्रण तयार केले जाते. आठवडाभर ते आंबवले जाते. शेतातच कडूनिंबाच्या झाडाखाली झाकून ठेवले जाते. दशपर्णी अर्क व जैविक स्लरीसाठी प्लॅस्टिकच्या टाकी आहेत. मोसंबीला झाडांच्या मुळानजीक ही स्लरी दिली जाते. तर कपाशी व कांद्यामध्ये पाट पद्धतीने सिंचन करताना स्लरीचे मिश्रण चारीत टाकले जाते. म्हणजे पाण्यात स्लरी मिसळून ती झाडांच्या मुळांपर्यंत जाते.  
  •  शेतात तयार होणारा पालापाचोळा तसेच पिकांचे अवशेष न जाळता, बांधाबाहेर न फेकता शेतातच कुजविण्यावर भर असतो. तणही भांगलणीनंतर शेतातच कुजविले जाते. या सर्वांचा उत्तम खत म्हणून वापर होतो.  
  • पशुधनाचे संगोपन : सेंद्रिय शेतीत गोमूत्र, शेणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळे पवार कुटुंबाकडे लहान, मोठी, अशी एकूण २२ जनावरे आहेत. त्यात सहा देशी गायी, एक म्हैस, वासरू, पारडू, एक बैलजोडी यांचा समावेश आहे. दररोज गोमूत्र १० लिटर तर शेण ३० ते ४० किलो मिळते. शेण, दूध काढण्याचे काम किरण यांचे बंधू अरुण पवार व पुतणे आदी करतात.

    उत्पादन : सेंद्रिय शेतीच्या पहिल्या वर्षी किरण यांना कपाशीचे एकरी ९ क्विंटल तर त्यापुढील वर्षी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. रासायनिक शेतीतील उत्पादनात व सेंद्रिय उत्पादनात फारसा फरक नाही. म्हणजेच उत्पादन घटलेले नाही. यंदा पाणी खूप कमी होते. मात्र एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादनाचा अंदाज आहे. मोसंबी तोडणीवर आली आहे. कांद्याचे पहिले उत्पादन एकरी १४० क्विंटल तर दुसऱ्या वर्षी रोगाची समस्या आल्याने उत्पादन ७० ते ८० क्विंटल मिळाले. कपाशीला पूर्वी एकरी वीसहजार ते २२ हजार रुपये किमान खर्च यायचा. आता तो दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

    सेंद्रिय शेतीचे झालेले फायदे : रासायनिक खते व कीडनाशके यांच्या खर्चात पूर्ण बचत झाली आहे. स्लरी, अर्क तयार करण्यासाठी सर्व बाबी मात्र काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. आता जमिनीची सुपिकताही वाढीस लागणार आहे. पूर्वी जमीन कडक वाटायची. त्यावरून पायी चालणे जिकिरीचे जायचे. आता ती भुसभुशीत, मऊ झाली असल्याचे पवार सांगतात. संपर्क : किरण पवार, ९५०३३१७६९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com