सेंद्रिय हळद, ऊस उत्पादनासह प्रक्रिया पदार्थनिर्मितीकडे कल

आपल्या शेतात वडीलांसह निवास साबळे
आपल्या शेतात वडीलांसह निवास साबळे

शेतकरी :  निवास लक्ष्मण साबळे, शिवथर, ता. जि. सातारा सातारा जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील मालगाव येथील सात्विक सेंद्रिय शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अनेक शेतकरी उत्तमरीत्या सेंद्रिय शेती करत आहेत. या गटातील शिवथर (ता. जि. सातारा) येथील निवास लक्ष्मण साबळे हे सेंद्रिय पद्धतीने हळद आणि ऊस पिकाचे उत्पादन यशस्वीपणे घेत असून, सेंद्रिय गूळनिर्मितीही करत आहेत.

शिवथर (ता. जि. सातारा) येथील निवास साबळे यांची वडिलांसह एकत्रित ३.५ एकर शेती आहे. शिक्षण सुरू असतानाही ते वडिलांच्या सोबतीने पारंपरिक शेती करत. पुढे काही काळ व्यवसाय केल्यानंतर संपूर्ण वेळ शेती करू लागले. या काळात वडिलांनी नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतले. चार वर्षांपूर्वी त्या पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. मालगाव परिसरामध्ये सात्विक सेंद्रिय शेतकरी बचत गट कार्यरत असून, त्या गटामध्ये ते समाविष्ठ झाले. गटातील प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी गाय असणे बंधनकारक आहे, त्यामुळे दोन गीर गायींची खरेदी केली. रासायनिक शेती पूर्णपणे थांबवून दोन एकर ऊस आणि दहा गुंठे हळद या पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड सुरू केली. उर्वरित क्षेत्रामध्ये गहू, ज्वारी ही हंगामी पिके घेतात. या वर्षी प्रथमच वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या भाजीपाला पिकांची लागवड केली. या गटातील ३७ शेतकऱ्यांनी पीजीएस प्रमाणीकरणासाठी प्रयत्न केले असून, त्याचे दुसरे वर्ष आहे. सेंद्रिय उत्पादन आणि उत्पन्नाविषयी निवास साबळे यांनी सांगितले, की रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये उत्पादन कमी येत असले तरी जमिनीचा पोत सुधारत आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक घटकांच्या साह्याने कीडरोग नियंत्रणात ठेवण्याकडे कल असतो. खर्च अत्यंत कमी असल्याने कमी उत्पादन येऊनही परवडू शकते.    

घन जीवामृताचा वापर : दरवेळी पाण्यासोबत जीवामृत देत असले तरी आवश्यकतेनुसार घन जीवामृताचा वापर केला जातो. दोन पोती सुकवलेले शेण, दहा लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो बेसन, वडाच्या झाडाखालील माती यांचे मिश्रण बारदानामध्ये भरून तीन दिवस सावलीमध्ये ठेवतात. त्यानंतर ते शेतात टाकतात.

सेंद्रिय हळद :

  • अक्षयतृतीयेला दहा गुंठे क्षेत्रात हळद लागवडीचे नियोजन असते. त्याआधी शेतात मेंढ्या बसवून घेतात. शेतजमिनीच्या मशागतीनंतर शेणखत मिसळून यानंतर साडेतीन फुटी सरी पाडल्या जातात. त्यावर एक फूट अंतरावर हळदीची लागवड करतात.
  • पाण्यासाठी ठिबक सिंचन केले आहे. हळद लागवडीनंतर प्रत्येक पाण्यासोबत जीवामृत दिले जाते.
  • कीड व रोगनियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक १५ ते २० दिवसांनी दशपर्णी अर्क, गोमूत्र, ताक, बाभळी पाला यांची फवारणी घेतात.
  • भांगलणीबरोबर हळदीस भर लावताना निबोंळी व शेंगदाणा पेंड दिली जाते.
  • दहा गुंठे क्षेत्रात साधारपणे चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळते.
  • बहुतांश सर्व निविष्ठा या घरगुती बनवून वापरल्या जात असल्याने दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो.
  • निवास साबळे यांची वैशिष्ट्ये :

  • गेल्या चार वर्षांपासून गहू, ज्वारी, हळद व उसाची शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. या वर्षी भाजीपाला पिकांची लागवडही केली आहे.
  • सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उसापासून सेंद्रीय गुळाची निर्मिती केली जाते. गटाच्या माध्यमातून ६० ते ७० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री होते.
  • गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. 
  • संपर्क : निवास साबळे, ९९२२५२४२६२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com