गांडुळांच्या भरपूर संख्येमुळे माझी शेती सुपीक

गांडुळांच्या भरपूर संख्येमुळे माझी शेती सुपीक
गांडुळांच्या भरपूर संख्येमुळे माझी शेती सुपीक

सांगली जिल्ह्यातील बेडग येथील तानाजी नलवडे १५ वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. सुरवातीला उत्पादन कमी मिळाले; मात्र सातत्याने गांडुळखत, गोमूत्र व गांडुळपाणी वापरामुळे जमिनीची सुपीकता, जीवाणूंची संख्या प्रचंड वाढली. परिणामी पीकउत्पादन व दर्जा लक्षणीय सुधारल्याचे ते सांगतात. राज्य सरकारने त्यांना २०१५ मध्ये ‘प्रयोगशील शेतकरी’ पुरस्कार देऊन गाैरविले आहे. आपल्या सेंद्रिय शेतीतील यशाबाबत तानाजी नलवडे म्हणतात ‘‘ माझ्या १५ वर्षे वयाच्या पेरु बागेत प्रतिझाड २००० पेक्षा जास्त फळे लागतात. चिकूच्या १५ वर्ष वयाच्या झाडांनाही २-३ हजारादरम्यान फळे लागतात. यंदा ३० गुंठे क्षेत्रात ६०-७० टन उसाचे उत्पादन मिळेल.   आपल्या पीक नियोजनाबाबत  नलवडे म्हणतात की, ‘‘सध्या शेतात चिकू, रामफळ, पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब  आदी फळझाडे आहेत. त्याशिवाय गवती चहा, पोकळा, मेथी, गवारी, भेंडी, वांगी, ऊस ही पिके आहेत. ऊसपिकात नुकतीच मोठी भरणी करताना ३० गुंठे क्षेत्रात ५०० किलो गांडुळखत दिले आहे. त्यानंतर २० दिवसांनी गांडुळपाणी एकरी १० लिटर या प्रमाणात ठिबक संचातून मी देत असतो. त्यामुळे जमिनीत गांडूळ, तसेच जीवाणूंची संख्या वाढून उसाला काळोखी येते. ऊसपिकाला पाणी देताना जमिनीत केवळ ओलावा राहिल इतकेच पाणी देत असतो. त्यासाठी ४-५ दिवसांतून ३ तास पाणी देत असतो.  कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्क ५ लिटर प्रति २०० लिटर पाणी प्रतिएकरी याप्रमाणे फवारणी करतो. ’’

भाजीपाला व फळबाग नियोजन : भाजीपाला व फळबाग नियोजनाबाबत नलवडे म्हणतात ‘‘ भाजीपाला आणि फळबागेत दशपर्णी अर्क १०-२० मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करतो. दशपर्णी अर्क तयार करताना दहा औषधी वनस्पतींचा पाला गोमूत्रामध्ये भिजवला जातो. त्यामुळे गोमूत्राचेही औषधी गुणधर्म अर्कात उतरतात. अमावास्या व पौर्णिमा या दिवशी कीडींच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे दशपर्णी अर्काची फवारणी या दिवशीच मी करीत असतो. याशिवाय लसूण, मिरची व तुळस यांचा अर्क २० मि.लि. प्रतिलिटर पाणी, तसेच गवती चहा, निरगुडी व तुळस यांचा अर्क २० मि.लि. प्रतिलिटर पाणी अशी फवारणी आलटून पालटून गरजेनुसार करीत असतो. त्यामुळे कीड व रोग नियंत्रण चांगले होते. भाजीपाला पिकांना कळी लागणीच्या काळात १५० ते २०० ग्रॅम गांडुळखत प्रतिझाड अशी खतमात्रा दिली जाते. पिकांना संतुलित अन्नघटकांची मात्रा तर मिळतेच तसेच रोगांचा प्रादुर्भावही होत नाही. नुकतीच लागवड केलेल्या वांगी पिकात लागवडीवेळी प्रतिरोप ५० ग्रॅम गांडुळखत दिले आहे. आता १५ दिवसांनी दोन झाडांमध्ये १५० ग्रॅम गांडूळखत देणार आहे.  फळबागेत प्रतिझाड १० किलो गांडुळखत  देणार आहे. भाजीपाला पिकात जेथे सूक्ष्म तुषारसिंचन आहे तेथे २-३ दिवसांच्या अंतराने १०-१५ मिनिटे संध्याकाळच्या वेळी पाणी देणार आहे. जेथे पाटपाणी देतो तेथे २-३ दिवसांच्या अंतराने पाणी देणार आहे. फळझाडांना आठवड्यातून एकदा पाटपाणी देणार आहे. मुळांपाशी कायम ओलावा राहून गांडूळ व इतर जीवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण होईल इतकेच पाणी देण्यावर भर असतो. अशा व्यवस्थापनामुळे गांडुळांची उपलब्धता वाढते. त्यामुळे योग्य निचरा होऊन पाणी व अन्नद्रव्य पिकाला भरपूर प्रमाणात मिळतात.’’    संपर्क : तानाजी नलवडे, ९९७०५४२६३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com