सकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेल

 मारवेल
मारवेल

बाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो. दशरथ चारापिकाची चराऊ रानात लागवड केल्यास वर्षभर हिरवा चारा मिळतो. मारवेल हे बहुवर्षायु चारापीक आहे. चारापिकांचे योग्य व्यवस्थापन ठेवल्यास सकस चारा मिळतो. मारवेल

  • सरळ उभे, उंच झुबक्यात वाढणारे, बारीक खोडाचे बहुवर्षायु चारापीक आहे. अवर्षणप्रवण विभागात लागवडीस योग्य.
  • गवताची उंची साधारणपणे १ ते १.५ मीटर. गवताची मुळे जमिनीमध्ये खोलवर जाऊन पाणी व अन्नद्रव्य शोषतात.
  • पाला रुचकर असतो. काडीचा रंग फिकट पिवळा, पानाचा रंग फिकट हिरवा असतो.
  • गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण ६ ते ७ टक्के असते. याचा वापर हिरवा चारा, वाळलेला चारा तसेच मुरघास बनवण्यासाठी करतात. मुरघास तयार करण्यासाठी गवताची कापणी पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर करावी. इतर गवतापेक्षा मारवेल हिरवा चारा म्हणून जनावरे आवडीने खातात.
  • गवताची अभिवृद्धी बिया, ठोंब आणि रोपांपासून करतात. ठोंबापासून लागवड करण्यासाठी दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. आणि दोन ठोंबातील अंतर ३० सेें.मी. ठेवावे.
  • लागवड जून ते ऑगस्टदरम्यान करावी.
  • लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
  • दशरथ

  • हे १ ते २ मीटर पर्यंत उंच वाढणारे द्विदल वर्गातील बहुवर्षीय झुडूप आहे. याच्या खोडाचा जमिनीलगतचा भाग काहीसा काष्टमय असतो.
  • याची चराऊ रानात लागवड केल्यास वर्षभर हिरवा चारा मिळू शकतो. यामध्ये १९.१ टक्के प्रथिने, ९.३ टक्के फॅट, १.९ टक्के खनिजे, ३७.७ टक्के कर्बोदके असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम व मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात असतात.
  • रोगमुक्त, भेसळमुक्त आणि न फुटलेल्या बियाण्यांची निवड करावी. बागायती क्षेत्रात लागवड करताना दोन ओळींतील अंतर ४० ते ४५ सें.मी. ठेऊन बी सलग पेरावे. हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणे ५ मि.लि. रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  • लागवडीच्या वेळी २५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
  • लागवड जून ते ऑक्टोबर या कालावधीत करावी.
  • वर्षाअखेर साधारणत: ५ ते ६ कापण्या मिळतात. पहिली कापणी पेरणीपासून ६० दिवसांनी करावी. त्यानंतर दर ४५ ते ५० दिवसानंतर कापण्या कराव्यात. अशा प्रकारे कापणी केल्यास फांद्या पालेदार, रसाळ असतात. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. दरवर्षी हेक्टरी ६० ते ८० टन हिरवा चारा उपलब्ध होतो.
  • बाजरी

  • हे एकदल वर्गातील चारापीक आहे. याचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक आहे.
  • लागवड जून महिन्यामध्ये करावी. दोन ओळीत अंतर २५ ते ३० सें.मी. ठेवावे.
  • हेक्टरी बारा किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ मि.लि.ॲझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
  • हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश ही खत मात्रा द्यावी.
  • पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करावी. कापणी करताना ४ ते ५ इंच जमिनीपासून वर कापावे. यामुळे फुटवे जास्त मिळतात. त्यानंतरची कापणी ४५ ते ५० दिवसांनी करावी.
  • सुधारित जाती नेपियर बायफ संकरित नेपियर-१०

  • हत्ती गवत आणि बायफ बाजरी-१ यांचा संकर. हत्ती गवतातील बहुवर्षायुपणा, जास्त उत्पादन, जलद वाढ आणि बाजरीचा पालेदारपणा, मऊ व कूस विरहित पाने खोड, रसाळ हे गुणधर्म एकत्रित आले आहेत.
  • चाऱ्यात ८ ते ९ टक्के प्रथिने, ६० ते ६५ टक्के पचनीय घटक. एकदा लागवड केल्यास हे पीक पाच वर्षांपर्यंत उत्पादन देते.
  • या चाऱ्यामुळे गाई, म्हशींच्या दुधामध्ये वाढ दिसून आली आहे.
  • एक वर्षानंतर गवताच्या एका खोडामध्ये सुमारे १५० ते २०० फुटवे मिळतात. या गवतापासून वर्षभरात ६ ते ७ कापण्या मिळतात. त्यापासून हेक्टरी १८० ते २०० टन हिरवा चारा मिळतो.  
  • बाजरी बायफ बाजरी-१

  • निवड पद्धतीने तयार केलेली सरळ जात. याचा पाला रसाळ, गोड, लव विरहित, मऊ, उंच वाढणारा, भरपूर फुटवे, चाऱ्याचे जास्त उत्पादन, जोमाने वाढणारी आणि तीन कापण्या देणारी जात आहे.
  • हिरवा चारा तसेच वाळलेला चाराही पौष्टिक. हलकी जमीन व कमी पाण्याच्या भागामध्ये या जातीपासून चांगले उत्पादन मिळते. उत्तम प्रतीचा मुरघास तयार  होतो.
  • हिरव्या चाऱ्यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने. या जातीपासून ५० ते ६० दिवसांच्या कालावधीत हेक्टरी ४० ते ४५ टन हिरवा चारा.
  • बहुकापणीकरिता चांगली जात. बहुकापणी पद्धतीमध्ये पहिली कापणी ५५ ते ६० दिवसानंतर दुसरी व तिसरी कापणी ३५ ते ४० दिवसांच्या फरकाने करावी. तीन कापण्यापासून हेक्टरी ९० टन हिरवा चारा मिळतो.
  • संपर्क : ०२०-२६९२६२४८ (बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com