हरितगृहातील जरबेरा लागवड...

जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी उतीसंवर्धित रोपांची लागवड करावी. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकाचे भरपूर उत्पन्न मिळते. जरबेरा फुलांमध्ये विविध रंग असून मागणी भरपूर असते. त्यामुळे जरबेरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे.   जाती : बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची लागवड करावी. जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी (सामू ५.५ ते ६.०) निवडावी. गादी वाफ्याची रुंदी ६० सें.मी., उंची ४० सें.मी., दोन वाफ्यातील अंतर ५० ते ६० सें.मी. ठेवावे. लागवड : जमिनीचे निर्जंतुकीकरण (तज्‍ज्ञांच्या सल्ल्याने) करून रोपे गादी वाफ्यावर दोन ओळीत ३० सें.मी. x ३० सें.मी. अंतरावर ( ७ ते ९ प्रति चौ.मी.)लावावीत. उतीसंवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे निवडावीत. रोपे जास्त खोलीवर लावू नयेत. चांगली उत्पादन क्षमता असलेल्या झाडात पाने व फुलांचे गुणोत्तर २ः४ असते. पानांचे प्रमाण वाढल्यास फुले कमी मिळतात. पाणी व्यवस्थापन : ठिबक सिंचनातून (उपनळीतील अंतर ३० सें.मी., तोटीतील अंतर ३० सें.मी., तोटी क्षमता २-३ लिटर प्रतितासपेक्षा कमी) दररोज बाष्पीभवनाच्या ६० टक्के पाणी द्यावे. खत व्यवस्थापन : कुजलेले शेणखत १० किलो प्रति चौ. मी. या प्रमाणात मिसळून द्यावे. मातीपरीक्षणानुसार खते द्यावीत. सुरवातीचे तीन महिने १०ः१५ः२० ग्रॅम/ चौ.मी./ महिना व चौथ्या महिन्यांपासून १५ः१०ः३० ग्रॅम चौ.मी./ महिना याप्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश खतांची मात्रा द्यावी. खतमात्रा चार आठवड्यात विभागून द्यावी. याशिवाय सूक्ष्म द्रव्ये बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम इ. प्रत्येकी १.५ मि.लि.प्रतिलिटर पाणी या प्रमाणात महिन्यातून एकदा फवारणी करावी. खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास झाडांची वाढ जोमदार होऊन भरघोस व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते. त्यासाठी ठिबक सिंचनातून लागवडीनंतर नत्र, स्फुरद व पालाश २०ः२०ः२० या विद्राव्य खतातून ०.४ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात एक दिवसाआड पहिल्या तीन महिन्यांपर्यंत द्यावे. त्यामुळे फूट चांगली मिळते. चौथ्या महिन्यापासून फुले येण्यास सुरवात झाल्यानंतर नत्र, स्फुरद व पालाश १५ः८ः३५ या विद्राव्य खतातून ०.४ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात एक दिवसाआड द्यावे. त्यामुळे फुलांचे उत्पादन वाढून प्रतही सुधारते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची खते दर आठवड्याने किंवा पंधरवड्याने चिलेटेड स्वरूपात द्यावीत. उत्तम परिणाम मिळण्याच्या दृष्टीने पाणी व खते योग्य प्रमाणात गरजेनुसार द्यावीत.

जैविक खते व जैविक बुरशीनाशके अॅझोस्पिरिलम ५०० ग्रॅम, स्फुरद विरघळणारे जीवाणू खत ५०० ग्रॅम, ट्रायकोडर्मा ५०० ग्रॅम प्रति शेणखत १० किलो या प्रमाणात वेगवेगळे मिश्रण करून ८-१० दिवस प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. नंतर तिन्ही एकत्र करू ५०० चौ.मी. हरितगृहातील पिकास तीन आठवड्यांनी द्यावे. रोग नियंत्रण : पिकावर वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत मुख्यत्वे मूळ किंवा खोड कूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मूळकुज किंवा खोडकुज : रोगकारक बुरशी : रायझोक्‍टोनिया, फ्युजॅरियम, पिथियम, फायटाेप्थोरा आणि स्क्‍लेरोशियम. लक्षणे : रोगामुळे रोपवाटिकेत रोपांची मर होते. लागवडीनंतर जमिनीलगतच्या खोडावर बुरशीची वाढ होऊन त्या ठिकाणी खोडाचा भाग कुजतो आणि कालांतराने संपूर्ण झाड सुकते. पाण्याचा चांगला निचरा न झाल्यास आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. उपाय :

  • लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतूकीकरण करून घ्यावे. त्यानंतर गादी वाफे करून ७ ते १० दिवसांनी लागवड करावी.
  • निरोगी रोपांची लागवड करावी.
  • लागवड करताना ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा ५०० ग्रॅम प्रति १० किलो शेणखत याप्रमाणात वापर करावा.
  • पाण्याचा योग्य निचरा करावा. झाडांच्या मुळा आणि खोडा भोवतालचा जमिनीतील ओलावा कमी करावा.
  • रासायनिक नियंत्रण : प्रमाण प्रतिलिटर
  • वेळ : रोगाची लागण दिसू लागताच आळवणी
  • प्रमाण प्रतिलिटर कॅप्टन ३ ग्रॅम (०.३ टक्के)
  • सूचना : द्रावणाची दर महिन्याच्या अंतराने झाडाच्या खोडा व मुळाभोवती आळवणी करावी.
  • खतांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा.
  • संपर्क : डॉ. राजेंद्र हसुरे, ९४२१९८३४०३ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com