agricultural news in marathi,integrated fertiliser management of paddy , Agrowon, Maharashtra | Agrowon

भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन
डॉ. नरेंद्र काशीद, संदीप कदम, डॉ. विक्रम जांभळे
शनिवार, 21 जुलै 2018

भात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी येण्याच्या अनेक कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अभाव होय. अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना फक्‍त पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवण्याइतपत मर्यादित विचार न करता जमिनीची सुपीकता टिकवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

भात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी येण्याच्या अनेक कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अभाव होय. अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना फक्‍त पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवण्याइतपत मर्यादित विचार न करता जमिनीची सुपीकता टिकवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे फक्‍त रासायनिक खतांचा वापर एवढाच मर्यादीत अर्थ घेतला जातो. मात्र, जमिनीच्या सुपीकतेचाही सर्वांगीण विचार अपेक्षित आहे. जमिनीच्या सुपीकतेमध्येही जैविक सुपीकता, भौतिक सुपीकता आणि रासायनिक सुपीकता असे तीन वेगळे प्रकार पडतात. या तिन्ही प्रकारच्या सुपीकता टिकविण्यासाठी माती परीक्षणाच्या अहवाल महत्त्वाचा ठरतो. शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खते यांचा समतोल राखणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खतांचा वापर
जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खते उपयुक्त ठरतात. जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा झाल्याने खालील फायदे होतात.

 • अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
 • जमिनीची जलधारणक्षमता वाढते.
 • जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते.
 • जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा निचरा पुरेसा होतो. जमिनीतील तापमानात समतोलपणा राहतो.
 • जमिनीची धूप कमी होते.
 • काही अन्नद्रव्यांचे सेंद्रिय स्वरुपात रूपांतर होऊन ते संथ गतीने पिकांना मिळतात.
 • जैव रासायनिक प्रक्रिया योग्य दिशेने वाटचाल करतात. नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२.५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

हिरवळीची खते
शेतीतील लागवडीसाठी वापरले जाणारे हिरवळीचे पीक ४ ते ६ आठवड्याने फुलोऱ्यावर येणारे असावे. त्यातून भरपूर बायोमास मिळावा. हिरवळीचे पीक शक्यतो द्विदलवर्गीय असावे, त्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीत नत्राचा पुरवठा वाढवते. हे पीक हलक्या जमिनीतसुद्घा जोमाने वाढणारे व कमी पाण्यावर येणारे असते. हिरवळीच्या पिकाचे खोड कोवळे व लुसलुशित असल्याने जमिनीत गाडल्यानंतर लवकर कुजते.
गिरीपुष्प : हे कुठल्याही जमिनीत चांगले येते. बांधावर अथवा पडीक जमिनीत लागवड करता येते. प्रत्येक झाडापासून छाटणीचे वेळी २५-३० किलो हिरवा पाला मिळतो. गिरिपुष्पाचा पाला ३ टन प्रती हेक्टरी चिखलणीच्या वेळी गाडल्यास त्यातून भाताला हेक्टरी १० ते १५ किलो सेंद्रिय-नत्र मिळते. खाचरात सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होऊन जमिनीची जडणघडण सुधारते. उत्पादन क्षमता वाढते. गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात.
ताग : सर्व प्रकारच्या जमिनीत ताग चांगला वाढत असला तरी पाणथळ जमिनीत चांगली वाढ होत नाही. चिखलणीच्या वेळी हेक्‍टरी १० टन जमिनीत गाडावे. त्यासाठी हेक्टरी ५०-६० किलो बी लागते. या पिकाला सिंचनाची गरज असते. पीक ६० ते ७० सें.मी उंच वाढते. त्यात नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असल्यास हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र पिकाला उपलब्ध होते.
धैंचा : हे पीक कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीतसुध्दा तग धरू शकते. याच्या मुळांवर गाठी असतात. लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बी लागते. पीक ९० ते १०० सें.मी. उंच वाढते. त्यातून १८ ते २० टन हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून, हेक्टरी ८० किलो नत्र पिकास उपलब्ध होते. चिखलणीच्या वेळी हेक्‍टरी १० टन हिरवळीचे धैंचा खत जमिनीत गाडावे.

जैविक खते
जमिनीत अनेक तऱ्हेचे सुक्ष्म जिवाणू असतात. या जिवाणूपैकी निवडक उपयुक्त जिवाणूपासून संवर्धके केली जातात. या संवर्धकाचा वापर करुन पिकाचे उत्पादन वाढविता येते. जिवाणू खतामुळे मुळांच्या भोवती अनुकूल वातावरण तयार होते. रोपांची वाढ जोमदार होते. जिवाणूंपैकी काही जिवाणू रोगप्रतिबंधक वातावरण तयार करतात, तर काही जमिनीतील व खतातील पोषकद्रव्ये पिकाला सहजरित्या घेण्यास मदत करतात.
ॲझेटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करतात. ते हवेतील मुक्त नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात. १० किलो भात बियाणास २५० ग्रॅम ॲझेटोबॅक्टर जिवाणू खतांची पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी.
स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत : जमिनीत विरघळण्यास कठीण असलेल्या काही अन्नद्रव्यांमध्ये स्फुरदाचा क्रमांक पहिला लागतो. रासायनिक खताद्वारे वापरलेले स्फुरद कोणत्या ना कोणत्या रसायनाच्या स्वरुपात मातीमध्ये स्थिर होते. त्याचे शोषण वनस्पती करू शकत नाहीत. स्फुरदयुक्त खताचा वनस्पतींना शोषणायोग्य रुपांतर होणे गरजेचे असते.
स्फुरद विरघळवणारी जिवाणू खते (संवर्धके) : अविद्राव्य स्थिर घटकांचे द्राव्य रासायनिक स्वरुपात रूपांतर करतात. परिणामी वापरलेली स्फुरदयुक्त खते पीक वाढीच्या योग्य कालावधीत उपलब्ध होतात. या जिवाणू खताची १० किलो भात बियाणास २५० ग्रॅम याप्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी.

निळे-हिरवे शेवाळ
ही एकपेशीय लांब तंतुमय पानवनस्पती आहे. पेशीतील हरितद्रव्यांच्या साह्याने सूर्यप्रकाशात स्वत:चे अन्न तयार करते. हवेतील मुक्त नत्र स्थिर करून उपलब्ध होणाऱ्या स्वरुपात पिकांना उपलब्ध होऊ शकते.

निळे-हिरवे शेवाळाचे फायदे

 • हवेतला प्रति हेक्टरी २५-३० किलो मुक्त नत्र जमिनीत स्थिर केला जातो.
 • जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची वाढ होते. जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते.
 • जमिनीमध्ये उपयोगी जीवाणू उदा. ॲझेटोबॅक्टर, स्फूरद विरघळवणारे जीवाणू इ.ची वाढ होते.
 • स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो.
 • पिकांच्या वाढीस उपयुक्त अशा वृद्घी संप्रेरकांचा पुरवठा केला जातो. उत्पादनामध्ये १०-१५ टक्के वाढ होते. नत्राची मात्रा कमी करता येते.
 • निळे-हिरवे शेवाळ तयार करण्याची पद्धत सोपी असून शेतकरी स्वत: तयार करू शकतात.

निळे-हिरवे शेवाळाचा वापर

 • भाताची पुनर्लागवड झाल्यावर ८-१० दिवसांनी निळे हिरवे शेवाळ शेतामध्ये फेकून द्यावे.
 • भाताच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळ प्रती हेक्टरी वेगवेगळे स्वतंत्र वापरावे.
 • शेवाळ चांगले वाढण्यासाठी भात खाचरामध्ये पाणी साठवून ठेवणे आवश्‍यक आहे.
 • रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यामध्ये शेवाळ साठवू नये. भात शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशकाच्या प्रमाणीत वापराचा शेवाळावर अनिष्ठ परिणाम होत नाही.

अझोला
अझोला ही नेचेवर्गीय पाणवनस्पती असून, हवेतील नत्र स्वत:मध्ये साठवून ठेवते. ही वनस्पती नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या-हिरव्या शेवाळाच्या सहाय्याने नत्र स्थिर करते. भात शेतीमध्ये पाण्यामध्ये अझोल्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. सर्वसाधारणपणे भाताच्या एका हंगामात अझोलाची पाच पिके घेतल्यास हेक्टरी एकूण १२० किलो नत्र स्थिर केला जातो. हेक्टरी २५ ते ३० किलो नत्राची बचत होते. भातशेतीमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे अनेकवेळा अॅझेटोबॅक्टर योग्यरीत्या काम करू शकत नाही. अशा ठिकाणी अझोला नत्र स्थिरीकरणाचे कार्य उत्तम करते.

शेतामध्ये अझोल्याचा वापर आणि घ्यावयाची काळजी
चिखलण पद्धत : या पद्धतीमध्ये अझोला कायमस्वरुपी तळ्यात किंवा डब्यात वाढवून साठवून ठेवतात. भाताची पुनर्लागवड केल्यानंतर दोन दिवसांत सर्व शेतभर पसरतो. तो चिखलण पद्धतीने किंवा माणसांच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकतात. त्या जमिनीत पुन्हा पाणी साठवल्यास अझोला वाढतो. अशा प्रकारे अझोल्याचा भात शेतीमध्ये उपयोग होतो. अझोला हिरवळीचे खत म्हणून वापरल्यास हेक्टरी १० टन लागतो. शेतात अझोलाची वाढ केल्यास हेक्टरी १ टन पुरेसा होतो.
नांगरण पद्धत : या पद्धतीमध्ये शेतात अझोला भरपूर वाढवल्यानंतर त्यातील पाणी सोडून देतात. त्यामधील अझोला जमिनीवर बसल्यानंतर नांगरट करतात. शेतात पाणी पुन्हा अडवून धरतात. त्यामुळे आणखी अझोल्याची वाढ होते. तो अझोला नांगरट करून जमिनीत गाडतात, नंतर नेहमीप्रमाणे भाताची लागवड करतात.

संपर्क : डॉ. नरेंद्र काशीद, ९४२२८५१५०५
(कृषी संशोधन केंद्र, वडगांव (मावळ), जि. पुणे.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...