अल्पभूधारकांसाठी अधिक स्वस्त, कार्यक्षम यंत्रांची गरज

अल्पभुधारकांसाठी यंत्र
अल्पभुधारकांसाठी यंत्र

भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी यंत्रे, अवजारे व तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी किर्लोस्कर उद्योग समूह १३३ वर्षांपासून कार्यरत आहे. राज्यामध्ये पहिला लोखंडी नांगर तयार करणाऱ्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.च्या धोरण आणि कृषी व्यवसायाचे उपाध्यक्ष अँटोनी चेरुकरा यांच्याशी केलेली बातचीत... प्रश्न : स्वातंत्र्यापूर्वीपासून किर्लोस्कर उद्योग समूह आणि शेतकरी यांचा सांधा जुळलेला आहे. त्याविषयी माहिती द्या.   उत्तर : १३३ वर्षांपूर्वी किर्लोस्कर उद्योगसमूहाची स्थापना हीच मुळी शेतीउपयोगी अवजारांच्या निर्मितीपासून झाली आहे. पुढे १९१० मध्ये ऑईल इंजिन, पंप असा विस्तार झाला. अभियांत्रिकी उद्योगांना विविध यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यातून प्रामुख्याने ‘बिझनेस टू बिझनेस’ असा पाया विस्तारला. आता ‘बिझनेस टू कंझ्यूमर’ या तत्त्वाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त यंत्रांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्न : आपण पॉवर टिलर व्यवसायातही उतरला आहात, त्याची पार्श्वभूमी आणि धोरणविषयक माहिती द्या. उत्तर : २०१५ मध्ये ग्रामीण सर्वेक्षणातून शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. लहान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. कारण ट्रॅक्टरबरोबर अनेक अवजारेही वेगळी खरेदी करावी लागतात.  परिणामी लहान शेतकऱ्याला बैलचलित मशागतीकडे वळावे लागते. बैलांनाही वर्षभर सांभाळणे कठीणच आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचा पर्याय असला तरी त्यात तो वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पेरणी वेळेवर होत नाही. त्यामुळे पॉवर टिलर व्यवसायात उतरण्याचे निश्चित केले.

प्रश्न : पॉवर टिलरमधील सुविधा आणि एकूण बाजारपेठेविषयी माहिती सांगा. उत्तर : गरीब शेतकऱ्याचे यंत्र अशी पॉवर टिलरची प्रतिमा आहे. त्यात शेतकऱ्याच्या सुविधा, सुरक्षितता यांचा विचारच झालेला नाही. एक एकर चिखलणी करण्यासाठी चार ते पाच किलोमीटर खाली वाकून चालावे त्यामागे लागते. इंजिनचे हादऱ्यांमुळे खांद्यावर येणारा ताण येतो. मेगा टी (१५ एचपी) आणि मेगा टी १२ (१२ एचपी) मध्ये ट्रॅक्टरसारखी रचना केली. मेगा टीमध्ये बसण्याची सुरक्षित सुविधा असून, काम करताना खांद्यावर कोणताही ताण येत नाही. टिलरमध्ये बॅलन्सिंगची अडचण असते. मात्र, आमच्या पॉवर टिलरमध्ये एसआयपीएफटीटीआय यांच्याद्वारे प्रमाणित बसण्याची व्यवस्था आहे. या यंत्राचे चार पेटंट घेतले असून, डिझाइनचे तीन रजिट्रेशन नावावर आहेत. या पॉवर टिलरला ऑल इंडिया मॅनेजमेंट असोशिएशन, सीआयआय, जपानमधील गुड डिझाइन अॅवाॅर्ड, तसेच गोल्डन पिकॉक अॅवाॅर्डही मिळालेले आहे.  

प्रश्न : भारतातील कृषी यांत्रिकीकरणाचा वेग कमी आहे, तो वाढवण्यासाठी काय करता येईल. उत्तर : भारतातील कृषी यांत्रिकीकरणाचा दर दीड ते दोन टक्के इतकाच आहे. अशीच स्थिती चीनमध्येही होती. मात्र, चीन शासनाने गेली पाच वर्षे ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले. यांत्रिकीकरणाचा वेग २-३ टक्क्यांपासून वाढून एकदम ४० टक्क्यांवर पोचला. आपल्याकडे असा प्रकार आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही. आपल्याकडे यंत्रे भाड्याने देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे प्रयत्न विविध कंपन्या आणि शासनाच्या पातळीवर होत आहेत. मात्र, त्यातही यंत्राच्या प्रचंड किमती, अल्पसंख्या यांची अडचण आहे. त्या तुलनेत यांत्रिकीकरणाचा वेग वाढवण्यासाठी छोटी आणि स्वस्त यंत्रे निर्मिती उपयुक्त ठरू शकेल. त्यातच छोट्या यंत्रासाठी मायक्रो फायनान्सिंगद्वारे पाठबळ दिल्यास वेग वाढेल.

प्रश्न : डिजिटल क्रांती आणि यांत्रिकी उद्योग यांचा समन्वय फारसे दिसत नाही. आपल्या उद्योगाचा याविषयीचा दृष्टिकोन कसा आहे. उत्तर : सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यंत्रामध्ये वाढवण्यावर नक्कीच काम करत आहोत. यंत्रामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित तीन प्रकारच्या सेवा असतील. त्यात सेन्सर आधारित देखभालीसंदर्भात सूचना, अचानक येणाऱ्या ब्रेकडाउनची सूचना जवळच्या सेवा केंद्रापर्यंत पोचवणे या सोबतच यंत्र व्यवस्थित चालवण्यासाठी प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे. वितरणामध्येही इंटरनेटआधारित ‘बफर पेनिट्रेशन सिस्टिम’ तयार केली आहे. पूर्ण भारतात किर्लोस्करचे ५५० डिस्ट्रिब्यूटर्स आणि २६ हजारपेक्षा अधिक रिटेलर्स  डिजिटली जोडलेली आहेत. यंत्र विकले गेले की त्याची नोंद विविध रंगाच्या एसकेयू नॉर्ममध्ये वितरण व्यवस्थेतील प्रत्येकाला कळते. कमी गुंतवणुकीमध्ये रोटेशन व परतावा जास्त मिळतो. पॉवर टिलरला काम मिळवून देण्यासाठी हायरिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

प्रश्न : सध्या बाजारात येत असलेले नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्टार्टअप याविषयीचे आपले धोरण सांगा. उत्तर : आम्ही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास करत आहोतच. सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी धोरणात्मक करारही करत आहोत. नुकताच तैवान कुबिक्स या कंपनीशी करार केला असून, ब्रश कटरची रेंज बाजारात आणली आहे. भारतीय स्टार्टअपसोबत व्यवसायातील संधी वाढवणे, अंतर्गत प्रक्रियांची सुधारणा आणि आमच्या वितरण प्रणालीद्वारे अन्य स्टार्टअप उत्पादनांचे वितरण अशा मुद्द्यावर काम सुरू आहे. नव्या संकल्पनाचा विकास करण्यासाठी डिझाइन स्टुडिओ तयार केला असून, त्यात संकल्पनाचे संगणकावर सिम्युलेशन करून चाचण्या घेतल्या जातात. नव्या कल्पनेवरील यंत्राचा प्रोटोटाइप करण्याचा खर्च यातून वाचू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com