पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्र

पेरूच्या सघन लागवडीमध्ये असे स्ट्रक्चर तयार करावे.त्यामुळे झाडांचा आकार मर्यादीत राहून उत्पादन वाढीला मदत होते.
पेरूच्या सघन लागवडीमध्ये असे स्ट्रक्चर तयार करावे.त्यामुळे झाडांचा आकार मर्यादीत राहून उत्पादन वाढीला मदत होते.

पेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. पारंपरिक शिफारशीपेक्षा या पद्धतीमध्ये फळझाडांची संख्या अधिक बसते. परिणामी, उत्पादनामध्ये वाढ मिळते. मात्र, या पद्धतीचा वापर करण्यासाठी झाडांची वेळोवेळी छाटणी करून आकार मर्यादीत ठेवावा. सघन लागवड (मिडो ऑर्चर्ड) म्हणजे काय? पारंपरिक शिफारशीप्रमाणे फळझाडातील अंतर हे झाडाची एकूण वाढ आणि त्याचा आकार लक्षात घेऊन केली जाते. मात्र, फळझाडांचा सुरवातीच्या काळामध्ये झाडांचा आकार तेवढा नसल्याने मध्ये मोकळी जागा राहते. या ऐवजी बुटक्या जातींच्या कलमांची एकरी अधिक प्रमाणात लागवड करण्यात येते. पुढे या झाडांच्या छाटणी व अन्य व्यवस्थापनातून आकार मर्यादित ठेवला जातो. या संपूर्ण तंत्रज्ञानाला सघन लागवड किंवा मिडो ऑर्चर्ड म्हणून ओळखले जाते.  

सघन लागवडीचे फायदे  :

  • पेरूसाठी ६ मीटर बाय ६ मीटर ही पारंपरिक शिफारस आहे. या पद्धतीने प्रतिहेक्टरी कमाल २७७ झाडे बसतात. मात्र, लखनौ येथील मध्यवर्ती समशितोष्ण फळबाग संस्थेमध्ये पेरू या फळांवर झालेल्या संशोधन व शिफारशीप्रमाणे हेच अंतर २ मीटर बाय २ मीटर ठेवता येते. या अंतरावरील लागवडीमध्ये हेक्टरी ५००० झाडे बसतात.
  • पारंपरिक पद्धतीमध्ये पेरू लागवडीनंतर झाडाची योग्य वाढ होऊन फळे मिळण्यासाठी किमान तीन वर्ष लागतात. मात्र, सघन लागवडीतून पहिल्या वर्षानंतरच फळे मिळण्यास सुरवात होते.
  • उत्पादन - पारंपरिक पद्धतीमध्ये हेक्टरी सरासरी केवळ १२ ते २० टन उत्पादन मिळते. त्या तुलनेमध्ये सघन लागवडीमध्ये अधिक (सरासरी हेक्टरी ४० ते ६० टन) उत्पादन मिळते.
  • पारंपरिक पद्धतीमध्ये पेरू झाडांचा आकार हा मोठा असल्याने त्याचे व्यवस्थापनही अवघड ठरते. मात्र, सघन पद्धतीमध्ये पर्णक्षेत्र हे मर्यादित ठेवले जात असल्याने व्यवस्थापनही सुलभ बनते.
  • बागेसाठीच्या एकूण मजुरांची संख्याही कमी लागते. काढणीही सुलभ असून, ती कमी मजुरामध्ये होते.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये उत्पादन खर्चही सघन बागेमध्ये कमी येतो.  
  • योग्य पर्ण विस्तारामुळे (कॅनोपी) फळबागेमध्ये व झाडांमध्ये हवा खेळती राहून सूर्यप्रकाशाची उपलब्धता होते. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला राहून उत्पादनामध्ये वाढ होते. पारंपरिक पद्धतीमध्ये झाडांचा आकार मोठा झाल्याने हवा खेळती राहत नाही. त्याचप्रमाणे एकमेकांची सावली एकमेकांवर पडल्याने उत्पादनामध्ये घट येते. त्याचप्रमाणे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढून फळांचा दर्जा कमी राहतो.
  • अशी करावी सघन लागवड :

  • साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जमीन १ ते २ वेळा खोलवर नांगरून, नंतर वखरण्या कराव्यात. बागेच्या लागवडीसाठी आयताकार आरेखन करावे. मोसमी पावसाच्या आगमनानुसार पाण्याची योग्य उपलब्धता झाल्यानंतर पेरू लागवड करावी. परंतु, हिवाळ्यामध्ये पेरू लागवड करणे टाळावे.
  • शेताची मशागत झाल्यानंतर ७५ बाय ७५ बाय ७५ सेंमी किंवा ५० बाय ५० बाय ५० सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत. आठवड्यानंतर प्रत्येक खड्डा निर्जंतुकीकरण करून घ्यावा. त्यासाठी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे तयार केलेले द्रावण प्रतिखड्डा पाच लिटर टाकावे. त्याचप्रमाणे क्लोरपायरिफॉस ५० मिलि. प्रतिखड्डा तळाशी व बाजूने टाकावे. खड्ड्यामध्ये १० ते १५ किलो सेंद्रिय खत व ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट टाकून सुपीक मातीत मिसळून घ्यावे. सघन लागवडीसाठी कलमांची लागवड ३ बाय १.५ मीटर किंवा ३ बाय ३ मीटर किंवा २ बाय १ मीटर अंतरावर करावी.
  • सघन फळबागेचे व्यवस्थापन :

  • लागवडीच्या पहिल्या वर्षीपासून पेरू बागेमध्ये छाटण्या व वळण देण्याकडे लक्ष द्यावे.
  • जमिनीपासून ३० ते ४५ सेंमी उंचीवर पेरूच्या मुख्य खोडावर एकही उपफांदी येऊ देऊ नये. त्यामुळे झाडाला बुटके स्वरूप प्राप्त होईल.
  • लागवडीनंतर १ ते २ महिने कालावधीनंतर सर्व पेरू झाडे ३० ते ४० सेमी उंचीवर कट करावीत. त्यामुळे नवीन शेंडे फुटतील, यास टॉपिंग असे म्हणतात. टॉपिंगनंतर मुख्य खोडावर बाह्य फांद्या येऊ देऊ नयेत.
  • टॉपिंगनंतर १५ ते २० दिवसांत मुख्य खोडापासून नवीन अंकुर फुटतील. त्यापैकी ३ ते ४ अंकुरच मुख्य खोडावर ठेवावते. हे अंकूर ३ ते ४ महिन्यांमध्ये परिपक्व बनतात.   
  • परिपक्व बनलेले शेंडे एकूण लांबीच्या ५० टक्के अंतरावर कापावेत. त्यापासून नवीन फुटवे फुटतील. अशाप्रकारे सघन पद्धतीच्या बागेमध्ये पर्णक्षेत्र विस्ताराचे नियोजन केले जाते.
  • नवीन शेंडे ३ ते ४ महिन्यापर्यंत वाढू द्यावेत. नंतर पुन्हा अर्ध्यावर शेंड्याची छाटणी करावी. या फुटलेल्या शेंड्यावर परिपक्वतेनंतर फुलधारणा होते.
  • पेरू फळबागेमध्ये फलधारणेसाठी उपाययोजना पेरू हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळपीक आहे. पेरूमध्ये नैसर्गिकरीत्या वर्षभर फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. सामान्यतः तीन बहार हंगाम असतात.

  • आंबे बहार - यात फुले जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊन जुलै ते सप्टेंबर या काळात फळे येतात.
  • मृग बहार - यात जुन जुलैमध्ये फुलधारणा होते, तर फळधारणा नोव्हेंबर जानेवारीमध्ये होते.
  • हस्त बहार - फुलधारणा ऑक्टोबरमध्ये होते, तर फळधारणा फेब्रुवारी एप्रिलमध्ये होते.
  • मात्र, पेरूमध्ये पावसाळी हंगामापेक्षा हिवाळी हंगामाला प्राधान्य दिले जाते. कारण पावसाळ्यातील फलधारणेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याचप्रमाणे फळांची चवही कमी असल्याची तक्रार असते. हस्त बहाराने पावसाळा हंगाम असल्याने ४५ ते ६० दिवस आधी बागेला नैसर्गिकरीत्या ताण देणे शक्य असते.

    हिवाळी हंगामातील फळधारणेसाठी : पेरूची फळधारणा व विकास हिवाळ्यामध्ये होण्यासाठी मृग बहार धरणे आवश्‍यक आहे. साधारणतः पावसाळ्यामध्ये फळधारणा न होता हिवाळ्यामध्ये फळधारणा करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांना बहार धरणे असे म्हणतात.

    बहार नियंत्रण : साधारणपणे मे महिन्यामध्ये जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४५ ते ६० दिवस ताण द्यावा. पाणी देण्याचे थांबवून बागेतील झाडांची पानगळ करावी. दरम्यान बाग कृत्रिमरीत्या सुप्तावस्थेमध्ये जाते. या वेळेमध्ये फळधारणेसाठी उपलब्ध असलेल्या फांद्यामध्ये पिष्टमय पदार्थांचा संचय होतो. नंतर फळबागेस जून महिन्यामध्ये शिफारशीनुसार खते व अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. त्यानंतर पाणी द्यावे.  या प्रकारे ताण मिळालेल्या बागामध्ये फुटव्यांची संख्या वाढते. सर्व बागेमध्ये एकाच वेळी फुलांची निर्मिती होते. परिणामी, त्याचे नियोजन योग्य प्रकारे करता येते.

    फुलोऱ्याचे नियंत्रण : पावसाळी वातावरणापेक्षा हिवाळ्यामध्ये फळधारणा होण्यासाठी फुलोऱ्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ते हातानेही करता येते. मात्र, मजुरांची कमतरता असल्यास रासायनिक पद्धतीचा अवलंब करावा.

    रासायनिक पद्धत : पावसाळ्यामध्ये फुलधारणा टाळण्यासाठी मे महिन्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने १५ टक्के युरीयाच्या (१५० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) दोन फवारण्या कराव्यात. त्याचप्रमाणे नॅप्थील अॅसेटिक अॅसीड (एन.ए.ए.) ५० ते १०० पीपीएम (५० ते १०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणे एक फवारणी करावी.

    संपर्क : डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२. (शास्त्रज्ञ उद्यानविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रह्मा, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com