स्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर वाढवण्याची गरज

स्थानिक पालेभाज्यांचा आहारातील वापर
स्थानिक पालेभाज्यांचा आहारातील वापर

आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक गुणधर्म असतानाही स्थानिक पालेभाज्यांचा आहारातील वापर कमी होत आहे. स्थानिक व रानभाज्यांविषयी जागरूकता वाढवण्याची व या भाज्यांचे लागवड तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज संशोधकांनी अधोरेखित केली आहे. आफ्रिकेमधील स्थानिक पालेभाज्यांची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये कमी होत आहे. हे अन्न गरिबांचे अन्न असल्याचा समज पसरत चालला होता. मात्र, या पालेभाज्यांची लागवड आणि प्रसार वाढवण्याच्या उद्देशाने संशोधक माईसेको आणि सहकाऱ्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी या भाज्यांसंदर्भात झालेल्या एकूण ४८० पैकी ७४ संशोधने ही जैवविविधता, पोषकता, उत्पादन प्रक्रिया आणि वापर या प्रमुख निकषांवर वेगळी केली आहेत. अर्थात, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि विपनन याविषयी अत्यंत कमी संशोधन संदर्भ उपलब्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थानिक पालेभाज्यांच्या सुमारे १०० प्रजाती आहेत. या सर्व वनस्पती आफ्रिकेतील उष्ण वातावरणामध्ये चांगल्या वाढत असल्या तरी त्यांची लागवड कमी आहे. या भाज्या प्रामुख्याने जंगलातून गोळा करून खाण्यासाठी वापरल्या जातात. आफ्रिकेतील कृषी, मत्स्य आणि वन्य विभागातर्फे जाहीर केलेल्या अहवालानुसार या पालेभाज्या दुष्काळ सहनशील, कीड रोगांना प्रतिकारक आहे. परदेशी भाज्यांच्या तुलनेमध्ये लागवड व निविष्ठांचा खर्च व आवश्यक पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या काही दशकांमध्ये प्रतिवर्ष पाण्याचे प्रमाण कमी होत असून, ते माणसी १००० घनमीटरपेक्षाही कमी झाले आहे. कॅल्शियम, लोह, अ आणि क जीवनसत्त्व, तंतूमय पदार्थ, प्रथिने यांचे प्रमाणही काही भाज्यांमध्ये परदेशी भाज्यांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि फिनॉलिक संयुगाचा चांगला स्रोत असून, आफ्रिकेतील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी या भाज्या फायदेशीर ठरणार आहेत. इतके फायदे असूनही वापर कमी का आहे? प्रामुख्याने या भाज्या जंगलातून गोळा करून वाळवल्यानंतर बाजारात आणल्या जातात.  ताज्या भाज्या पेंड्याच्या स्वरूपामध्ये विकल्या जातात. मात्र, त्यातील काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वानवा असल्याने नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.हाताळणीमुळे अस्वच्छता वाढत असून, साठवणीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक भाज्या पारंपरिकरीत्या आहारामध्ये असल्या तरी त्यातील पोषकतेविषयी जागृती अत्यंत कमी आहे. केवळ लोकप्रियता वाढवल्याने जंगलातील प्रजाती ओरबडून त्यांची विक्री होण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठी लागवड तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com