मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावांत वाढ

धान्यांचा वायदे बाजार
धान्यांचा वायदे बाजार

या सप्ताहात खरीप मका व हरभरा वगळता सर्वच शेतीमालांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहातसुद्धा ०.७ टक्क्यांनी घसरून त्या रु. १,३२४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३१८ वर आल्या आहेत. मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३५७ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. रब्बी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किंमत रु. १,१७४ आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनांवर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी कमी झाली आहे. रब्बी पिकाच्या अपेक्षेने किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

सोयाबीन सोयाबीनच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,०८६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,१०३ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,२५५ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) रु. ३,०५० आहे. खाद्य तेल उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेन्टिनामधील हवामान सुधारत आहे, त्यामुळे तेथील उत्पादन पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील भावसुद्धा कमी झालेले आहेत. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). त्यामुळे पुढील काही महिने किमतीत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती या सप्ताहातसुद्धा ५.६ टक्क्यांनी वाढून रु. ७,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,८२० वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,९७८). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे. गहू नोव्हेंबर महिन्यात गव्हाच्या (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. १,७०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७९० वर आल्या आहेत. मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,७३७). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहातसुद्धा ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,११६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती १ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१९३). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. हरभरा नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,०८२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२१४ वर आल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने एप्रिल २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,८३९). शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. ४,४०० आहे. हरभऱ्याची घसरण थांबवण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहात पुन्हा २.२ टक्यांनी वाढून रु. २०,२७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,६१० वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १९,६००). कपाशीचा एप्रिल २०१८ डिलिवरी भाव (एनसीडीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. १,०४६ आहे. प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठींवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठ).

साखर साखरेच्या (जानेवारी २०१८) किमती या सप्ताहात रु. ३,२७१वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ८.१ टक्क्यांनी घसरून त्या रु. ३,२५७ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२७० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन : २५० लाख टन). मात्र, गेल्या वर्षीचा साठा लक्षात घेता, या वर्षी पुरेसा पुरवठा होईल व साखरेचे भाव स्थिर राहतील. त्यामुळे शासनाची साठ्यावरील व विक्रीवरील बंधने आता काढून टाकण्यात आली आहेत. संपर्क : arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com