सूत्रकृमींना रोखणारे विद्युत चुंबकीय लहरींवर आधारित तंत्रज्ञान

मुळावर गाठी करणाऱ्या सुत्रकृमींचा वापर विविध पिकांवर होतो.
मुळावर गाठी करणाऱ्या सुत्रकृमींचा वापर विविध पिकांवर होतो.

सूत्रकृमींचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. प्रादुर्भाव मुळावर होत असल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात येईल तो वेळ निघून गेलेली असते. रसायनाच्या वापरावरही अनेक बंधने असल्याने शेतकऱ्यांसमोरील पर्यायही कमी होत आहेत. अशा स्थितीमध्ये विद्युत चुंबकीय लहरींची प्रक्रिया केलेल्या पाण्यांचा सिंचनासाठी वापर केल्यास सूत्रकृमीना रोखणे शक्य असल्याचे विविध संशोधनातून पुढे आले आहे. सूत्रकृमींचा आढळ हा शेतीबरोबरच पर्वत, दऱ्या, नद्या, तलाव, समुद्र असा सर्वदूर आढळतो. त्यांच्या अनेक प्रजाती असून, वनस्पतींवर वाढणारे सूत्रकृमी हे मुख्यतः ओलाव्याच्या ठिकाणी आढळतात. एक ग्रॅम मातीमध्ये एक हजारापेक्षा अधिक परजिवी सूत्रकृमी आढळतात. ते जसे त्रासदायक आहेत, तसेच त्यांचे काही फायदे आहेत. ते तणांच्या मुळांवरही वाढत असल्याने तणांच्या उगवणीआधीच नियंत्रणासाठी व किडींच्या नियंत्रणासाठी त्यातील काही प्रजातींचा वापर करणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. असे असले तरी सूत्रकृमी हे कृषी क्षेत्रासाठी त्रासदायक म्हणूनच ओळखले जाते.   

  • वनस्पतीच्या मुळांवर वाढताना त्यातून पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण करतात. परिणामी, वनस्पतींला पाण्याची आणि अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्याची वाढ खुंटते. यामुळे दरवर्षी जागतिक पातळीवर १२.३ टक्के ( १५७ अब्ज डॉलर) इतके नुकसान होते.
  • सध्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ऑर्गनोफॉस्फेटस, कार्बामेट्स आणि जैविक निमॅटीसाईड्स या तीन वर्गातील रसायनांचा वापर केला जातो. मात्र, रसायनामुळे माती आणि पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रसायनांचा वापर टाळण्याकडे कल आहे. काही सूत्रकृमीनाशकांवर बंदीही आली आहे. अशा स्थितीमध्ये सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी पर्याय शिल्लक राहतात.
  • विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटीक) विषयातील तज्ज्ञ रेमंड लेस्क्राऊवायेट यांनी सांगितले, की वनस्पती जमिनीच्या वरील भागाद्वारे विविध विद्युत चुंबकीय प्रभावाचे निर्माण आणि वापर करतात. त्याद्वारे मधमाश्यांना आकर्षित केले जाते किंवा अनावश्यक किडींना टाळले जाते. जमिनीअंतर्गत भागामध्ये म्हणजेच मुळाद्वारे याच तत्त्वाचा वापर सूत्रकृमींना दूर ठेवण्यासाठी करणे शक्य आहे.
  • या तत्त्वाला केमोटॅक्सीज म्हणतात. त्याबाबत २०११ मध्ये ए. एम. रेनॉल्डस यांनी संशोधकांचे लक्ष वेधले होते. सामान्यतः वनस्पतींच्या मुळाद्वारे विद्राव्य आणि वायूरूपी काही घटक मुळांना अन्नद्रव्यांचे शोषण करण्यासाठी मदत करणाऱ्या मायकोरायझासारख्या घटकांना आकर्षित करण्यासाठी सोडले जातात. त्यामुळेच मोठ्या संख्येने सूत्रकृमीही आकर्षित होतात. या संदेशामध्ये बदल करणे शक्य झाल्यास सूत्रकृमी रोखले जातील.
  • अॅक्वा ४ डी :

  • हे पेटंटेड स्विस तंत्रज्ञान आहे. त्यात विद्युत चुंबकीय कमी वारंवारितेच्या लहरींचा वापर सिंचनापूर्वी पाण्यावर केला जातो. त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत संरचनेवर परिणाम होतो. त्यातून त्यातील क्षार अधिक विद्राव्य होतात. मातीवरील क्षारांचा परिणाम कमी होण्यास मदत होते.
  • त्याच वेळी २००४ मध्ये हॅम्बर्ग (जर्मनी) येथील संशोधक डॉ. गोथार्ज स्टिईलॉ यांनी केलेल्या अभ्यासामध्ये लहरींची प्रक्रिया केलेल्या पाण्यामध्ये सूत्रकृमी दिशाहिन होत असल्याचे आढळले. तसेच त्यांच्यावर ताण अधिक असल्याने मुळांच्या कक्षेमध्ये अंडीही कमी घालत असल्याचे दिसून आले. परिणामी केशमुळे अधिक चांगल्याप्रकारे वाढतात. अन्नद्रव्यांच्या शोषणही चांगले होते.
  • २०१० मध्ये स्वित्झर्लंड येथील नॅशनल कॉम्पेटन्स सेंटर फॉक नेमॅटोलॉजी येथील डॉ. सेबास्टियन किवनिक यांनी हरितगृहातील पिकांमध्ये  मुळावर गाठी करणाऱ्या सुत्रकृमी (शा. नाव - Meloidogyne enterolobii) वर प्रयोग केले. त्यात अॅक्वा ४ डी या तंत्राचा वापर केल्याने सूत्रकृमींचे चांगल्याप्रकारे नियंत्रण होत असल्याचे आढळले. एकूण अंडी घालण्याचे प्रमाण ही साध्या पाण्याने सिंचित केलेल्या पिकापेक्षा कमी असल्याचे आढळले.
  • २०१२ मध्ये ट्युनिशिया येथील प्रो. नाजेत रोआनी हॉर्रीग आणि सहकाऱ्यांनी विद्युत चुंबकीय प्रक्रिया केलेल्या पाण्याचे सूत्रकृमीसंदर्भात कलिंगडामध्ये प्रयोग केले. त्यात मुळांवरील गाठींचा निर्देशांक अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. उत्पादनामध्ये ४२ टक्क्यांने वाढ झाली. हे तंत्रज्ञान त्या भागामध्ये लोकप्रिय असलेल्या सूत्रकृमीनाशकापेक्षा परिणामकारक असल्याचा निष्कर्ष नोंदवला.
  • २०१६ मध्ये सावो पावलो राज्य विद्यापीठातील प्रो. डॉ. पेड्रो सोअर्स यांनी सोयाबीन पिकामध्ये या पाण्याचे प्रयोग केले. त्यात सोयाबीनवर प्रामुख्याने प्रादुर्भाव करणाऱ्या Pratylenchus brachyurus या प्रजातीचे नियंत्रण होते, तर Meloidogyne javanica अंड्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.
  • रसायनाच्या वापराने माती,पाणी आणि एकूणच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. रसायनांद्वारे सूत्रकृमींचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य नसल्याचे तज्ज्ञ आणि सूत्रकृमी तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीमध्ये अॅक्वा ४ डी तंत्रज्ञानामुळे सूत्रकृमींना पिकापासून दूर ठेवणे शक्य होऊ शकते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com