कांदा-लसूण पीक सल्ला

कांदा लागवडीसाठी ठिबकसिंचनाचा वापर करताना एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल सोडाव्यात तसेच लागवडीसाठी योग्य वयाच्या रोपांची निवड करावी.
कांदा लागवडीसाठी ठिबकसिंचनाचा वापर करताना एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल सोडाव्यात तसेच लागवडीसाठी योग्य वयाच्या रोपांची निवड करावी.

सद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती करावी. रोपे लागवडीस तयार असल्यास पूर्वमशागत करून शेत लागवडीसाठी तयार करून ठेवावे. काढणी झालेल्या कांदा, लसणाच्या योग्य साठवणुकीसाठी तयारी करून ठेवावी. काढणी झालेल्या पिकाकरिता  

  • जोड कांदे , डेंगळे कांदे आणि चिंगळी कांदे वेगळे काढून टाकावेत. कांदे साठवणुकीपुर्वी सावलीत १० ते १२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, आणि पाला वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे कांदा जास्त काळ टिकतो.
  • तळाशी व बाजूला हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहामध्ये कांदे साठवावेत.
  • लसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावेत.
  • साठवणीतील कांदा, लसणावर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे काढून टाकावेत.  
  • खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी

  • एक हेक्टर लागवडीसाठी साधारणपणे ०.०५ हेक्टर जागेत रोपवाटिका (५ ते ७ किलो बियाणे) करावी.  
  • मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफेनिर्मितीपूर्वी आधीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तणे व दगड काढून टाकावेत.
  • अर्धा टन शेणखत घालावे. गादीवाफे १० - १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद , सोईनुसार लांब ठेवावेत.
  • तणनियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
  • मातीतून पसरणाऱ्या रोगनियंत्रणासाठी (मूळकूज) पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम १-२ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी. मररोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रतिहेक्टर प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.
  • पेरणीपूर्वी नत्र ४ किलो, स्फुरद १ किलो व पालाश १ किलो प्रति ५०० वर्गमीटर या प्रमाणात खते द्यावीत.
  • बियाणे लागवड ओळीत ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकून थोडे पाणी द्यावे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • खरीप कांद्याकरिता पूर्वमशागत

  • नांगरणी, कुळवणी करुन जमीन भुसभुशीत करावी.
  • वाफेनिर्मितीपुर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडीखत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.
  • गादी वाफे १५ सें.मी. उंच, १२० सें.मी. रुंद असे ठेवावेत. दोन वाफ्यांत ४५ सें.मी इतके अंतर ठेवावे. यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल व काळा करपा रोगापासून रोपांचे संरक्षण होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक व तुषार सिंचनासाठी सोईची होते.
  • ठिबकसिंचनासाठी प्रत्येक गादी वाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या २ लॅटरलचा (क्षमता ४ लिटर प्रतितास) वापर करावा. दोन ड्रिपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.
  • खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड

  • पुनर्लागवडीसाठी खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. दोन ओळींत १५ सें.मी. व दोन रोपांत १० सें.मी. अंतर ठेवावे. ३५ ते ४० दिवसांच्या रोपांची निवड करावी.
  • रोपवाटिकेतून रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपुर्वी कापून टाकावा. बुरशीजन्य रोगांचा व फुलकीड्यांचा नियंत्रणासाठी १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मि.लि. कार्बोसल्फान प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण करुन रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.
  • हेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश द्यावे. जमिनीत  २५ किलोपेक्षा जास्त गंधक असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे. हेक्टरी २५ किलोपेक्षा कमी गंधक असल्यास अशा जमिनीत हेक्टरी ३० किलो गंधक द्यावे.
  • पुनर्लागवडीपुर्वी  ४० किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र २ समान हफ्त्यात पुनर्लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी द्यावे. अझोस्पिरीलम आणि पी.एस.बी. या जैविक खतमात्रा प्रत्येकी ५ किलो प्रतिहेक्टर अशा  द्याव्यात. यामुळे नत्र व स्फुरद उपलब्धता वाढते.
  • पुनर्लागवडीपूर्वी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५ टक्के इ.सी.) १.५ ते २ मि.लि. प्रतिलिटर किंवा पेंडीमिथॅलिन (३० टक्के इ.सी.) ३ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात तणनाशक जमिनीवर फवारावे.  
  • पुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलकीडे, पानांवरील रोग (करपा) यांच्या नियंत्रणासाठी मिथोमिल ०.८ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
  • संपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६   (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com