नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
फूल शेती
जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते. देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात दर्जेदार गुलाब फुलांना मागणी वाढत आहे. त्यासाठी हरितगृहातील गुलाब फुलशेती फायदेशीर ठरणार आहे. हरितगृहातील गुलाबशेतीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.
व्हॅलेंटाइन डे, ख्रिसमस आदी सण तसेच लग्नसमारंभ यांचा विचार करून सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बाजारात फुले विक्रीस येतील यादृष्टीने गुलाबाची लागवड करावी. कमीत कमी १० ते २० गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशीर ठरते.
जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते. देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात दर्जेदार गुलाब फुलांना मागणी वाढत आहे. त्यासाठी हरितगृहातील गुलाब फुलशेती फायदेशीर ठरणार आहे. हरितगृहातील गुलाबशेतीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.
व्हॅलेंटाइन डे, ख्रिसमस आदी सण तसेच लग्नसमारंभ यांचा विचार करून सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बाजारात फुले विक्रीस येतील यादृष्टीने गुलाबाची लागवड करावी. कमीत कमी १० ते २० गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशीर ठरते.
लागवड तंत्रज्ञान
हवामान : फुलांचा रंग, पाकळ्याची संख्या, फुलदांड्याची लांबी याबाबी तापमानावर अवलंबून असतात. योग्य वाढीसाठी कमाल तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस इतके असावे. सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के असावी. कमी आर्द्रतेमुळे लाल कोळी किडीचा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जास्त आर्द्रता व कमी तापमानात बोट्रायटीस व डाउनी मिल्ड्यू या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. प्रकाशमान ४००० ते ६००० लक्सदरम्यान असावे. कर्बवायूची पातळी १००० ते ३००० पीपीएम असावी.
लागवडीची वेळ : निर्यातीसाठी गुलाबाची उपलब्धता सप्टेंबरपासून असावी लागते यासाठी मे-जून महिन्यामध्ये लागवड करावी.
जमीन व्यवस्थापन :
- गादीवाफे बनविण्याआधी सर्व मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. त्याकरिता १०० चौ.मी. भागासाठी ७.५ ते १० लिटर फॉर्मेलिन प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून ते १० x १० मीटर क्षेत्रावर झारीच्या साह्याने शिंपडावे. त्यानंतर काळ्या प्लॅस्टिक पेपरने माती सात दिवस हवाबंद अवस्थेत झाकून ठेवावी. त्यानंतर प्रतिचौरस मीटर क्षेत्रासाठी १०० लिटर चांगले पाणी वापरून जमीन फ्लश करून घ्यावी. त्यामुळे जमिनीतील आम्लयुक्त पाण्याचा निचरा होऊन जमीन आम्लविरहित होते. वाफसा आल्यानंतर अपेक्षित मापांप्रमाणे गादी वाफे तयार करून त्यावर रोपांची लागवड करावी.
- हरितगृहाच्या लांबीप्रमाणे योग्य लांबीचे १ ते १.६ मीटर रुंद व ३० सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. दोन वाफ्यात ५० ते ६० सें.मी. अंतर राखावे.
- जमीन खडकाळ, मुरमाड किंवा लागवडयोग्य नसल्यास मातीविना माध्यम कोकोपीटचा वापर करावा
- कोकोपीटचा वापर केल्यास स्टॅन्ड कुंड्या सिंचन यंत्रणेसाठी अंदाजे ३० टक्के जादा खर्च येतो. परंतु कोकोपीटमधील बुरशीजन्य रोगांचा मुळांना होणारा प्रादुर्भाव टाळता येतो.
- कोकोपीटमधील गुलाब लागवडीसाठी ३० सें.मी. व्यासाची कुंडी वापरावी. कुंडीचे आकारमान तिच्यात २० लिटर पाणी मावण्याइतके असावे. पाच गुंठ्यांसाठी ३२०० कुंड्या व दोन रोपे प्रतिकुंडी याप्रमाणे लागवड करावी.
- रोझा इंडिका, रोझा मल्टिप्लोरा, नेटल ब्रॉयर या तिन्हीपैकी एका खुंटावर डोळे भरलेली, पॉलिबॅगमध्ये वाढविलेली ६ ते ८ महिने वयाची कलमे वापरावीत.
- साधारणतः ४५x२० सें.मी अंतरावर लागवड करावी. दोन ओळीत ३० ते ४५ सें.मी. व दोन रोपात १५ ते २० सें.मी. अंतर राखावे. प्रतिचौरस मीटर क्षेत्रावर ६ ते ९ रोपे लावावीत.
पाणी व्यवस्थापन :
पाण्याचा सामू ६.५ ते ७ दरम्यान असावा. तो जास्त असल्यास योग्य प्रमाणात नायट्रिक अॅसिडचा वापर करावा. पाणी ६०० ते ७५० मि.लि./ चौ.मी./ दिवस या प्रमाणात द्यावे.
आंतरमशागत :
फांद्या वाकविणे (बेंडिंग) : फांद्या जमिनीलगत ४५ अंश कोनात वाकविणे आवश्यक असते. पानातील अन्नद्रव्ये जोमाने वाढणाऱ्या फांद्यांकडे पाठविणे हा त्यामागील उद्देश असतो.
कळ्या खुडणे (डिंसबडिंग) : पानांच्या बेचक्यातून वाढणाऱ्या कळ्या खुडल्यामुळे फुलदांड्याची व फुलांची गुणवत्ता सुधारते.
शेंडा खुडणे (टॉपिंग) : फांद्या सरळ व जोमाने वाढविणे हा उद्देश ठेवून फांदीवरील मुख्य कळी शेंड्यासह काढणे याला टॉपिंग म्हणतात. उन्हाळ्यात कमकुवत फांद्याचे टॉपिंग करावे.
जाती
अ) परदेशी बाजारपेठेसाठी : हायब्रीड टी प्रकार - फर्स्ट रेड, पॅशन, अप्पर क्लास, बोर्डो (लाल), टॉपलोस, नोबलेस, व्हिवाल्डी (गुलाबी) पॅरिओ, पाॅइझन, टेक्सास, गोल्ड, स्ट्राइक (पिवळा) टिनीके ऍव्हेलांची, स्कायलाइन (फिकट हिरवा - पिवळा) फ्लोरिबंडा प्रकार - गोल्डन गेट (पिवळा), एस्किमो (पांढरा).
ब) देशांतर्गत बाजारपेठेसाठी : डबल डिलाइट, सुपर स्टार, फेअरी पोर्च, ओक्लाहोमा, लॅडोरा.
खत व्यवस्थापन
- प्रतिचौरस मीटर क्षेत्रासाठी शेणखत १० किलो या प्रमाणात वापरावे. लागवडीनंतर ३ आठवड्यांनी नत्र ३० ग्रॅम, स्फुरद ३० ग्रॅम व पालाश २० ग्रॅम या प्रमाणात विद्राव्य खतातून ठिबकसंचातून सोडावे. एक महिन्यानंतर पुढील ४ महिने पुढीलप्रमाणे विद्राव्य खते द्यावीत.
- एकात्मिक खत व्यवस्थापन : लागवडीनंतर दरवर्षी प्रतिचौरस मीटर क्षेत्रासाठी शेणखत २ किलो अधिक निंबोळी पेंड २०० ग्रॅम याप्रमाणात द्यावे. तसेच गांडूळ खत ५०० ग्रॅम/ चौ.मी. या प्रमाणात वर्षातून दोन वेळा द्यावे. त्याशिवाय जैविक खते - अॅझोस्पिरिलियम अधिक पी.एस.बी. प्रत्येकी २ ग्रॅम/ झाड याप्रमाणात दर दोन महिन्यांनी द्यावे. गांडूळखत ५०० ग्रॅम/ चौ.मी. क्षेत्रास वर्षातून दोन वेळा द्यावे.
महिना | नत्र (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) | स्फुरद (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) | पालाश (मिलिग्रॅम प्रतिझाड प्रतिआठवडा) |
पहिला | १०० | १०० | १०० |
दुसरा | २०० | २०० | २०० |
तिसरा | ३०० | २०० | २०० |
चौथा | ४०० | ३०० | ३०० |
संपर्क : डॉ. राजेंद्र हासुरे, ९४२१९८३४०३
(आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, महात्मा फुले
कृषी विद्यापीठ, राहुरी.)
- 1 of 2
- ››