क्षारयुक्त जमिनीच्या शास्त्रीय सुधारणेमुळे पीक उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ

क्षारयुक्त जमिनीच्या शास्त्रीय सुधारणेमुळे पीक उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ
क्षारयुक्त जमिनीच्या शास्त्रीय सुधारणेमुळे पीक उत्पादनात १० ते ५० टक्के वाढ

जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन त्या खराब होण्याचे प्रमाण जगभरामध्ये सर्वत्र वाढत आहे. त्याचा मोठा फटका दुष्काळी आणि अर्ध दुष्काळी प्रदेशातील कृषी उत्पादकतेला बसणार आहे. भारतामध्येही सुमारे ६.७३ दशलक्ष हेक्टर जमिनी क्षारपड असून, देशाच्या एकूण जमिनीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण २.१ टक्के होते. त्यातील २.८ दशलक्ष हेक्टर जमिनीमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक आहे. अशा जमिनी प्रामुख्याने गंगेच्या खोऱ्यातील पट्ट्यात आढळतात. भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून, या पट्ट्यातही आपल्या छोट्याशा शेतामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागतो.

उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातील संताराहा हे गाव समुद्रसपाटीपासून १३९ मीटर उंचीवर आहे. येथील जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण अधिक असून, पिकांची उत्पादकता अत्यंत कमी आहे. प्रतिकुटुंब जमीनधारणा ही ०.६२ हेक्टर इतकी अल्प असून, येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक गटामध्ये मोडतात. त्यातील ६८ टक्के कुटुंबे ही उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत. या गावाची निवड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल येथील केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेने जमीन सुधारणेच्या प्रकल्पासाठी केली. सातत्यपूर्ण आणि शास्त्रीय उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यक असलेला  गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग त्यांच्याशी चर्चा करून मिळवण्यात आला. येथील कुटुंबाचे व जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०११ मध्ये जमिनीच्या सुधारणा कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यासाठी संपूर्ण शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यात जिप्सम, प्रेसमड घटकांचा वापर करण्यासोबतच सोडियम सहनशील पीक जातींची लागवड यांचा समावेश असतो.

  • शेतजमिनीमध्ये बांध बंदिस्ती, पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था, सिंचनासाठी कालवे, सपाटीकरण आणि निचऱ्यासाठी जोडबांधकाम या कामांना प्राधान्य देण्यात आले. या कामामध्ये शेतकऱ्यांनी श्रमदानासह सक्रिय सहभाग नोंदवला.
  • जमीन मालकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक प्लॉटवरील मातीचे नमुने काढून घेतले. त्यांचे विश्लेषण प्रयोगशाळेतून करून घेतले. त्यातील मातीचा सामू ८५. ते १०.१ च्या दरम्यान असल्याचे आढळले. त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार प्रतिहेक्टरी ८.२ ते १४.८ एमजी जिप्सम आवश्यक होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या जिप्सम आवश्यकतेच्या २५ टक्के जिप्सम शेतकऱ्यांना पुरवण्यात आले. कृषी प्रतीच्या जिप्सममध्ये सल्फर(१६.१%), कॅल्शिअम (१८.३%), मॅग्नेशिअम (०.०४%), आणि सोडियम (०.१८%) ही मूलद्रव्ये असतात. याप्रतिचे जिप्सम जून २०१२ मध्ये शेतीतील मातीच्या वरील ० ते १५ सेंमी थरामध्ये चांगल्या पद्धतीने मिसळण्यात आले.
  • क्षारांचा निचरा आणि पुढील पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता करण्यासाठी दर चार हेक्टर क्षेत्रामागे एका विंधनविहिरीची सोय केली. ज्या ठिकाणी त्या उपलब्ध नव्हत्या, तिथे त्या नव्याने पाडण्यात आल्या.  
  • जिप्सम मिसळल्यानंतर त्या जमिनीमध्ये १० सेंमी खोलीपर्यंत पाणी देण्यात आले. ही प्रक्रिया सुमारे १० दिवसांपर्यंत केली. त्यामुळे कॅल्शिअम आणि सोडियम मूलद्रव्यांची प्रक्रिया होऊन पाण्यासोबत या क्षारांचा मुळांच्या कक्षेबाहेर निचरा करण्यात आला.
  • क्षार निचऱ्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे पार पडल्यानंतर परिसरातील साखर कारखान्याकडून प्रेसमड मिळवण्यात आले. त्यातील मूलद्रव्यांचे प्रमाण सल्फर(०.२३%), कॅल्शिअम (११%), मॅग्नेशिअम (१.६५%), एकूण कर्ब (२६%), नत्र (१.३३%), स्फुरद (१.०८%) आणि पालाश (०.५३%) असे होते.  हे प्रेसमड जमिनीमध्ये प्रति हेक्टरी १० टन या प्रमाणात मिसळण्यात आले. ते मातीच्या वरील थरामध्ये चांगले मिसळून घेतले.
  • या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चातील मोठा भाग शेतकऱ्यांनी उचलला.
  • केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्थेच्या लखनौ येथील प्रादेशिक संशोधन केंद्राच्या  वतीने भाताच्या क्षार सहनशील प्रजाती सीएसआर ३६ चे बियाणे शेतकऱ्यांना पुरवण्यात आले. त्याची रोपे बनवण्यात आली. साधारणतः एक महिने वयाची रोपांची जुलै महिन्यामध्ये पुनर्लागवड करण्यात आली.
  • साधारणतः तीन वर्षांमध्ये सुधारणा कार्यक्रम व्यवस्थित राबवल्यानंतर एकेकाळी पडीक असलेल्या या जमिनी लागवडीखाली आल्या.
  • निष्कर्ष

  • अल्प व मध्यम सोडिअम क्षार असणाऱ्या जमिनीतून भातांचे उत्पादन अनुक्रमे ३९.४३ टक्के व ७४.९५ टक्के कमी येत असे, तर सोडिअम क्षारांचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये पिकाचे उत्पादनही मिळू शकत नव्हते. अशा जमिनींची सुधारणा केल्यानंतर उत्पादनातील घट कमी करण्यात यश आले.
  • सुधारणेनंतर गव्हाच्या उत्पादनामध्ये अल्प आणि मध्यम सोडिअम क्षार असलेल्या जमिनीमध्ये २२.७४ टक्के आणि ६१.०९ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. संपूर्ण जमीन सुधारणेनंतर पूर्वी अल्प, मध्यम, अधिक आणि तीव्र सोडिअम क्षार असणाऱ्या मातीमध्ये सामान्य जमिनीच्या तुलनेमध्ये १०.८७, २१.८४, ३४.२१ आणि ५०.९२% उत्पादनामध्ये वाढ झाली.
  • जमिनीच्या सुधारणेपूर्वी आणि नंतर मिळालेले भात आणि गहू पिकाचे सरासरी उत्पादन (टन प्रतिहेक्टर)

    वर्ष   मातीतील सोडिअमचे प्रमाण (क्लास) - - - -
    -     सामान्य     अल्प सोडिअम    मध्यम सोडिअम      अधिक सोडिअम     तीव्र सोडिअम
    भात (जमीन सुधारणापूर्व) - - - - -
    २००९-२०१०    ४.८१    २.९२    १.२१    ०     ०
    २०११-२०१२    ४.८६    २.९५    १.२०    ०    ०
    २०११-२०१२    ४.८६    २.९५    १.२०    ०   ०
    सरासरी     ४.८७    २.९५    १.२२    ०    ०
    उत्पादन घट (टक्के)  - ३९.४३ ७४.९५ १०० १००
    भात (जमीन सुधारणेनंतर) - - - - -
    २०११-२०१२    ५.१०    ४.८३    ४.३८    ३.८७    २.७९
    २०१२-२०१३    ५.२३    ५.१२    ४.७३    ४.५४    ३.१०
    २०१३-२०१४    ५.३२    ५.०४    ४.८६    ४.८६    ३.२३
    सरासरी    ५.२१    ४.९९    ४.६५    ४.४२    ३.०४
    उत्पादन घट (टक्के)        - ४.३५    १०.७४    १५.१६    ४१.६५
    गहू (जमीन सुधारणापूर्व) - - - - -
    २००९-२०१०    ३.५७    २.७६    १.२३    ०   
    २०१०-२०११    ३.७०    २.८५    १.४१    ०    ०   
    २०११-२०१२    ३.६७    २.८४    १.६२    ०   
    सरासरी    ३.६५    २.८२    १.४२    ०   
    उत्पादन घट (टक्के)        - २२.७४    ६१.०९    १००    १००
    गहू (जमीन सुधारणेनंतर)- - - - - -
    २०११-२०१२    ३.६७    ३.१३    २.७६    २.१०    १.६३
    २०१२-२०१३    ३.८१    ३.४३    ३.०२    २.६३    १.८२
    २०१३-२०१४    ३.८४    ३.५३    ३.१२    २.७२    २.१०
    सरासरी    ३.७७    ३.३६    २.९६    २.४८    १.८५
    उत्पादन घट (टक्के)       -  १०.८७    २१.४८    ३४.२१    ५०.९२

    जमीन सुधारणेच्या पहिल्या वर्षी केवळ अल्प सोडिअम असलेल्या जमिनीमध्ये चांगले परिणाम दिसते. सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये निव्वळ उत्पन्न अद्यापही ऋण होते. कारण, जमीन सुधारणेसाठी झालेला खर्च २०११-१२ या आर्थिक वर्षात धरण्यात आला.   २०१२-१३ मध्ये उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले. २०१३-१४ मध्ये निव्वळ उत्पन्नामध्ये वाढ नोंदविण्यात आली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com