मसाला पीक सल्ला

नारळ बागेतील दालचिनीचे आंतरपीक.
नारळ बागेतील दालचिनीचे आंतरपीक.

कोकण किनारपट्टीवरील नारळ, सुपारीच्या बागेमध्ये जायफळ, दालचिनी, काळी मिरी व लवंग या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. या पिकांची लागवड प्रामुख्याने आंतरपीक म्हणून होत आहे. या पिकांची सद्यस्थितीत काळजी घेणे आवश्‍यक आहे.

जायफळ       

  • सद्यस्थितीत पावसाळा संपला आहे. सकाळी थंडी व दुपारी उष्णता असे वातावरण आहे. या दोन्हीही परिस्थितीत जमिनीतील ओलावा कमी होण्यास प्रारंभ होतो. अशावेळी नवीन लागवड केलेल्या रोपांना/कलमांना सावली करावी. सावली करताना कलमे/रोपांच्या उंचीपेक्षा १ फूट उंचीवर चारी बाजूने सावली पडेल अशा पद्धतीने शेडनेटचा किंवा नारळ झापांचा उपयोग करावा.
  • जायफळाचे झाड पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे नवीन लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीद्वारे प्रतिझाड ५ लिटर पाणी ३-४ दिवसांच्या अंतराने द्यावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना प्रतिझाड ३ लिटर पाणी द्यावे.
  • जायफळाच्या बागेत जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी बुंध्याभोवती २-३ इंच जाडीचे गवत व पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. आच्छादनामुळे झाडाला दिलेले पाणी बाष्पीभवनामुळे वाया जाण्याच्या प्रकारांनाही अटकाव होतो.
  • जायफळाच्या झाडाला लागवडीनंतर त्वरित आधार देणे गरजेचे असते. त्यामुळे नवीन लागवड केलेल्या सर्व झाडांना काठीने आधार द्यावा.
  • जायफळाच्या कलमाला आधार व आकार देण्याची आवश्‍यकता असते. नारळ आणि सुपारीच्या बागेत लावलेले झाड उंच वाढविण्यासाठी त्याच्या मधल्या फांदीला वरच्या दिशेने वाढविणे गरजेचे असते. त्याचबरोबर बुंध्याकडील फांद्या अर्ध्यावर छाटाव्या लागतात. असे केल्यास सुधारित जातीची कलमे उंच वाढतात आणि अपेक्षित उत्पन्न देतात. म्हणूनच या झाडांना लहानपणापासून आकार द्यावा लागतो.
  • जायफळाच्या कलमांच्या बुंध्याजवळ कलमांच्या जोडाखाली येणारे फुटवे तसेच राहिल्यास कलमाची वाढ खुंटते. ते ओळखण्याची पद्धत म्हणजे कलमांच्या जोडाखालील सरळ जोमदार वाढलेले फुटवे दिसल्यास ते कलमाच्या रोपापासून आलेले आहेत असे समजावेत व ते त्वरित काढून टाकावेत.
  • जायफळाच्या मोठ्या कलमांच्या जमिनीकडे वाढणाऱ्या फांद्या फुटत राहतात. काही वेळेस त्या जमिनीवर लोळतात. अशा फांद्या छाटून टाकाव्यात व त्यावर त्वरित बोर्डोपेस्ट (१० टक्‍के) लावावी.
  • दालचिनी          

  • नारळ व सुपारीमध्ये दालचिनीची आंतरपीक म्हणून लागवड असल्यास पहिली २ ते ३ वर्षे जलद वाढीसाठी आधाराची आवश्‍यकता असते. त्यामुळे दालचिनीच्या झाडाला आधार द्यावा.
  • पावसाळ्यानंतर झाडाची मुळे, खोड आणि साल यामधील पाणी आटण्याची क्रिया जलद गतीने सुरू असते. असा कालावधी साल काढण्यास योग्य असतो. पाऊस कमी झाल्यावर लगेचच चाचणी काप घेऊन दालचिनी साल काढण्यासाठी झाडाची तोडणी करावी. साल खोडापासून वेगळी करून सावलीत वाळवावी. झाडांच्या पानांचा तमालपत्र म्हणून वापर करतात. अशी पाने स्वच्छ, धुळविरहीत जागेत सावलीत वाळवावीत.
  • तोडलेल्या झाडांना त्वरित पाणी देणे आवश्‍यक असते, अन्यथा ती वाळून मरण्याची भीती असते.
  • नवीन लागवड केलेल्या झाडांना पावसाळ्यानंतर पाणी देणे, आच्छादन करणे ही कामे करावीत. अशी काळजी घेतल्यास तिसऱ्या वर्षी झाड तोडणीस तयार होते. अशा झाडांपासून पाचव्या वर्षीपासून सतत उत्पन्न मिळते.
  • काळी मिरी      

  • काळी मिरी हे वेलवर्गीय मसाले पीक आहे. हे पीक विविध झाडांचा (नारळ/सुपारी/भेंड/सिल्व्हर ओक/गिरीपुष्प) आधार घेऊन वाढते. त्यामुळे आधारासाठी वापरलेल्या झाडांना जादा फुटवे येऊन काळी मिरीच्या वेलांवर येणाऱ्या काळी मिरी घडांचे प्रमाण घटते. तसेच घडावर येणाऱ्या काळी मिरीचे प्रमाणही घटते. या गोष्टी टाळण्यासाठी आधार दिलेल्या झाडाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या वेळीच तोडून घ्याव्यात.
  • ज्या काळी मिरीच्या वेलांना नवीन पांढरी मुळे फुटलेली आहेत असे वेल आधार दिलेल्या झाडाच्या खोडाच्या दिशेने चिकटवून ठेवून सैलसर बांधून घ्यावेत.
  • काळी मिरीच्या वेलाला प्रतिवेल १० लिटर इतके पाणी ठिबक सिंचन पद्धतीने ३-४ दिवसांच्या अंतराने द्यावे. वेलाच्या बुंध्याजवळ आधार दिलेल्या झाडाच्या चारही बाजूला २-३ इंच जाडीचे गवताचे किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
  • पाण्याची सोय केल्यानंतर प्रतिवेल युरिया १५० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश १२५ ग्रॅम याप्रमाणात खते जमिनीत मिसळून द्यावीत. खते देताना मुळांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मर व इतर रोगांपासून संरक्षणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची वेलीवर फवारणी करावी. तसेच बोर्डोपेस्ट (१० टक्‍के) १ मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावी.
  • रोगट पाने व मेलेल्या वेली मुळासह काढून जाळून टाकाव्यात.
  • संपर्क :  योगेश परुळेकर, ८२७५४५४९७८ (कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com