दर्जेदार कलमांसाठी दाब, गुटी कलम पद्धत

दर्जेदार कलमांसाठी दाब, गुटी कलम पद्धत
दर्जेदार कलमांसाठी दाब, गुटी कलम पद्धत

फळबाग उत्पादन हा दीर्घकाळ व्यवसाय असल्याने जातिवंत व दर्जेदार कलम निवड अत्यंत महत्त्वाची असते. रोपवाटिका करताना कलमाचे विविध प्रकार अाहेत. त्यापैकी दाब कलम व गुटी कलम करण्याची पद्धत समजून घेऊ. कलम किंवा रोपांची निर्मिती किंवा अभिवृद्धी प्रामुख्याने अशाकीय व शाकीय अशा दोन प्रकारे केली जाते. अशाकीय अभिवृद्धी म्हणजेच बियांपासून केली जाणारी अभिवृद्धी. उदा. पपई, नारळ, कागदी लिंबू. यासाठी बियाणे मूळ जातीच्या गुणधर्माचे असावे. बियाची उगवण क्षमता किमान ८० टक्के असावी. बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी योग्य संजीवकाचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. बियाणे रुजवण्यासाठी गादी वाफे तयार करून ते निर्जंतुक करावेत. त्यावर लावण्यापूर्वी बियांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. शाकीय अभिवृद्धी म्हणजेच वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांपासून स्वतंत्र वनस्पती तयार करणे होय. उदा. केळी व अननस यांची अभिवृद्धी मनुव्याद्वारे केली जाते. स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी धावती खोडापासून (रनर्स) केली जाते. इतर प्रमुख फळपिकांसाठी खालील तक्ता पाहा.

कलमांचा प्रकार   फळपिके
गुटी कलम    डाळिंब, पेरू
दाब कलम    पेरू
कोय कलम    आंबा
पाचर कलम     आंबा, सिताफळ
भेट कलम     चिकू
डोळा भरणे     मोसंबी

गुटी कलम डाळिंब गुटी कलम करण्यासाठी जातिवंत व वाढ झालेल्या मातृवृक्षांची निवड करावी. मातृवृक्षाच्या पक्व फांदीवर दोन डोळ्यांच्या मध्ये २ ते ३ सें.मी. रुंदीची गोलाकार साल काढावी. ओलसर शेवाळ (स्पॅगनम मॉस) घट्ट गुंडाळावे. यावरती १२x१२ सें.मी. आकाराच्या २०० गेज जाडीचा पॉलिथीन कागद सुतळीच्या साह्याने घट्ट बांधावा. गुटी कलमे बांधल्यानंतर ४ ते ५ आठवड्यांनी मुळ्या येण्यास सुरुवात होते. ६० ते ८० दिवसांनी मुळ्यांचा रंग तांबडा झाल्यावर गुटीच्या खालच्या बाजूने सिकेटरच्या साह्याने काप घ्यावा. कलमे मातृवृक्षापासून वेगळी करावी. कापलेल्या गुट्यावरील पॉलिथीन पेपर, सुतळी काढून टाकावी. गुटी मॉससहीत बुरशीनाशकाच्या पाण्यात बुडवावीत. शेणखत, माती मिश्रणाने भरलेल्या पिशवीत लावावी. दाब कलम पेरू दाब कलम करण्यापूर्वी पूर्ण वाढ झालेल्या मातृवृक्षाची परिपक्व फांदी निवडावी. दाब कलम करण्यासाठी रोपवाटिकेत मातृवृक्ष बागेची जमिनीलगत छाटणी केली जाते. अशी छाटणी केल्यामुळे नवीन येणाऱ्या फांद्या जमिनीच्या लगत समांतर अशा वाढतात.  परिपक्व फांदीला खालील बाजूस फांदीच्या टोकाच्या दिशेने जिभलीसारखा २.५ ते ५ सें.मी. लांबीचा काप घ्यावा. जिभलीचा काप उघडा राहण्यासाठी त्यात बारीक काडी बसवावी. मातीच्या पेल्यामध्ये शेणखत, माती मिश्रण भरुन घ्यावे. या पेल्यामध्ये सदरील काप वाकवून मातीमध्ये पुरावा. फांदी वर येऊ नये किंवा हलू नये, यासाठी मातीमध्ये पुरलेल्या कापावर दगड ठेवावा. कलमीकरण व्यवस्थित होण्यासाठी पेल्याला व मातृवृक्षाला नियमित पाणीपुरवठा करावा. ‍कलमाला ७० ते ९० दिवसांमध्ये मुळे फुटतात. पुरेशा प्रमाणात मुळ्या फुटल्यावर कलम मातृवृक्षापासून अलग करावे. त्यासाठी मुळे फुटलेल्या जागेच्या मागे लहान काप घ्यावा. नंतर ८ ते १० दिवसांनी त्याच जागी खोल काप देऊन कलम मातृवृक्षापासून वेगळे करावे. सावलीत ठेवावे. कलमे निवडताना आवश्‍यक बाबी  

  • कलमे जातिवंत, दर्जेदार, कीड, रोगमुक्त असावीत. लागवडीपूर्वी कलमे कणखर (हार्डनिंग) झालेली असावीत.
  • खुंट व कलम काडी सारख्या आकाराची असावी. कलम जोड एकजीव असावा.
  • कलमे शक्‍यतो एक वर्ष वयाची, मध्यम वाढीची, ६० ते ७५ सें.मी. उंचीची असावी.
  • कलम, डोळा भरणे जमिनीपासून २० सें.मी. पेक्षा जास्त उंच नसावे. कलमांना भरपूर मुळ्या असाव्यात. वाढ समतोल असावी.
  • शेंडा कलम/ पाचर कलम रोपांच्या खुंटावरील फूट काढलेली असावी.
  • गरजेपेक्षा १० ते १५ टक्के जास्त रोपे खरेदी करावी. नांगे भरण्यासाठी उपयोग होतो.
  • संपर्क : अमोल क्षीरसागर, ९८२२९९१४९५ (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com