जुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन

जुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन
जुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन

पेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटत जाते. तसेच फळांची गुणवत्ता व आकारही कमी होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पादन वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा अवलंब करावा. अशा बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दर्जेदार व चांगले उत्पादन मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये बहुतेक पेरू लागवड ही पारंपरिक पद्धतीने ६ मीटर X ६ मीटर अंतरावर केली जाते. साधारणत: २० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या बागांमध्ये झाडांतील शरीरक्रियांची गती कमी होते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे वेडीवाकडी वाढतात, उत्पादकता घटते. त्याबाबत कारणांचा अभ्यास करून छाटणीचे नियोजन करावे. पुनरुज्जीवनाची पद्धत

  • पुनरुज्जीवन म्हणजे छाटणी करून झाडाचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या सशक्त व जोमदार बनवणे. पुनरुज्जीवनामुळे झाडापासून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते. केवळ झाडांची खरड छाटणी करणे म्हणजेच पुनरुज्जीवन असा सर्वसाधारण समज आहे. झाडांची छाटणी करणे ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे.  
  • बागांमध्ये मध्येच असलेल्या एका दुसऱ्या झाडाची निवड न करता सलग झाडे छाटणीसाठी निवडावीत. त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून नवीन फुटव्यांची वाढ उत्तम होते.
  • छाटणी

  • झाडाच्या विस्तारावर छाटणी किती उंचीवर व कोणत्या फांद्यापर्यंत करायची हे ठरवावे. साधारणतः शिफारशीप्रमाणे १ ते १.५ मीटर झाडांची उंची ठेवून झाडांच्या वरील भागाची छाटणी केलेली उत्तम ठरते.
  • फांद्या तोडताना झाडांची साल निघणार नाही, फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी तीक्ष्ण अवजाराने करावी. झाडांची योग्य उंचीवर चेन सॉ किंवा लांब दांडा असलेल्या यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी करावी. यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी केल्यास काप एकसारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो. यांत्रिक करवती उपलब्ध नसतील, तर पारंपरिक करवतीसारखे अवजार वापरूनदेखील छाटणी करता येते.
  • बाहेरील बाजूकडे निमूळता तिरकस काप दिल्यामुळे पावसाचे किंवा दवाचे पाणी सहजपणे निथळून जाण्यास मदत होते. छाटणी करताना सपाट किंवा बुंध्याकडे पाणी निथळून येईल, असा तिरकस काप देऊ नये.
  • छाटणीचा हंगाम : शक्यतो पेरूची छाटणी ही मे-जून या महिन्यात करावी. सद्यस्थितीत ३० जून अखेरपर्यंत छाटणी पुर्ण करवी. परिणामी पावसामुळे नवीन पालवी लवकर येते. ती निरोगी व सदृढही असते. छाटणीनंतर पावसाळ्यात येणाऱ्या नवीन पालवीचे योग्य नियोजन करून रोग व किडींपासून संरक्षण सहजपणे करता येते.
  • फुटव्यांचे व्यवस्थापन

  • जुन्या पेरू बागेची छाटणी केल्यानंतर लगेचच खोडातील सुप्त डोळे जागृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. छाटणीपासून सर्वसाधारणपणे ३० ते ४० दिवसांनी नवीन फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू होते. नवीन फुटवे येण्यासाठी लागणारा कालावधी झाडाचे वय व जमिनीमध्ये असलेला ओलावा यावर अवलंबून असतो. खूप जुन्या झाडांची छाटणी केल्यास नवीन फुटवे येण्यासाठीचा कालावधी यापेक्षा जास्त असू शकतो.
  • छाटणी केलेल्या जागेभोवती असंख्य नवीन फुटवे येतात. त्या फुटव्यांपैकी सशक्त असलेले ३ ते ४ फुटवे फांदीच्या चारही बाजूस राखावेत. उर्वरित फुटव्यांची विरळणी करावी. अशी विरळणी २० ते २५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा करावी. त्यानांतर खोडावर खालील बाजूसही फुटवे येऊ लागतात. या फुटव्यांचीदेखील आवश्यकतेप्रमाणे विरळणी करून दर अर्धा ते १ फुटावर फांदीच्या चारही बाजूस एक-एक जोमदार फुटवा राहील, याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने विरळणी केल्यावर संपूर्ण खोडावर नवीन फांद्या विकसित होतात.
  • विरळणी केल्यानंतर राखलेले फुटवे बळकट करण्यासाठी फुटव्यावर दोनदा नवीन फूट आल्यावर दुसऱ्या नवीन फुटीचा डोळा खुडावा. त्यामुळे ही फूट सशक्त व जाड होण्यास मदत होते. तसेच खुंटलेल्या डोळ्यापासून २ ते ३ नवीन फांद्या फुटतात. अशा रीतीने झाडाचा विस्तार वाढण्यास मदत होते. अशाप्रकारे तिसऱ्या वर्षांपासून चांगल्या प्रतीची फळे मिळण्यास सुरवात होऊन उत्पादनातही वाढ होत जाते.
  • जुन्या पेरू बागांची उत्पादकता घटण्याची कारणे

  • जुन्या बागांमध्ये झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. परिणामी प्रकाश संश्‍लेषणात अडथळा निर्माण होतो.
  • नवीन पालवी फारच कमी येते.  बागांमधील झाडे फार दाटीने वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते.
  • झाडांच्या फांद्या एकमेकांत घुसतात; घासतात. परिणामी किडींचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादनात घट होते. जुन्या बागांमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडींचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने फळे गळतात.
  • छाटणीनंतर घ्यावयाची काळजी

  • कापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बागेबाहेर काढून बाग स्वच्छ करावी.  छाटणी केलेल्या फांद्यांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कापलेल्या भागावर बोडोपेस्ट (१० टक्के) लावावी.  
  • छाटणी केल्यानंतर पालवी लवकर पक्व होण्यासाठी झाडावर २ टक्के नत्रयुक्त खताची फवारणी करावी. पाणी व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे.
  • २ ते ३ महिन्यांनी नवीन पालवीतील जोमदार फाांद्या ठेवून साधारणपणे ५० टक्के पालवीची विरळणी करावी.
  • संपर्क : शशांक भराड, ९६५७७२५७११ (उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com