महिलाबचत गटाकडून कापूस ते वस्त्रनिर्मिती

कापूस ते वस्त्रनिर्मिती तंत्राच्या वापरातून मूल्यवर्धनाला मिळाली चालना
कापूस ते वस्त्रनिर्मिती तंत्राच्या वापरातून मूल्यवर्धनाला मिळाली चालना

कापूस हे विदर्भातील मुख्य पीक; पण त्यावर प्रक्रिया होत नसल्याने या पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळत नव्हती. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या साथीने या प्रकल्पाला वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याद्वारे वर्धा जिल्ह्यात चार ते पाच महिला बचत गटांच्या सहभागातून कापूस ते वस्त्रनिर्मिती तंत्राचा वापर होत अाहे. उद्योजक होण्याचे व्यासपीठ महिलांना मिळण्याबरोबरच कापसाचे मूल्यवर्धन होत आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ वर्धा जिल्ह्यात व्यतित केला. त्यांची प्रेरणा घेत या जिल्ह्यात चरखा चालवून सूतकताईचे काम होते. साहजिकच कृषी विभागाच्या कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कापूस ते वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यावर ५२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. शेतकरी कंपनीची तेवढी आर्थिक क्षमता नव्हती. परिणामी महिला स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून या प्रकल्पाला बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पाचे गोवर्धन चव्हाण, नीलेश वावरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

साटोडा गावाची निवड यंदाच्या जूनपासून प्रकल्पाची सुरवात झाली. महिला आर्थिक विकास महामंडळ, पंचायत समितीद्वारा तयार करण्यात आलेल्या महिला बचत गटांचा समावेश प्रकल्पात करण्यात आला. सुमारे चार ते पाच गट यामध्ये सहभागी आहेत. प्रतिगटात सरासरी दहा ते बारा महिला अाहेत. आजवर चार गटांना धागा किंवा वस्त्रनिर्मितीसाठी यंत्रसामग्री देण्यात आली.

असे आहे वस्त्रनिर्मितीसाठी युनिट

  • लाभार्थी बचत गटांपैकी साटोडा येथील विठाई स्वयंसहायता महिला बचत गटाचा समावेश आहे. गटाच्या सचिव शुभांगी विजय बडे म्हणाल्या, की आम्हाला एक युनिट मिळाले आहे. त्याअंतर्गत
  • चार हॅंडलूम्स, विजेवर चालणारे दोन मोठे चरखे, तसेच हाताने चालवायचे चरखेही मिळाले आहेत.
  • प्रकल्पासाठी विविध संस्थांकडून अनुदान मिळाले आहे. प्रतियुनिट सुमारे साडेतीन लाख रुपये गुंतवणूक रक्कम आहे.
  • वस्त्रनिर्मितीमागील तंत्र

  • विठाई गट सुती शर्टचे कापड, रूमाल व टाॅवेल यांचे उत्पादन करतो.
  • एका तासात एक मीटर कापडनिर्मिती प्रतिहॅंडलूमद्वारे होते.
  • दिवसभरात सर्व हॅंडलूम व एकूण महिलांची कार्यक्षमता पाहता सुमारे ३२ मीटरपर्यंतची कापडनिर्मिती, तर आठ टॉवेल्सची निर्मिती होऊ शकते.
  • असे होते कपाशीचे मूल्यवर्धन तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या प्रकारचे तंत्र वापराल व त्याद्वारे मालाचे मूल्यवर्धन कराल त्याप्रमाणे त्याचे मूल्यही वाढत जाते. याअनुषंगाने बडे म्हणाल्या, की कपाशीची विक्री केल्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो; मात्र त्याच्या गाठींची निर्मिती करून विक्री केल्यास हाच दर क्विंटलला २० हजार रुपयांपर्यंत पोचतो. त्याही पुढे जाऊन वस्त्रनिर्मिती केल्यास हाच दर पोचतो ३० हजार ते ३२ हजार रुपयांपर्यंत. आम्हीही अशाच प्रकारचे मूल्यवर्धन करत आहोत.

    वस्त्रनिर्मिती तंत्राने दिला रोजगार साटोडा गावात भूमिहीन लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हंगामात शेतमजुरी व मिळालेल्या पैशांतून कौटुंबिक गरजा भागविणे असे त्यांचे कामाचे स्वरूप असते. हंगाम संपल्यानंतर रोजगाराच्या शोधार्थ त्यांना स्थलांतर करावे लागते. त्यामुळेच अशाच होतकरू गावांची निवड करून महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. साटोडा, दत्तपूर, आलोडी अशा तीन गावांची मिळून येथे ग्रामपंचायत आहे. प्रकल्पातील ठळक बाबी

  • वर्धा येथील निवेदिता नीलायम संस्थेच्या माध्यमातून महिलांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण
  • एका कंपनीने तयार कापड खरेदीची जबाबदारी स्वीकारली आहे. सरासरी १३० रुपये प्रतिमीटर दराने कापडाची खरेदी ही कंपनी करते.
  • प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून सद्भावना ग्रामीण विकास संस्था साटोडा येथे कार्यरत आहे. याच संस्थेच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांची निवड, प्रशिक्षण व अन्य कामे करण्यात आली.
  • खादीचा ब्रॅंड महात्मा गांधी यांच्यामुळे वर्धा जिल्ह्यातील उत्पादित खादीला वेगळे अस्तित्व आणि ओळख आहे. त्यामुळेच या खादीला भौगाेलिक मानांकन (जीआय) मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी महिला गटांकडून कापड खरेदी करणाऱ्या कंपनीने विक्रीसाठी सेवाग्राम खादी हा ब्रँड केला आहे. त्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करण्याचेही प्रस्तावित आहे. पाचशे मीटर कापडाची विक्रीही करण्यात आली आहे.

    गुजरातमधून चार हजार सुती टॉवेल्सची मागणी ‘विठाई’ गटाच्या बडे म्हणाल्या, की आम्ही प्रकल्पांतर्गत काम सुरू करून तीन महिनेच झाले आहेत; मात्र मिळणारा अनुभव उत्साहवर्धक आहे. आम्हाला गुजरातमधील एका कंपनीकडून चार हजार सुती टॉवेल्सची आॅर्डर मिळाली आहे. त्यांनी कच्चा माल पुरवण्याचेही सांगितले आहे. काही प्रमाणात आम्ही कापड विक्रीही केली आहे. कामाला सुरवात केल्यापासून आजवर अनेकांनी आमच्या प्रकल्पाला भेट दिली. सुरवातीला अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले; परंतु आमचा आत्मविश्‍वास कायम होता. येत्या काळात गावातील सुमारे २८० घरांना ‘कीट’ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यात घरटी, एक चादर, दोन टॉवेल्स, दोन रुमाल, शर्टचे कापड आदींचा समावेश आहे. त्याची एक हजार ते बाराशे रुपये किंमत राहील. साटोडा येथील या प्रकल्पाचे अनुकरण झाल्यास कापूस शेतीचे चित्र पालटण्यास मदत होईल हे निश्‍चित आहे.

    शेतीला प्रकल्पाचा झाला आधार

  • शुभांगी बडे यांची तीन एकर शेती आहे. त्यात कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके घेतली जातात.
  • आपल्या शेतीला या मूल्यवर्धन प्रकल्पाचा मोठा आधार झाल्याचे त्या सांगतात. शिवाय अन्य महिलांसाठीही रोजगारनिर्मिती झाल्याचेही समाधान त्यांना आहे.
  • संपर्क ः शुभांगी बडे-८६०५१५७६२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com